धुळे -(प्रतिनिधी) साक्री आगाराच्या भंगार झालेल्या एस.टी. बसमुळे पुन्हा एकदा अपघात घडून निष्पाप जीव गेला. दि. 8/9/2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पिंपळनेर – साक्री रस्त्यावर एमएच 40 एन 9014 क्रमांकाच्या बसमुळे झालेल्या अपघातात एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेविरोधात मनसे, प्रहार संघटना, भाजप पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठा संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (म.न.ज.विधी विभाग) धिरज प्रकाश देसले यांनी पोलिस निरीक्षक, साक्री पोलिस ठाणे यांना तात्काळ लेखी निवेदन देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, धुळे परिवहन विभागाच्या बेफिकीरीमुळे दररोज प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. जुनाट व निकृष्ट अवस्थेतील बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर प्रहार संघटना व भाजप पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनीही या निष्काळजीपणाला परिवहन विभाग जबाबदार असल्याचे सांगून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाईची मागणी केली. सामान्य प्रवाशांचे जीवन धोक्यात घालणाऱ्या या निष्काळजी वृत्तीबद्दल मनसेसह सर्व उपस्थित संघटनांनी पोलिस प्रशासन आणि परिवहन विभागाला जाब विचारला. बससेवेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. भंगार बसेस रस्त्यावर धावणं थांबवा – अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहा, असा इशारा मनसे, प्रहार संघटना व भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.