परभणी या.8(प्रतिनिधी)तालुक्यातील धारणगाव येथील तरुण शेतकरी ई – पिक पाहणी निमित्ताने शेतात जात असताना पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि. ८ रोजी पहाटे उघडकीस आली.
गजानन आश्रुबा डुकरे (वय २२)असे मृत तरुण शेतक-याचे नाव आहे.डुकरे हा रविवारी सकाळी साडेदहा – अकरा वाजण्याच्या सुमारास ई – पिक पाहणीसाठी शेतात जायला निघाला. नदीतून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मृत्यू पावल्याचा अंदाज आहे.घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत या तूरूणांचा शोध घेतला. मात्र तो मिळून आल्याने पथक माघारी परतले.
दरम्यान नातेवाईक नागरिक रात्रभर नदी परिसरात त्या तरूणाचा शोध घेतला.सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समसापूर येथील बंधाऱ्यात मृतदेह अडकल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. तात्काळ तो मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढला.दरम्यान समसापूर येथील तो बंधारा हटविण्याची मागणी नातेवाईक व संतप्त ग्रामस्थांनी करीत गजानन डुकरे या तरूणाचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृत तरूणाच्या परिवारास तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि समसापूर येथील बंधारा तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू केला होता.