डाव्या विचासरणीचा बुलंद आवाज असे ज्यांचे वर्णन केले जाते ते कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांचा आज पहिला स्मृतिदिन. मागील वर्षी १२ सप्टेंबर २०२४ रोजी सीताराम येचुरी यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने डाव्या विचारसरणीची बुलंद तोफ कायमची थंडावली. १२ ऑगस्ट १९५२ रोजी जन्मलेले सीताराम येचुरी हे भारतीय राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थी दशेतच ते कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षित झाले. आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद येथे पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी त्यांनी दिल्ली गाठली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली. तिथेच ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियात सक्रिय झाले. या संघटनेचे ते तीन वेळा महासचिव बनले. पुढे त्यांना या संघटनेचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर ते कम्युनिस्ट पक्षात सक्रिय झाले. कम्युनिस्ट पक्षात त्यांनी विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. त्यांच्या या कार्यामुळे कम्युनिस्ट पक्षाने त्यांना केंद्रीय सचिव पदावर काम करण्याची संधी दिली. १९९२ साली चेन्नई येथे झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या १४ व्या काँग्रेसमध्ये त्यांची पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून निवड करण्यात आली. कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य म्हणून त्यांनी भारतात कम्युनिस्ट पक्ष वाढवण्याचे मोठे कार्य केले. गावागावात, घराघरात कम्युनिस्ट पक्ष नेण्याचे प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रयत्नांना पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा या राज्यात मोठे यश मिळाले. या राज्यात कम्युनिस्ट पक्षाची सरकारे आली. संसदेतही कम्युनिस्ट पक्षाचे अनेक खासदार निवडून आले. सीताराम येचुरी हे स्वतः संसदेत निवडून गेले. संसदेतही त्यांनी विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडले. आपल्या बुलंद आवाजाने आणि अभ्यासपूर्ण भाषणाने त्यांनी संसद दणाणून सोडली. सीताराम येचुरी यांच्यावर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या त्या त्यांनी लिलिया पेलल्या. त्यांनी पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे अध्यक्षपद सांभाळले. पक्षाचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेमॉक्रासी या नियतकालिकाचे संपादक पदही त्यांनी भूषवले. महाराष्ट्राचे प्रभारी पद ही त्यांनी सांभाळले. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांच्या निधनाने केवळ डाव्या विचरसरणीचीच नव्हे तर देशाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारा एक विचारवंत, तत्वनिष्ठ नेता देशाने गमवला आहे. त्यांची पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या विचाराशी असलेली बांधिलकी हा राजकारणाचा क्षेत्रात आदर्श ठरणार आहे. राजकीय भुमिकांबाबत मतभिन्नता असूनही मनभेद असू नयेत अशी निखळ मानवतावादी वृत्ती जपणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना पहिल्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
कॉम्रेड सीताराम येचुरी यांना लाल सलाम !!
कॉम्रेड सीताराम येचुरी अमर रहे!!!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५३४६२९५