परभणी(प्रतिनिधी) महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हा कायदा जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारा असून त्यामुळे संवैधानिक हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला. बुधवारी (दि.10) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आणि संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीने हा आरोप केला. हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी जन परिषद, भारत जोडो अभियान, मानव मुक्ती मिशन, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस आदी पक्ष व संघटना सहभागी झाल्या. मुख्यमंत्र्यांना निवेदनात म्हटले आहे की, हे विधेयक घटनाविरोधी असून लोकशाहीस बाधक आहे. राज्यभरातून या विधेयकाविरोधात तब्बल 13 हजार हरकती दाखल झाल्या, त्यापैकी 9,500 हरकतींमध्ये विधेयक रद्द करण्याची मागणी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विरोध डावलून सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर केला, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलनात उपस्थित नेत्यांनी सांगितले की, नक्षलवाद रोखण्यासाठी आधीच यूएपीए, मकोका सारखे कायदे अस्तित्वात आहेत. मात्र या नव्या कायद्याचा उद्देश फक्त सरकारच्या धोरणांना विरोध करणार्या संघटना व नागरिकांची मुस्कटदाबी करणे हा आहे. हा कायदा जनसुरक्षेसाठी नसून सत्ताधार्यांच्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी आणलेला आहे. लोकशाही व संविधानिक हक्क वाचवण्यासाठी तो तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. या आंदोलनात माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी खासदार अँड. तुकारामजी रेंगे पाटील, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, तहसीन अहेमद खान, अँड. माधुरीताई क्षीरसागर, कीर्तीकुमार बुरांडे, मारोतराव मोरताटे, सोनालीताई देशमुख, तहसीन खान, भगवान वाघमारे, रवी सोनकांबळे, उद्धव शिंदे, अंबिका डहाळे, दुर्राणी खानम,रवींद्र धर्मे, नदीम इनामदार,अब्दुल माजीद अ. राशिद,सुहास पंडित, भीमप्रकाश गायकवाड, अमोल जाधव, व्यंकटराव कदम, रामभाऊ घाडगे, क्रोमडे ओकार पवार, पप्पूराज शेळके, संतोष बोबडे,डॉ. सुनील जाधव, नितीन गोगलगावाकर, बाळासाहेब देशमुख,दिगंबर खरवडे, व्यंकट कदम, डी एस ठोंबरे, प्रसाद गोरे, विष्णूभाऊ मूरकुटे, गुलाब हरकळ, प्रल्हादराव पारवे, नासेर शेख, मनीषा केंद्रे, अंकुश कच्छवे, रितेश काळे, सय्यद अन्वर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.