बहुजन समाज जर उत्तर प्रदेशाप्रमाणे देशभर एकवटला तर परिवर्तन घडवून आणणे दूर नाही.त्याचा यशस्वी प्रयोग कांशीराम यांनी केला आणि प्रत्यक्षात उतरवला.देशातील पहिले सोशल इंजिनिअरिंग कांशीराम यांनी केले.बहुजन ही नेमकी संकल्पना काय असते याची जणू व्याख्याच उत्तर प्रदेशाने दिली.तो प्रयोग केल्यानेच उत्तर प्रदेशातील बहुजन समाज आजही ताठ मानेने जगतो आहे.बहुजन समाज पक्ष हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष होता. ज्याची स्थापन बहुजन राजकारण करण्यासाठी झाली. सद्यस्थितीत मतांची टक्केवारी घसरल्याने राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेत बसत नाही.हा भाग वेगळा. आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीवर चालणारा पक्ष. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजन हितासाठी संघर्षरत सुरू आहे.इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. ढोर -माग- महार- चांभार -साळी -माळी -तेली- तांबोळी इतर अनेक लहान जातीत फुले- शाहू -आंबेडकर परले. त्यामुळे बहुजन ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली.तो प्रयोग देशभर करण्याचा प्रयत्न आजही कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाच्या वतीने सुरू आहे.त्या पक्षाला यश येईल अथवा अजून काही.पण, त्याव्यतिरिक्त देशभरात किंबहुना महाराष्ट्रात बहुजन ही संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली तर परिवर्तन घडण्यास वेळ लागणार नाही आणि ती गरजही आहे.
बहुजन चळवळ म्हटलं जातं पण,यात ओबीसींचा समावेश किती असतो?तर नगण्य.म्हणजे बहुजन फक्त आंबेडकरवादी आहेत असे म्हणावे तसे.कारण, बहुजन ही संकल्पना बहुसंख्य लोक अशी मांडता येईल.पण, यात खरे तर अल्पसंख्य समाज दिसतो.खरच जर बहुजन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर सवर्णांच किंवा स्वतः ला उच्चप्रभू समजणाऱ्यांचे धाबे दणाणले नाही तर नवल. कारण, बहुजन एकवटला तर बहुजनांच्या हाती सत्तेच्या चाव्या राहतील आणि हवी तशी परिस्थिती बदलता येईल. पण, बहुजन या संकल्पनेप्रमाणे उतरायला हवे. तर ते शक्य आहे.आज प्रत्येक समाज जाती जातीत उतरलेला दिसतो. महाराष्ट्रात त्याचं प्रतिबिंब अधिक.कारण, इथला प्रत्येक माणूस जातीत उतरलेला दिसतो. तो कुठल्याही क्षेत्रात जात पाहतोय.हे गेल्या दशकभरातील चित्र आहे. दशकभरापूर्वी कोणताच समाज अमूक अमूक जातीचा आहे अशी परिस्थिती नव्हती. याची प्रचिती अनुभवली असेल?राजकारणात जातीचा अजेंडा भलेही विजयाचा विचार करून केला असली तरी जात पाहून नव्हे तर ,हा उमेदवार आपल्या हाकेला ओ देऊ शकतो. अशी साधारण धारणा होती.पण , गेल्या दोन म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र,जात हा फँक्टर जोरकसपणे महाराष्ट्रात चालवण्याचा प्रयत्न झाला.मात्र, शिव -फुले -शाहू -आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे क्वचितच घडावे तसे घडले. असो, पण,जाती जातीत आणणाऱ्यांना याचा फायदा किती झाला? याचं परिक्षण त्यांनी नक्कीच करायला. याउलट बहुजन समाज एकवटला तर त्याचे परिणाम मात्र, दोन्ही निवडणुकीत दिसून आले असते.पण, बहुजन समाज अजूनही तितका जागा झालेला नाही.एखाद्या मागासवर्गीय समाजातील व्यक्तीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा बहुजन समाज कुठे असतो?फक्त त्यासाठी मागासवर्गीय समाजानेच आवाज उठवावा अशी एकंदर परिस्थिती महाराष्ट्रात तरी दिसते.जर प्रत्येक वेळी आम्ही बहुजन म्हणून बहुजन समाज एकवटला गेला तर कोणतंही क्षेत्र काबीज करू शकतो.बहुजन समाजातील जातीत एकता हवी.देशातील सगळा बहुजन समाज एक होण काळाची गरज आहे.कारण, उद्या संविधानिक हक्क अधिकार बहुसंख्याकांच्या जोरावर हिरावले जातील. त्यासाठी वेळीच बहुजन समाजाने एकता दाखवली पाहिजे.दलित- मुस्लिम – ओबीसींनी एकत्र येऊन नवीन समीकरण देशात निर्माण केले पाहिजे.तर त्या- त्या समाजाला त्या- त्या प्रमाणात सत्तेत येऊन भागिदार होता येईल.शिव -फुले -शाहू -आंबेडकर हे ओबीसींच्या घराघरात,वाडी- वस्ती- तांड्यावर पोहोचणे आवश्यक आहे.आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर जगभरात विचारमंथन सुरू आहे.त्यांच्या विचारांचा जगभरात आदर्श मानून सन्मान केला जातो.ते बाबासाहेब किती आपल्याकडच्या वाडी, वस्ती आणि तांड्यावर पोहोचले आहेत ? तमाम बहुजन समाजाने समतेसाठी एकवटले पाहिजे. त्यासाठी फुले- शाहू – आंबेडकर वाचले पाहिजेत. जगातील सर्वोच्च संविधान प्रत्येकाने वाचून, संविधान समजून घेतले पाहिजे.त्यामुळे संविधानाने इथल्या प्रत्येकाला काही हक्क- अधिकार दिले आहेत. ते कोणीही बहुसंख्यांक आणि झुंडशाही करून हिरावून घेऊ शकत नाही.मुळात त्यासाठी आपल्याला हक्क – अधिकार माहिती असायला हवे.त्यासाठी संविधान वाचले पाहिजे.शिव- फुले- शाहू -आंबेडकर वाचले पाहिजेत. त्यातूनच बहुजन समाज एकवटला जाईल आणि परिवर्तन घडवून आणता जाईल. सत्तेची समीकरण जुळविण्यासाठी हे आवश्यक आहे. कारण, सत्ता ही सवर्ण समाजातील व्यक्तींची मक्तेदारी राहिली आहे.ती मोडीत काढण्यासाठी बहुजन ही संकल्पना ओबीसी – मागासवर्गीय यांच्या एकजुटीशिवाय शक्य नाही.
– पदमाकर उखळीकर ,
( लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२