परभणी,दि.10(प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील रस्त्यांचे अद्यावत नोंदणीकरण व अतिक्रमण मुक्ती ही काळाची नितांत गरज ठरली असून संबंधित यंत्रणांनी सर्व रस्ते मोकळे करावेत व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिले आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण रस्ते या संदर्भात बुधवारी विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात ग्रामीण भागातील शेतरस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग, यांचे सीमांकन, नोंदणीचे अद्यावतीकरण, अतिक्रमण हटावो मोहिम, तसेच प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र क्रमांक देण्याची पध्दती या बाबत तपशीलवार माहिती व चर्चाही करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ग्रामीण रस्त्या संदर्भात 29 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने स्पष्ट असे निर्देश दिले आहेत. त्या प्रमाणे शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे, शासकीय यंत्रणांनी ग्रामपंचायतीच्या सहभागातून हे उपक्रम यशस्वी करावेत, ग्रामीण रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, रस्ते हे गावातील शोषणाचे काम करत आले आहेत. त्यामुळे गावातील सर्व रस्ते मोकळे करुन गावचा श्वास मोकळा होईल, याची काळजी घ्यावी, असे नमूद केले.
दरम्यान, मराठा कुणबी यांचे हैद्राबाद गॅझेटप्रमाणे कार्यवाही करतांना ग्रामस्तरीय समितीची रचना, समितीचे कार्य, द्यावयाचे अहवाल या विषयीही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, भूमि अभिलेख विभागातील अधिकारी, पंचायत समितीतील अधिकारी, मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.