Home Blog Page 6

पाथरी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी गणेश जत्ती तर सचिवपदी मुरलीधर गोंगे यांची निवड.

 

पाथरी (प्रतिनीधी)मराठी पत्रकार संघाची पाथरी तालुका कार्यकारीनी निवड रविवार ४ जानेवारी रोजी संपन्न झाली यात तालुकाध्यक्ष म्हणून गणेश जत्ती तर सचिवपदी म्हणून मुरलीधर गोंगे यांची निवड परभणी जिल्हा कार्यकारीणीच्या उपस्थितीत जाहिर करण्यात आली.

 

मुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्नित पाथरी तालुका पत्रकार संघाच्या निवडीची बैठक रविवार चार जानेवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटनिस प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. या वेळी प्रदेश प्पतिनिधी राजू हट्टेकर, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष मानोलीकर,उपाध्यक्ष किरण घुंबरे पाटील, जेष्ठ पत्रकार वडकुते यांची उपस्थिती होती.

या वेळी पाथरी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश जत्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव म्हणून मुरलीधर गोंगे, उपाध्यक्ष विठ्ठल प्रधान, कोषाध्यक्ष दत्ता ऊफाडे, सहकोषाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, सल्लागार अॅड श्रिपाद कोंत, सह सचिव उध्दवराव इंगळे, जिल्हा सदस्य धनंजय आडसकर, पत्रकार संघाचे जिल्हाप्रतिनिधी म्हणून किरण घुंबरे पाटील, संघटक अशोक नवघरे, सदस्य लक्ष्मन उजगरे, बाबा दाढेल, मनोज भदर्गे, शेख जलील यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.या वेळी नुतन कार्यकारणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी प्राचार्य नाईकवाडे, दिपके, घुंबरे पाटील, अॅड कोंत यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता उफाडे यांनी केले तर सुत्र संचलन मावळते तालुकाध्यक्ष धनंजय आडसकर यांनी केले. आभार विठ्ठल प्रधान यांनी मानले.

पाथरी आगारात सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची उपस्थिती 

पाथरी( प्रतिनिधी)पाथरी आगारामध्ये सुरक्षितता अभियानाचे उदघाटन पाथरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व ईश्वरी विश्वविद्यालयाचे योगिता बहेनजी व डॉ. मुक्ता वाकनकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी अपघात होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता व आपण जे काम करतो ते आनंदाने व प्रामाणिकपणे केले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच योगिता बहेनजी यांनी व्यसनामुळे मनावर ताबा राहत नाही व त्यामुळे

अपघाताचे प्रमाण वाढते व बहेनजी यांनी मी व्यसन करणार नाही याबाबत शपथ दिली तर डॉक्टर वाकनकर मॅडम यांनी अपघातामुळे जीवित हानी होऊन कौटुंबिक नुकसान होते. व व्यसनापासून दूर राहावे असेल मत व्यक्त केले.

तर आगार व्यवस्थापक हणमंत चपटे यांनी अपघाताची कारणे नमूद केली. तर स्थानक प्रमुख गजानन येडले यांनी आभार व्यक्त केले.तर सदर कार्यक्रमासाठी आगारातील सवानी जाधव, आगार लेखाकार देशपांडे, पाळीप्रमुख अरबाड, व आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

उद्या अँड. प्रकाश आंबेडकर यांची परभणीत सभा 

 

परभणी(प्रतिनिधी )परभणी महानगरपालिका सावध सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांची रविवारी(दि. ४) सकाळी ११ वाजता येथील राहुलनगर येथील मैदानावर प्रचार सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुद्दसीर असरार यांनी दिली.

परभणी मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.

 

__________

सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांची परभणीत प्रचारसभा -भाजप जिल्हा शाखेची पूर्वतयारी बैठक

परभणी(प्रतिनिधी)महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी मनपा निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी(दि. ५)दुपारी दोन वाजता येथील वसमत रस्त्यावरील विष्णू जिनिंग परिसरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेच्या पूर्वतयारी संदर्भात नुकतीच येथील भाजप जिल्हा शाखेचे बैठक संपन्न झाली.

या बैठकीस पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, माजी आमदार सुरेशराव वरपुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, डाॅ. पंडितराव दराडे, आकाशराव लोहट, डाॅ. केदार खटींग, प्रमोद वाकोडकर, रंगनाथराव सोळंके, बाळासाहेब जाधव, सारीकाताई पारवे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज म्हणजे जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी साताऱ्याजवळील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडूजी नेवसे असे होते. त्यांचे वडील गावचे पाटील होते. ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडायचे बंधन होते, त्याकाळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. असे असले तरी सावित्रीबाई मात्र निडर स्वभावाच्या होत्या. त्या लहान असतांना एका दुबळ्या मुलाचे फुले पळवणाऱ्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडवली होती तसेच त्यांच्या घरासमोरील झाडावर असणाऱ्या घरट्यातील पक्षांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारले होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा जोतीराव फुले यांच्याशी झाला. जोतीराव तेंव्हा तेरा वर्षाचे होते. त्याकाळी बालविवाहाची परंपरा होती, अगदी पाळण्यात देखील विवाह लावले जायचे. महात्मा जोतीराव फुले म्हणजे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक. जोतीरावांना मातृप्रेम लाभले नाही. त्यांच्या मावस भगिनी सगुणा यांनी त्यांचा सांभाळ केला. सगुणा इंग्रज अधिकाऱ्याकडे दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे. आपल्या जोतीरावने देखील इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे असे त्यांना वाटायचे. त्यांनी जोतीरावांना शिकण्यास प्रेरित केले. जोतीरावही शिकले नंतर जोतिरावांनी सावित्रीबाई यांनाही शिकवले. मुलींच्या शिक्षणाचे महत्व जाणून मुलींसाठी शाळा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ते नेहमी म्हणत एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते म्हणून १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाई फुले मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. या शाळेत सुरवातीला दोन मुली होत्या वर्षअखेर या शाळेतील मुलींची संख्या ४० ते ४५ पर्यंत पोहचली. या शाळेमुळे शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्री वर्गास ज्ञानाची कवाडे खुली झाली. पण हे चांगले काम त्याकाळातील सनातनी वर्गास रुचले नाही. मुली शाळेसाठी घराबाहेर पडू लागल्याने धर्म बुडाला अशी आरोळी ठोकत या सनातनी लोकांनी सावित्रीबाई व जोतीरावांच्या या महान कार्यास विरोध केला. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण गोळे फेकले. काहींनी तर अंगावर हात टाकण्याचाही प्रयत्न केला पण फुले दांपत्य डगमगले नाही. घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही. कितीही विरोध झाला तरी ध्येयापासून ते विचलित झाले नाही. जिद्दी व ध्येयवादी फुले दांपत्यांनी ज्ञानदानाचे आपले पवित्र कार्य चालूच ठेवले. जोतिरावांनी काढलेल्या शाळेत फुले दांपत्य व अन्य शिक्षक जीव ओतून शिकवत. विद्यार्थ्यांशी ते एकरूप होत त्यामुळे त्यांच्या शाळेची प्रगती लक्षणीय होती. त्यांच्या शाळेविषयी पुणे ऑब्जर्व्हर या दैनिकामध्ये २१ मे १८५२ मध्ये लिहिले होते, जोतीराव फुलेंच्या शाळेतील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त आहे कारण या शाळेत मुलींना शिकवण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळेपेक्षा चांगली आहे. १८६३ मध्ये फुले दांपत्यांनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरू केले. सावित्रीबाई त्याच्या प्रमुख होत्या. १८८५ पर्यंत ३५ विधवा ब्राह्मण स्त्रिया त्यांच्याकडे आल्या. त्यांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी केली. १८७४ साली काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा त्यांच्या घरात आल्या. या काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले त्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. यशवंतला शिकवून त्यांनी डॉक्टर बनवले. सण १८७७ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळात फुले दांपत्यांनी लोकांना खूप मदत केली. त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जेवणाखाण्याची सोय केली. सावित्रीबाईंनी केशवपन पद्धत बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करुन नाभिकांचा संप घडवून आणला. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे वाहिली. सावित्रीबाई फुले या मोठ्या साहित्यिकही होत्या. काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. १८९६-९७ साली पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला होता. प्लेग या जीवघेण्या आजाराने अनेकांचा जीव घेतला. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांची सेवा करु लागल्या. त्यांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समस्त मानवजातीला भूषणावह आहे म्हणूनच जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!

 

श्याम बसप्पा ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५

केकरजवळा येथे अनधिकृत पुतळ्यामुळे तणाव:पोलिसांचा कडक बंदोबस्त

 

 

मानवत(प्रतिनिधी) :तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी(दि. २९) रात्री अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा उभारण्यात आल्याची घटना उघडकीस आली. ही बाब समजताच परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सोमवारी सकाळी पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत सदर पुतळा हटविण्यात आला. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावात तणावपूर्ण शांतता आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक संदीप बोरकर यांनी माहिती देताना सांगितले की, पुतळा कोणी व कशा परिस्थितीत बसविला याचा तपास सुरू असून संबंधितांची चौकशी केली जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.गावातील अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. गावातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

 

पाथरीतील घरफोडीचे गुन्हे उघड; पाच लाखाचा मुद्देमाल जप्त ओमकारनगर, गौतमनगर, विठ्ठलनगर घरफोडीचे रहस्य उकळले; पोलिसांची मोठी कामगिरी

परभणी(प्रतिनिधी)पाथरी शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या सलग घरफोडी गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गौतमनगर, ओमकारनगर आणि विठ्ठलनगरसह विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांना सतर्क केले होते. मात्र, स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या सखोल तपासात हे गुन्हे उघड झाले असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकने या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. या कारवाईतून रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ५ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पाथरी शहरात अलीकडे घरफोडीचे गुन्हे वाढले होते. गौतमनगर येथे १२ डिसेंबरला दुपारी चार वाजता घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडून २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपासला होता. त्याचप्रमाणे विठ्ठलनगरात १७ डिसेंबरला झालेल्या घरफोडीत २ लाख ७७ हजार १०० रुपयांचा माल गायब झाला होता. माळीवाडा भागातही भरदिवसा १५ लाखांचे दागिने आणि १ लाख रोख रक्कम असा १६ लाखांचा फक्त उघडकीस आला होता. या गुन्ह्यांमुळे शहरवासीयांमध्ये अस्वस्थता वाढली होती. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हा शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने गुप्त माहितीच्या आधारावर सागर कॉलनी येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकचा शोध घेतला. पालकांच्या उपस्थितीत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या बालकाने ओमकारनगर, गौतमनगर आणि विठ्ठलनगर येथील घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीदरम्यान बालकाकडून १ लाख ६३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि अंदाजे ५ लाख ६ हजार ७५० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. हे मुद्देमाल चोरीला गेलेल्या घरांमधूनच सापडला असल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, कायद्यानुसार विधीसंघर्षग्रस्त बालकला पालकांच्या ताब्यात सोडण्यात आले असून, पोलिस कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्याबरोबरच पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, मुकेश बुधवंत, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, उत्तम हनवते, इमरान खान आणि गजानान क्षीरसागर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

पाथरी तालुक्यातील उमरा गावीही नुकतीच ९७ हजार २०० रुपयांचे सोने लंपासले गेले असून, अशा गुन्ह्यांवर पोलिसांनी आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या कारवाईमुळे पाथरी पोलिसांची कर्तबगिरकी अधोरेखित झाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गुन्ह्यांविरुद्ध सतर्कता बरोबरीने तपास सुरू असून, नागरिकांनीही घरटे सांभाळण्याचे आवाहन केले आहे. परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस विभाग सतत प्रयत्नशील आहे.DOC-20251229-WA0013.

पाथरीत अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचे नियोजन,पण रात्रीची लाट थांबत नाही! पथकाच्या आड वसुलीचा संशय दोन महिन्यात केवळ तीन वाहनांवर कारवाई;पोलिसांकडूनही महिनाभरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर एकही कारवाई नाही.

पाथरीत अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचे नियोजन,पण रात्रीची लाट थांबत नाही! पथकाच्या आड वसुलीचा संशय

दोन महिन्यात केवळ तीन वाहनांवर कारवाई

पाथरी(प्रतिनिधी): पाथरी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार शंकर हंदेश्वर यांनी विशेष पथके नेमली असली तरी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सोनपेठ-पाथरी रोड, पाथरी-तुरा रोड, पाथरी-हदगाव रोड आणि पाथरी-रेणापूर रोड या मार्गांवर हायवा /टिप्पर बिनबोभाट धावत असल्याने प्रशासनाची कारवाई संशयास्पद ठरली आहे. मागील दोन महिन्यांत फक्त दोन ट्रॅक्टर व एका टिप्परवर कारवाई करण्यात आली असून,”पथकाच्या आड अवैध वसुली चालू असल्याचे लांडगे ढोंग, कारवाई सोंग” अशी म्हण लोकप्रिय झाली आहे.

पाथरी तालुक्यातील नदीनाल्यांमधून अवैध वाळूची वाहतूक हा कायमचा प्रश्न आहे. तहसीलदार शंकर हंदेश्वर यांनी या समस्येला आळा घालण्यासाठी दररोज वेगवेगळी पथके तयार केली. त्यांनी स्पष्ट आदेश काढले की, अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करावी व वाहने जप्त करावीत. या आदेशानुसार महसूल कर्मचारी, पोलिस व स्थानिक पंच यांच्यासह पथके रस्त्यांवर फिरू लागली. मात्र, दिवसा शांत असलेल्या या रस्त्यांवर रात्री वाळू भरलेले हायवा व टिप्पर सुसाट धावतात,तरी पथकांना एकही वाहन सापडत नाही. हे गोड बंगाल समजायला नागरिकांना जड जात आहे.

नागरिकांमध्ये आता जोरदार चर्चा आहे की, पथकांचा वापर फक्त दिखावा म्हणून होत असून, त्यांच्या आड वाळू माफियांकडून वसुली सुरू आहे. “रात्रभर चालणारी अवैध वाळू वाहतूक सुरू असताना दोन महिन्यांत फक्त तीन वाहनांवर कारवाई? ही कारवाई संशयास्पद आहे,” असे स्थानिक शेतकरी व व्यापारी सांगत आहेत. सोनपेठ-पाथरी रोडवर रात्रभर सुमारे १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत टीप्पर चालु असतात परंतु पथक कुठे असतात ? पाथरी-तुरा रोडवर टिप्परची वर्दळ असते, तरी कारवाई नाही. हदगाव व रेणापूर रस्त्यांवरही असेच चित्र आहे. या मार्गांवरून वाळू पाथरी शहरासह ग्रामीण भागात त्यांचं बरोबर मानवत नेली जाते, ज्यामुळे स्थानिक नद्यांचे नुकसान होत आहे.

या प्रकरणाने तालुक्यातील सामान्य माणसांचा संताप वाढला आहे. “तहसीलदारांचे पथक रस्त्यावर फिरते, पण रात्रीची वाहतूक थांबत नाही. नक्कीच वसुली चालू असेल,” अशी चर्चा बाजारपेठेतून ते गावपट्ट्यात रंगली आहे. मागील दोन महिन्यांत केवळ दोन ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त करण्यात आले, तर रात्री बरेच वाहने धावतात. ही विसंगती प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

महाराष्ट्रभर अवैध वाळूचा प्रश्न गंभीर आहे. नांदेडमधील दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रमाणे, जालन्यात तहसीलदारांच्या ड्रायव्हरची लाचखोरी किंवा सोलापूरसारख्या ठिकाणी कोट्यवधी दंड अशा घटना घडल्या आहेत. पाथरीतही तशीच परिस्थिती असल्याचे दिसते. तहसीलदार हंदेश्वर यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे व रात्रीच्या पथकांना सक्रिय करावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा, वाळू माफियांचे मनोबल वाढेल व स्थानिकांचा विश्वास उडून जाईल.

oplus_8388610

नागरिक आता उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे. पाथरी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी खरी कारवाई होईल का हे पाहावे लागेल

पोलिसांकडूनही महिनाभरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर एकही कारवाई नाही

पाथरी, विशेष प्रतिनिधी – पाथरी तालुक्यात रात्रीच्या काळोखात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर आणि हायवा वाहनांचा धुमाकूळ सुरू आहे. सोनपेठ-पाथरी रोड, तुरा-पाथरी रोड आणि पाथरी-हातगाव रोडवर बिनबोभाट ही वाहने धावत आहेत, मात्र गेल्या एका महिन्यात पाथरी पोलिसांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही. या प्रकरणामागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर उदासीनतेचा आरोप केला आहे.

पाथरी तालुका परभणी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भाग असून, येथील प्रमुख रस्त्यांवर रात्री १० वाजता नंतर अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने सर्रास फिरताना दिसतात. सोनपेठ-पाथरी रोडवरून गोदावरी नदीच्या पात्रातून चोरट्या पद्धतीने उत्खनन केलेली वाळू लपवून वाहली जाते. तुरा-पाथरी रोड आणि पाथरी-हातगाव रोडवरही असेच टिप्पर आणि हायवा वाहनांचे फेरवे सुरू आहेत. ही वाहने विना नंबर किंवा बनावट नंबर लावून चालवली जातात, ज्यामुळे ओळखणे कठीण होते. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, “रात्रीच्या वेळी धडधडाट होत असते, पण पाथरी पोलिस कुठेही दिसत नाहीत. हे वाळू माफिया बिनधास्त धंदा चालवत आहेत.”

गेल्या एका महिन्यात पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा वाहनांची संख्या बरीच असावी, तरी एकही कारवाई झालेली नाही. याउलट, परभणी जिल्ह्यातील इतर भागांत मात्र कारवाया होत आहेत. उदाहरणार्थ, एप्रिल महिन्यात पाथरी पोलिसांनी पहाटे चार वाजता दोन टिप्पर जप्त केले होते. त्या वेळी चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल झाले, पण त्यानंतर मात्र पूर्ण शांतता. पाथरीत गोदावरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचेही समोर आले आहे. येथे शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप फोडणाऱ्या वाहनांवर स्थानिकांनी दगडफेक केली होती, ज्यामुळे वाळू माफिया आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला होता.

राज्य सरकार स्तरावर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक जारी करून पहिल्यांदा पकडल्यास ३० दिवस परमिट बंदी, दुसऱ्यांदा ६० दिवस आणि तिसऱ्यांदा कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आणि महसूल विभाग संयुक्त कारवाई करणार असल्याचे जाहीर झाले आहे. जाफराबादसारख्या ठिकाणी महसूल पथकाने विना नंबरचे टिप्पर आणि हायवा जप्त केले, तर सिंधुदुर्गात डंपर मालकाला १ लाख ६३ हजारांचा दंड ठोठावला गेला.

मात्र पाथरीत पाथरी पोलिसांकडून कारवाईचा पूर्ण अभाव असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. “रात्रीच्या गश्ती का होत नाहीत का ? होत असतील तर मग कारवाई का नीही? यामागे राजकीय दबाव आहे का की मानवी संसाधनाची कमतरता, हे शोधणे गरजेचे आहे,” असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सांगतात.अवैध वाळू वाहतूकमुळे सरकारचा महसूल लाखो मध्ये तोटा होतो,नद्यांचे पर्यावरण नुकसान होते आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

नागरिकांनीही जबाबदारी घ्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे. अवैध वाहतूक दिसल्यास तात्काळ परिवहन विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी. पाथरी तालुक्यातील हे वाळू माफियाचा खेळ आटोक्यात येण्यासाठी पाथरी पोलिस कारवाई आवश्यक आहे. प्रशासनाने तातडीने भरारी गश्त वाढवाव्यात, अन्यथा स्थानिकांचा रोष वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. ही बाब तपासली तरच अवैध वाळू वाहतूकवर खरंच नियंत्रण येईल.

सुपरस्टार राजेश खन्ना

सुपरस्टार राजेश खन्ना

हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची आज जयंती. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना यांचे मूळ नाव जतीन खन्ना असे होते. त्यांच्या आईचे नाव चंद्राणी खन्ना तर वडिलांचे नाव लाला हिराणी असे होते. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना त्या नातेवाईकांकडे दत्तक दिले. त्यांच्या नवीन आईचे नाव लीलावती खन्ना तर वडिलांचे नाव चुनीलाल खन्ना असे होते. चुनीलाल खन्ना रेल्वे कंत्राटदार होते. ते मुंबईत राहत होते. राजेश खन्ना हे सेंट सबिस्टाईन गॉन हायस्कूल येथे शिकत असताना त्यांची रवी कपूर यांच्याशी ओळख झाली. रवी कपूर म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र. राजेश खन्ना व जितेंद्र यांनी कॉलेज जीवनात अनेक नाटकात एकत्र काम केले. नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी राजेश खन्ना हे पुण्यात आले. पुण्यात दोन वर्ष शिक्षण घेतल्यावर ते पुन्हा मुंबईला परतले. मुंबईत काही दिग्दर्शकांनी टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली. राजेश खन्ना यांच्या काकांनी त्यांचे नाव या स्पर्धेकरिता नोंदवले. ते नोंदवताना त्यांनी त्यांचे नाव जतीन खन्ना ऐवजी राजेश खन्ना म्हणून नोंदवले पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. या स्पर्धेत त्यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. त्यांच्या अभिनयाने त्याकाळातील दिग्गज दिग्दर्शक प्रभावित झाले. १९६६ साली चेतन आनंद यांनी त्यांना आखरी खत या चित्रपटात संधी दिली हाच त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट ऑस्करला गेला होता. पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने चित्रपट रसिक तसेच जाणकार प्रभावित झाले त्यामुळे त्यांना अनेक चित्रपट मिळाले. त्याकाळातील यशस्वी दिग्दर्शक असणारे शक्ती सामंत यांनी त्यांना आराधना या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. या चित्रपटात शर्मिला टागोर या त्यांच्या नायिका होत्या. चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. या चित्रपटा नंतरच राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. राजेश खन्ना यांची अदाकारी, संवाद फेकीची लकब यावर तरुणाई फिदा झाली. विशेषतः कॉलेज मधील मुली त्यांच्यावर जीव ओवाळून टाकू लागल्या. त्यांचे चाहते त्यांच्या गाडीचे चुंबन घ्यायचे. मुली त्यांच्या गाडीची धूळ आपल्या भांगेत भरत. बऱ्याचश्या मुलींनी त्यांच्या फोटोशी लग्न केले होते. त्यांना चाहत्यांचे जितके प्रेम लाभले तितके प्रेम कोणत्याच कलाकाराला लाभले नाही. राजेश खन्ना यांचे सलग १५ चित्रपट सुपरहिट झाले हा एक विक्रम आहे. तो अजूनही कोणत्या अभिनेत्याला तोडता आला नाही. शर्मिला टागोर, मुमताज, अशा पारेख, तनुजा यांच्याशी त्यांची चांगली केमिस्ट्री जमली. सत्तरच्या दशकात राजेश खन्ना सुपरस्टार पदावर आरूढ झाले होते. चालण्या बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची अनोखी शैली, जबरदस्त संवाद फेक आणि ओठावर रुंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. त्याकाळात सर्वाधिक मानधन घेणारे राजेश खन्ना यांची प्रेम प्रकरणेही गाजली पण १९७३ साली त्यांनी आपल्या पेक्षा कितीतरी लहान वयाच्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. १९९२ साली काँग्रेसच्या वतीने त्यांनी दिल्ली मतदार संघातून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी चाहत्यांना अलविदा म्हणत जगाचा निरोप घेतला आणि बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार काळाच्या पडद्याआड गेला.

“बाबूमोशाय……. बाबू मोशाय जिंदगी और मौत उपरवाले के हात है जहाँपणा…जिसे ना तो आप बदल सकते है ना मै…. हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है, जीसकी डोर उपरवालेकी उंगलीओमे बंधी है….कब कोण कैसे उठेगा कोई बता नहीं सकता…..” आनंद कभी मरते नहीं वह हमेशा याद रहते है….
we all miss you…..
राजेश खन्ना यांना विनम्र अभिवादन!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

देशहितासाठी काँग्रेसने कधीच तडजोड केली नाही;प्रसंगी पक्षाला पणास लावले!

 

काँग्रेसच्या १४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये गेल्या दशकभरात काँग्रेसची झालेली पिछेहाट लक्षात घेता , काँग्रेसला नव्याने उभारी घेण्यासाठी समाजकारण किंवा राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयाबाबत थोडीशी फारकत घेण्यास भाग पडावे लागेल,भलेही ते शक्य नसले तरी.काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी १०० % राजकारण करण्यावर काँग्रेसने भर दिला पाहिजे असे एकंदरीत देशाच्या राजकारणाच्या कलाटणीमुळे वाटते. कारण, केवळ राजकारण न करता काँग्रेसने सत्तेत असताना आणि सध्या विरोधात असतानाही अनेक देशहिताच्या योजना आणि निर्णय घेतले. मात्र, या निर्णयाचे किंवा राष्ट्रहिताच्या योजनेचे काँग्रेसला राजकारण करता आले नाही, असे म्हटले तर योग्य होईल. कोणताही निर्णय सध्याच्या घडीला घेत असलेला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केवळ राजकारणाचा आणि सत्तेचा दृष्टिकोन समोर ठेवून निर्णय घेताना दिसतो आहे. याला कोणीही नाकारणार नाही. कारण, गेल्या दशकभरातील अनेक निर्णय सत्तेच राजकारण समोर ठेवून घेतल्याचे जाणवेल. राष्ट्रहिताच्या दृष्टीने समाजकारण करण्याचा अजेंडा आता कोणत्याही राजकीय पक्षाचा सध्यातरी दिसत नाही आणि हाच अजेंडा काँग्रेसच्या रक्तात नाही. हे काँग्रेसची आजच्या घडीला कमजोर बाजू म्हणता येईल.यापेक्षा काँग्रेसच्या रक्तात सत्तेचा वापर केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाचा हे रक्तात नाही. सत्तेचा मार्ग हा राजकारणातून जात असला तरी लोकशाहीची लक्तरे करून सत्तेचा मार्ग शोधणे मुळीच संविधानाला अपेक्षित नाही. कारण लोकशाहीची व्याख्या लोकांच्या जीवनामध्ये रक्तहीन अमुलाग्र बदल झाला पाहिजे अशी आहे.असे असताना याउलट सत्तेचा वापर केवळ सत्तेसाठी कसा करता येईल , यासाठीची गोळा बेरीज करण्यात आणि कसे निर्णय घेण्यात आजचे सत्तेतील पक्ष तरबेज आहेत. राजकारणाची पुरती दिशा बदलली असून, राष्ट्रहिताचे निर्णय घेणे सध्याच्या राजकारणात बसत नाही म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यासाठी काँग्रेसने निदान लोकशाहीच्या मूल्यांसाठी राजकारण करण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. लोकशाहीने दिलेला बंधुभाव- स्वातंत्र्य -समता ही मूल्ये जपायची असतील तर राजकारण करण्याच्या पद्धतीला थोडी काँग्रेसने कलाटणी दिली तर संविधानिक मूल्य जिवंत राहतील , अन्यथा संविधानिक मूल्य मरणासन्न अवस्थेत आहेत. गेल्या दशकभरातील राजकारण पाहता साम- दाम -दंड -भेद हे राजकारणाचे मुख्य अंग झाले आहे. विचारसरणी ,पक्षनिष्ठा, लोकशाही लोकमुल्य, तत्त्वनिष्ठपणा, मानसन्मान , आदर याला कुठेही थारा नाही. जनतेच्याही बौद्धिक पद्धतीत साम -दाम- दंड- भेद हीच मूल्य रुजवून, संविधानिक आणि लोकशाही मूल्य पुरती डोक्यातून काढण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा काही काळ या पद्धतीचा वापर करता आला तर लोकशाहीतील संविधानिक मुल्य जपली जातील. मात्र त्यासाठी काँग्रेसला राजकारण करण्याच्या दिशेत बदल करावा लागेल. त्यातूनच परिवर्तन अटळ आहे. तसेच, देशातील सर्वच लोकशाहीवादी राजकीय विचारसरणीच्या पक्षांना सोबतीला घेऊन त्यांचा सन्मान ठेवून, एकत्र संविधानिक मूल्य तर वाचतील आणि काँग्रेसही पुन्हा उभारी ही घेईल. देशातील बहुतांश जनता संविधान मूल्य लोकशाही या तत्त्वांना बाजूला करून वैचारिक गुलाम झाली आहे. त्यासाठी देशातील भाजपच्या सहयोगी संघटना मदत करीत असतात. देशात वैचारिक गुलामगिरी लादली असून, यातून बाहेर पडण्यासाठी जनतेला स्वतः यापासून दूर ठेवता आले पाहिजे.

राजकारण सत्तेसाठी आणि सत्ता राजकारणासाठी असे समीकरण सध्याच्या राजकारणाचे झाले असून राष्ट्रहिताच्या निर्णयासाठी किंवा लोक कल्याणसाठी राजकारण आणि सत्तेचा वापर करण्याचे तत्व, धोरण आता दुरापास्त झाले आहे. पण यामुळे लोकशाहीला घरघर लागल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी मतदारांसह लोकशाहीवादी राजकीय पक्षांची आहे .त्यासाठी काही काळ तोच मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल. मात्र, लोकशाहीची होत असलेली घरघर वाचविण्यासाठी जनतेने आणि लोकशाही मूल्य जपणाऱ्या राजकीय पक्षांनी याचा विचार अगत्याने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. काँग्रेसचा देदीप्यमान राजकीय इतिहास आणि सत्तेतील राष्ट्र हिताची धोरणे यामुळे देश आणि नागरिक इथपर्यंत आला आहे . तसेच भारत देशाला वेगळी ओळख भारतीय संविधानामुळे निर्माण झाली आहे . केवळ बिल्डिंग आणि रस्ते बांधून विकसित भारत होत असेल तर नागरिकांचे संविधानिक हक्क तुडवून विकसित भारत होत असेल तर हा भारत पुन्हा गुलामगिरीत जाईल आणि गरीब श्रीमंत यांच्यातील दरी वाढून, श्रीमंत गरिबांचे शोषण करून त्यांना गुलाम बनवतील .यासाठी काँग्रेससह देशातील जनतेने बळकट होणे आवश्यक आहे. भाजपला किंवा एनडीएला नडणारा एकच पक्ष सध्यातरी राष्ट्रीय राजकारणात दिसतो तो म्हणजे काँग्रेस. याचा अर्थ इतर पक्ष भाजपला नडत नाहीत असे म्हणण्याचा मतलब नाही. पण, भाजप विरोधात कोणता पक्ष असा ठळकपणे सवाल केला तर उत्तर काँग्रेसच येईल. बाकीच्या भाजपविरोधी पक्षाचे राजकारण प्रासंगिक असते.हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. काँग्रेसचा इतिहास हा देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे काँग्रेसला देशातील प्रत्येक कानाकोपरा माहीत आहे. अशा काँग्रेसला आज १४० वर्षे पूर्ण होतायत. १४० वर्षाच्या काँग्रेसने संविधान मुल्य जपली आणि पुढेही जपली जातील. सत्तेच्या सोपानासाठी काँग्रेसने कधीच लोकशाही मुल्याशी छेडछाड केली नाही. असे त्यांच्या सत्ताकाळातील निर्णयावरून लक्षात येते.पण, जनतेच्या लक्षात कधी येईल? हा प्रश्न. आज गांधी -गांधी म्हणून जंगजंग पछाडलेल्या भाजपने राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे गांधी यांचे नाव बदलून टाकले आहे. व्यक्ती द्वेषाचे राजकारण देश रसातळाला गेला तरी सुरू आहे. काँग्रेसच्या इतिहासात गांधी परिवाराचे देशासाठीचे योगदान अनन्यसाधारण आहे. जनतेच्या हिताच्या निर्णयासाठी काँग्रेसने कधीच तडजोड केली नाही. प्रसंगी पक्षाला त्यांनी पणास लावले. गांधी परिवारातील हत्या आणि विद्यमान विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचा त्याग कुणासाठी हे काँग्रेसींना आणि देशातील जनतेला अवगत झाले तर काँग्रेस पक्षाचे आजचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही.हे देशासाठी आणि काँग्रेससाठीही.

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९६३७६७९५४२.

kalpadmakarukhlikar@gmail.com.