Home Blog Page 9

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता !  

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता !

 

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दीन. महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जागतिक कीर्तीचे विचारवंत अशी ओळख आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे विचारवंत म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगभर ओळख आहे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्या जाहिराती किंवा शुभेच्छा संदेश दिल्या जातात त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख दलितांचे उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशीच करून दिली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दलीत उद्धाराचे कार्य तर जगजाहीर आहे. जगाला हेवा वाटेल अशी राज्यघटना त्यांनी देशाला दिली. त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असलेला आपला देश एकसंघपणे बांधला गेला आहे. भारतासारखी राज्यघटना नसल्याने भारताच्या शेजारी असलेल्या देशांची आज काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतोच आहे. त्यामुळे त्यांची दलीत उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही ओळख यथायोग्यच असली तरी त्यांचे कार्य केवळ एवढ्या पुरतेच मर्यादित नाही. थोर अर्थतज्ज्ञ, महिलांचे उद्धारक, कृषी तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, जलतज्ज्ञ इतिहास तज्ज्ञ, समाज शास्त्रज्ञ, कायदेपंडित, धर्म चिकित्सक, राजनीती तज्ज्ञ, कामगार नेते, शांतीचे उपासक, कलाप्रेमी, लेखक, पत्रकार असे विविध पैलू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विविध पैलू कायम दुर्लक्षित केले जातात म्हणूनच मी माझ्या महिलांचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जलविषक धोरण या मागील दोन लेखात डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले कार्य आणि जलतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन पैलूंची ओळख करून दिली होती आज मी डॉ बाबसाहेब आंबेडकरांची पत्रकार म्हणून असलेल्या पैलूंची ओळख करून देणार आहे.

डॉ बाबसाहेब आंबेडकरांचा पत्रकारितेचा प्रवास मूकनायक पासून सुरू झाला. नंतर हा प्रवास बहिष्कृत भारत, जनता व प्रबुद्ध भारत पर्यंत सुरूच राहिला. सामाजिक आणि राजकीय ध्येयासाठी स्वतःचे वर्तमानपत्र असावे असे डॉ बाबसाहेब आंबेडकरांना वाटले म्हणूनच त्यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. दलितांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मूकनायक पाक्षिकानं निष्ठेनं केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. सुरुवातीला पांडुरंग नंदराम भटकर पाक्षिकाचे संपादक होते. त्यानंतर मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी असणारे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी आली. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. ‘मूकनायक’ पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. ‘मूकनायक’ एप्रिल १९२३ मधे बंद पडले.

इ.स. १९२४ मध्ये डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. ३ एप्रिल १९२४ रोजी बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची लेखनी झुंजार, क्रांतिकारी आणि प्रभावी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजू शकत होती.

गंगाधर पानतावणे यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की, “या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते.”

पत्रकार महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!!

 

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

ट्वेंटीवन शुगर झुकले ” ऊस उत्पादक आंदोलकांमुळेच जिंकले ट्वेंटीवन कारखान्यात गळपास आलेला ऊसाला दे देणार २७२५ रु ची पहिली उचल

 

 

सोनपेठ तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर देवी नगर,सायखेडा येथील या कारखान्यावर उसाच्या पहिल्या उचली च्या मागणीसाठी चार दिवसांपासून प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेले ठिय्या आंदोलन दि ४ डिसेंबर l गुरुवार रोजी उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या मध्यस्थीने ट्वेंटीवन शुगर प्रशासनाने यावर्षी गळफास येणाऱ्या ऊसाला २७२५ रु पहिली उचल देण्याची मान्य केल्यामुळे ऊस दरवाढ आंदोलन मागे घेण्यात आले.असुन परभणी जिल्ह्यातील ऊसाच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटली आहे.

बीड जिल्ह्यातील युवाऊस उत्पादक, हार्वेस्टर मालक, ऊसतोड कामगार या सर्वांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ऊसदाराचे आंदोलना चे लोन परभणी जिल्ह्यात पसरुन सोनपेठ तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर दि १ डिसेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरु केले होते.

ऊस उत्पादक युवा शेतकरी संघर्ष समिती,स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी यांचे मागील चार दिवसांपासून कारखाना परिसरात हे आंदोलन सुरू होते. कारखाना प्रशासनाने गुरूवारी याची दखल घेऊन तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली. या बैठकीस तहसिलदार सुनिल कावरखे, सोनपेठ पोलीस स्टेशनचे पो नि अशोक गिते, अजय किरकन ट्वेंटीवन शुगर्सचे विजय देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख,राजन क्षीरसागर,उदय देशमुख,अजय बुरांडे, सुधीर बिंदू, किशोर ढगे लक्ष्मण पौळ,विश्वंभर गोरवे, रामेश्वर मोकाशे,ॠषीकेश जोगदंड, सुरेश ईखे , ओमकार पवार यांच्या सह परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत ऊस दरावर यशस्वी चर्चा होऊन यंदाच्या गाळप हंगामात पहिली उचल २ हजार ७२५ प्रति मेट्रीक टन देण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले

चार दिवसांनंतर तब्बल सहा तास झालेल्या चर्चेनंतर रात्री आठ वाजता ही घोषणा कारखान्याच्या वतीने जाहीर करण्यात आली.

सोनपेठ तालुक्यातील काही गावांचे ऊस उत्पादक शेतकरी च या आंदोलनात प्रामुख्याने सहभागी झाले होते.नरवाडी, कानेगाव, शेळगाव बोंदरगाव, कोठाळा, या काही प्रमुख गावच्या शेतकऱ्यांनी हजेरी लावली इतर गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन हलक्यात घेतले. खरी मोलाची, खंबीर, प्रामाणिक साथ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मिळाल्यामुळे शंभर टक्के यश आले. हे आंदोलन जर झाले नसते तर यावर्षी ट्वेंटी शुगर कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या हाती 2200 रुपये देणार होते सोनपेठ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातील या बहाद्दर युवा ऊस उत्पादक संघर्ष समितीचे मानले तेवढे आभार कमीच आहेत. यानंतर तरी शेतकऱ्यांसाठी च्या अशा होणाऱ्या कोणत्याही आंदोलनात आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवून हिरीरीने भाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियानात 1 कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त 538 प्रकरणात 557 आरोपींवर गुन्हे; पोलिसांची प्रभावी कारवाई. खबर हेल्पलाईन 9150100100 व्हाटस् अप नंबरवर आत्ता आपनही अवैध धंद्याची करा तक्रार-उपमहानिरिक्षक उमाप

परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियानात 1 कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त

538 प्रकरणात 557 आरोपींवर गुन्हे; पोलिसांची प्रभावी कारवाई

परभणी (प्रतिनिधी) : नांदेड पोलिस परिक्षेत्रांतर्गत परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियानाच्या सातव्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात मोठी कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेत विविध प्रकरणांत 1 कोटी 1 लाख 53 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण 538 प्रकरणात 557 आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या अभियानात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमलीपदार्थ, वैश्या व्यवसाय, अवैध वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक यांसह विविध गैरव्यवहारांवर कारवाई करण्यात आली.

पूर्णा पोलिस ठाणे हद्दीत गांजा लागवड व गांजा बाळगणे या प्रकरणात दोन आरोपींवर कारवाई करून 6 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कार्यवाहीसाठी संबंधित पथकाचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

याशिवाय काही आरोपींना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करून त्यांची रवानगी छत्रपती संभाजीनगर कारागृहात करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातही हे अभियान अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असून हे वर्षातील शेवटचे अभियान असणार आहे. यात विशेषतः गुटखा, रेती, अंमलीपदार्थ, मटका व जुगार निर्मूलनावर भर दिला जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध व्यवसाय निर्मूलनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहानिरीक्षक उमाप यांनी केले आहे. यासाठी पोलिस परिक्षेत्राने खबर हेल्पलाईन 9150100100 सुरू केली असून, या क्रमांकावर कॉल वा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तक्रार नोंदविता येऊ शकते. तसेच जवळच्या पोलिस ठाण्यात अथवा अधिकृत संकेतस्थळावरही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी चालविलेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास वाढत्या वाहनांना आळा बसेल

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाहनांची संख्या जास्त आहे. मुंबईत तर वाहनांच्या संख्येने विक्रम गाठला आहे. मुंबईत वाहनांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत प्रति किलोमीटर ५३० चार चाकी वाहन आहेत. त्याचा वाहतुकीवर मोठा परीणाम होत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होत आहे. गेल्या तीन वर्षात मुंबईसह राज्यातील चार चाकी वाहनांची घनता २५ टक्क्यांनी वाढली आहे. इतर कोणत्याही शहरांच्या मानाने मुंबईत वाहनांची संख्या अधिक आहे. दुचाकी वाहनांच्या संख्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. चार चाकी वाहनांची देखील तीच परिस्थिती आहे एकट्या मुंबईत चारचाकी वाहनांचे प्रमाण दिल्लीच्या तीनपट आहे. एव्हढ्या मोठ्या संख्येने वाढलेल्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न जटिल झाला आहे. मुंबईत दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या ३५ लाखांच्या पुढे आहे. त्या तुलनेत गाड्या पार्क करण्यासाठी वाहनतळांची संख्या मात्र अपुरी आहे त्यात १० हजारांच्या आसपास वाहने पार्क करता येतात. परिणामी रस्त्यांवर अवैध पार्किंगची संख्या वाढली असून त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या अवैध पार्किंगवर न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. रस्त्यांवर असणाऱ्या अवैध पार्किंगमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. लहान रस्त्यांपासून पूर्व आणि पश्चिम दृदगती महामार्गावर सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी होते. ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात त्या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे ३५ मिनिटे लागतात. मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असले तरी वाहतूक कोंडीचे शहर अशी मुंबईची नवी ओळख निर्माण होत आहे. वाढत्या वाहन संख्येसोबतच रस्त्यांवर कुठेही पार्क केलेली तसेच छोट्या रस्त्यांवर दुतर्फा पार्क केलेली वाहने कोंडीचे मोठे कारण ठरत आहे. जी मुंबईची अवस्था आहे जवळपास तशीच अवस्था राज्यातील अन्य मोठ्या शहरांची आहे. मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अधिकाधिक वाहन तळांची आवश्यकता आहे. सरकारने त्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. वाढत्या वाहनांमुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षी मुंबईतील हवा सर्वाधिक निकृष्ट श्रेणीत गणली गेली आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा अधिक दूषित असल्याचा एक अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला आहे. मुंबईतील हवा प्रदूषित असण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे मुंबईतील वाढती वाहनांची संख्या. जर वाहनांच्या संख्येत अशीच वाढ होऊ लागली तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती प्रदूषणाचीही राजधानी बनेल आणि लोकांना श्वास घेणे मुश्किल होईल. त्यामुळेच वाढत्या वाहनांना आळा घालणे आवश्यक आहे. जर मुंबईसह राज्यातील इतर शहरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीतजास्त वापर केला तर ही समस्या सुटण्यास मदत होईल. सरकारनेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करतील त्यामुळे वाढत्या वाहनांना आळा बसेल. वाहनाची संख्या कमी झाली की इंधन बचतही होईल आणि प्रदूषणालाही अटकाव होईल तसेच पार्किंगचा प्रश्नही सुटेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली की वाढत्या वाहनांना आपोआप आळा बसेल.

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

मोटारसायकलवरून जात गुंज येथे धडक कारवाई; पाथरीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला साप्ताहिक स्मृतिगंधच्या बातमीचा दनका

पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुक्यात नेहमीच मोठ्या प्रमाणावर गोदावरी पात्रातुन वाळुचा अवैध उपसा व वाहतुक होत असल्याची बातमी सोमवारी १ डीसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती.सदरील बातमी प्रकाशीत होताच पाथरी तहसिलचे तहसीलदार एस.एन.हन्देश्वर यांनी गुंज येथे एका ट्रॅक्टरवर कारवाई केली.     सविस्तर बातमी अशी की, मंगळवारी २ डिसेंबर रोजी गोदावरी नदी पात्रात दुपारच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुची अवैध वाहतूक चालु असल्याची माहीती मिळाली त्याच माहीतीच्या आधारे मंगळवारी दुपारच्या वेळेस मोटारसायकलवरून जात गुंज नदीपात्रात धडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणारा जॉनडीअर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर पकडला. साप्ताहिक स्मृतिगंध वृत्तपत्रात प्रकाशित बातमीच्या दनक्याने महसुल प्रशासन सक्रिय झाले आणि यशस्वी कारवाई केली. सदरील ट्रॅक्टर सध्या पुढील महसुली कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.

पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा नियमितपणे सुरू असल्याने या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी तहसील प्रशासनाची ठोस कारवाई मागिल महीनाभरात झालेली पहायला मिळाली नाही.परंतु १ डीसेंबर सोमवारी साप्ताहिक स्मृतिगंध वृत्तपत्रांत वाळू उपसा व वाहतूकीविषयी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीचे तत्काळ परिणाम दिसून आला.व पाथरी तहसीलचे तहसीलदार एस.एन.हन्देश्वर यांच्या नेतृत्वाखाली एक बहु-विभागीय पथक मंगळवारी गुंज नदीपात्रामध्ये उतरले.यात नायब तहसीलदार सुजलेगावर, मंडळ अधिकारी एम.व्ही.कुलकर्णी (विटेकर),तलाठी नितिन गाडेकर आणि पोलिस कर्मचारी अमोल जैयस्वाल यांचा समावेश होता. निवडुकीच्या कामकाजामुळे सर्व कर्मचारी व्यस्त असल्याचा फायदा घेत वाळु माफीयांचा गोदावरी पात्रात नंगानाच चालु असताना तहसीलदार यांनी एका ट्रॅक्टरवर अचानक कारवाई केल्याने गुंज येथिल वाळु माफीयात भिती पसरली आहे.

नविन नियमानुसार अशी होणार कारवाई

राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कठोर निर्णय घेतले आहेत.अवैध वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचे परवाने जागेवरच निलंबित किंवा रद्द करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा पकडल्यास ३० दिवस परवाना निलंबित ठेवून वाहन अडकवले जाईल, दुसऱ्यांदा ६० दिवस निलंबन लागू होईल, आणि तिसऱ्यांदा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल.

मतदान यंत्रासह पोलिंग पथके आपल्या मतदान केंद्राकडे रवाना,उद्या लोकशाहीचा उत्सव!

पाथरी(प्रतीनीधी)पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान प्रक्रिया पूर्ण पारदर्शक व बिनचूक होण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण समजून घेण्याकरिता निवडणूक प्रशासनाकडून सर्व मतदान अधिकाऱ्यांना तीन वेळेस मतदान विषयक प्रशिक्षण देण्यात आले तसेच आज औधगिक प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी येथून टीम रवाना होण्यापूर्वी मतदान यंत्राची प्रत्यक्षात हाताळणी ( हॅंडस ऑन ट्रेनिंग) देण्यात आली त्यामुळे मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी १,२,३ यांनी प्रत्यक्षात मतदान यंत्र हाताळणी करून मॉक पोल करून घेतल्या मुळे सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी यांना पुनश्च एकदा मतदान प्रक्रिया समजल्या असल्याची खात्री करण्यात आली त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही.
उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष श्री राजेश काटकर निवडणूक निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थित आज स्ट्राँग रूम उघडण्यात आले.
मतदानच्या दिवशी उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सकाळी ६:३० वाजता मोकपोल करून सकाळी ७:३० वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकळून विविध उपक्रम राबविले असल्यामुळे निश्चित त्याचा फायदा होईल असे मत श्रीमती अरुणा संगेवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणाच्या ठिकाणी सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवनाची उत्तम व्यवथा करण्यात आली होती निवडणूक कामे यशस्वी होण्यासाठी युवराज पौळ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कृष्णा देशमुख सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,तसेच कांबळे मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी,श्री दत्ता गिनगिने,श्री रेड्डी व निवडणूक कामासाठी नियुक सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

विविध मागण्यासाठी अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी समितीचा रास्ता रोको

विविध मागण्यासाठी अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी समितीचा रास्ता रोको

 

पाथरी(प्रतीनीधी)पाथरी तालुक्यासह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय किसान व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.29) पाथरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्याला रेणुका शुगर साखर कारखाना कडून प्रतिसाद देण्यात आला असून 2 हजार 962 रुपये पहिली उचल त्यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग 61 वरील पोखर्णी टी फाटा येथे शनिवारी सकाळी 11.45 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनात तालुक्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते, माजलगाव तालुक्यातील आंदोलनकर्ते तसेच सांगली जिल्ह्यातून आलेले शेतकरी नेते सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महसूल व पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारखाना प्रतिनिधींशी संपर्क साधला. रेणुका साखर कारखान्याचे प्रशासनातील कर्मचारी यांनी ऊस दर संदर्भात लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतर आंदोलकांनी वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या भाषणांमध्ये, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी रेणुका शुगरवर ऊसदर वाढीच्या निर्णयासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. रेणुका शुगरकडून प्रतिटन सुमारे 3 हजारांच्या घरात दर जाहीर होणार असल्याची चर्चा खरी ठरल्याने कारखान्यांकडेही 3 इतर शेतकर्‍यांच्या अपेक्षांचे लक्ष वेधले गेले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत इतरही कारखान्याकडून मागील थकीत हप्ते व उत्तर भाव वाढ जाहीर होईपर्यंत संघर्ष करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

रेणुका शुगर्सचा २ हजार ९६२ रुपये प्रति मे. टन ऊस दर जाहीर

पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील श्री रेणुका शुगर्स लिमिटेड साखर कारखान्याने यंदाच्या २०२५ – २६ ऊस हंगामासाठी २ हजार ९६२ रुपये प्रति मेट्रीक टन एवढा ऊस दर शनिवारी(दि. २९)जाहीर केला आहे.ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभेने कारखान्याकडे मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत झालेल्या प्रत्यक्ष चर्चानंतर श्री रेणुका शुगर कारखान्याने ऊस दर जाहीर केला आहे.

 

 

आशिया खंडात सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार सांगणारा महात्मा फुले यांचा विचार महाराष्ट्रात रुजतो आहे का?

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण मोफत केले. मात्र, महात्मा फुले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.आशिया खंडात सर्वप्रथम मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा विचार मांडणारे पहिले शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने केलेला लेखप्रपंच.शिक्षण हे सर्व विकासाचा पाया आहे. त्याशिवाय मानवी विकास अशक्य आहे.त्यामुळे मागासवर्गीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी सर्वप्रथम शिक्षण हे प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षित केले आणि शिक्षणाची ही गंगा सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचवली.त्यांनी देशाला पहिली महिला लेखिका आणि मुख्याध्यापिका केली.त्यांच शैक्षणिक योगदान आजच्या एकविसाव्या शतकातही मार्गदर्शन करीत आहे.त्यांच्याच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना राज्यकर्त्यांनी घेतली आहे.त्यामुळेच शिक्षण हक्क कायदा हा सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत देत आहे.कोत्याही योजनांची संकल्पना महत्वाची आहे.ती संकल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली. खर तर सनातनी विचारांच्या लोकांना न जुमानता त्यांनी सर्वांना शिक्षण दिले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान ३९५ कलमाचे का लिहले? ३९४ किंवा ३९६ कलमाचे का लिहले नाही? तर त्याला कारण महात्मा फुले यांच्या विचारांचे म्हणता येईल. महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले, पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेचा क्रमांक ३९५ होता. त्यांची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान ३९५ कलमाचे लिहले.महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वाचे किती महत्वाचे स्थान दिले हे लक्षात येते. आज महात्मा फुले यांच्या विचारांचा शिक्षणात किती समावेश आहे? शिक्षण हे गरिबाच राहिलं आहे का? दिवसेंदिवस शिक्षणाच्या खर्चात वाढ होत आहे.त्यामुळे आपोआपच गरिब शिक्षणापासून वंचित राहणार आहे.उच्च शिक्षणाबद्दल सरकार थोडा जरी विचार करते का?उच्च शिक्षण इतके महागडं झालं आहे की, ते गरीबांना शक्य नाही.त्यामुळे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मोफत शिक्षणाचा वसा उच्च शिक्षण बहुजन मोफत करून करू शकतो.आज मागासवर्गीयांना मिळणारी शिष्यवृत्ती ही शिक्षणाचा खर्च भावते का हा प्रश्न.
भारत हा खेड्यांचा देश आहे.त्यामुळे इथं गावं,वस्ती, तांडे,वाडी आदिंची संख्या जास्त आहे.त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी असणं साहजिकच असणार आहे. मग, असा तुघलकी निर्णय निदान राज्यात अपेक्षित नाही. खरं तर शिक्षणाची कवाडं तांड्यावर आणि वाडी वस्तीवर उघडायला हवीत.महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिल गेलं पाहिजे.आशिया खंडात सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार सांगणारा महात्मा फुले यांचा विचार महाराष्ट्रात रुजतो आहे का? असा प्रश्न पडतो. १९ व्या शतकामध्ये शिक्षण क्रांती ही साधी गोष्ट नव्हती.कारण, त्यावेळी धर्माचा, अनिष्ट रूढी परंपरा यांचा समाजावर प्रभाव होता.त्यावेळी धर्माच्या ठेकेदारांनी मानसाला गुलाम बनवून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर ठेवले.आजही तिचं परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न एकप्रकारे केला जात आहे.राज्य सरकार राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर आवश्यक तेवढी तरतूद करते का?हा प्रश्न पडला पाहिजे.यापेक्षा धार्मिक स्थळांच्या विकासासाठी वारेमाप निधीची तरतूद केली जाते.मानवाच्या आवश्यक बाबींवर अधिक निधी दिला पाहिजे.अनावश्यक रिकामा भ्रष्टाचार करण्याकरिता इतरत्र निधी अधिक दिला जातो. ज्यामुळे मर्जीतील नेत्यांना याचा लाभ होईल.

विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आज तर २१ वे शतक आहे.असो,
आज २८ नोव्हेंबर, १८९० शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

– पदमाकर उखळीकर,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२

रविवारी नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ मा.खा. इमरान प्रतापगढी यांची जाहीर सभा

रविवारी नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ मा.खा. इमरान प्रतापगढी यांची जाहीर सभा

पाथरी, 27 नोव्हेंबर 2025(प्रतिनिधीं)येत्या रविवारी, 30 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद मैदान, पाथरी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पाथरी नगरपरिषद निवडणूकीमधील नगराध्यक्ष  पदाचे उमेदवार जुनैद खान व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ  महाराष्ट्राचे खासदार व राष्ट्रीय नेते मा.खा. इमरान प्रतापगढी उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचारसभा होणार आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करण्यासाठी आणि आपल्या विकास वचनांची माहिती देण्यासाठी ही जाहीर सभा आयोजित केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या बाजूने जनसंपर्काचा कार्यक्रम राबवत आहे. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या निवडणूक धोरणांची घोषणा करणार असून, नगरपरिषदेच्या विकासासाठी आपल्या योजना सादर करणार आहे.

खासदार इमरान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत होणारी ही सभा निवडणूक रणांगणातील एक महत्त्वाची घटना ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने यापूर्वी अनेक जनसंपर्क कार्यक्रम राबवले आहेत आणि यावेळीही त्यांच्या भाषणाची जनतेत उत्सुकता आहे. त्यांच्या भाषणात नगरपरिषदेच्या विकासासाठीच्या योजना, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील धोरणांवर भर दिला जाणार आहे.

परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबाजानी यांनी या सभेची माहिती एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, ही सभा दुपारी ११ ते २ वाजेच्या दरम्यान  सुरू होणार असून, जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींमध्ये एकाच वेळी होणार आहे. या निवडणुकीत एकूण 1 कोटी 7 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या जाहीर सभा, जनसंपर्क आणि नेत्यांच्या भाषणांचा ओघ सुरू झाला आहे.

या सभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या उमेदवारांच्या बाजूने जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर, नगरपरिषदेच्या विकासासाठीच्या योजना, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील धोरणांवर भर दिला जाणार आहे. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या विकास वचनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारतीय संविधान देशातील प्रत्येक धर्मियांचे संरक्षण करते – रानबा गायकवाड  मिल्लीया विद्यालयात संविधान दिन साजरा 

परळी(प्रतिनिधी)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे संविधान हे या देशातील प्रत्येक धर्मियांचे संरक्षण करते व सर्वांना समान संधी व न्याय देते असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले.ते 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने शहरातील मिल्लीया प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी बोलत होते.

26 नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त परळी वैजनाथ येथील मिल्लीया प्राथमिक व माध्यमिक शाळेत भव्य संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद अब्दुल गणी जवाद अली हे होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड हे होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले.

पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, हजारो जाती आणि अनेक धर्म असलेल्या भारतासाठी सर्व देशवासियांना समान संधी व समान न्याय, हक्क व अधिकार देणारी राज्यघटना लिहण्याचे कठीण काम होते.हे कठीण कार्य प्रज्ञावंत व जगातील महान विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिलया पेलले. जगातील सर्वोत्तम असे संविधान देशाला दिले.प्रत्येक व्यक्तीला एक मत,एक मुल्य हा सर्वात मोठा अनमोल असा दागिना बाबासाहेबांनी दिलेला आहे.बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असेही ते म्हणाले.यावेळी मुख्याध्यापक सय्यद अब्दुल गणी यांनीही संविधानावर आपले विचार मांडले. व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी जे हक्क आणि अधिकार दिले आहेत त्याचे संरक्षण केले पाहिजे असे सांगितले. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा , सुंदर शाळा या अभियानात मिल्लीया प्राथमिक व माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. त्याचाही याप्रसंगी मुख्याध्यापक गणी यांनी अभिमानाने उल्लेख केला.

कार्यक्रमापूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात भव्य संविधान गौरव प्रभात फेरी काढली . तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणारे उत्कृष्ट असे चित्र, संविधान गीते, संविधानावर आधारित नाटिका, पथनाट्य ,प्रश्न – उत्तर, ,असे विविध उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास सय्यद अझहर सिकंदर सय्यद अजहर अहमद, शेख खमरोद्दीन,श्रीमती सय्यदा निशात, शेख मेहराज, पठाण मोईज खान, मोहम्मद कलीमैद्दीन, श्रीमती शेख दस्तगीरजहा, शेख अयाज अहमद, श्रीमती निखत फातेमा, श्रीमती अन्सारी परवीन, सय्यद हम्मीद्दीन, सय्यद वहाज, शेख अब्दुल अजीज, शेख सादिक, शेख आखिब जावेद, अब्दुल हासिब, सय्यद मुस्दीख यांच्यासह विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.