पाथरी(विशेष प्रतिनिधी)पाथरी शहरालगत असलेल्या अंजली मंगल कार्यालयात लिटल फ्लावर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरे झाले. या कार्यक्रमात छोट-छोट्या बालक-बालीकांनी आपले विविध कलागुण सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मराठी संस्कृतीचा गंध आणि परंपरेचा स्पर्श असलेल्या या स्नेहसंमेलनाने सर्वांनाच मराठी मातीचा अभिमान जागवला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचे स्मरण. विद्यार्थ्यांनी अशोक सराफ, लक्ष्मिकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या चित्रपटांतील प्रसिद्ध गाणी आणि दृश्ये नाट्यरूपात सादर केली. या कलागुणांमधून मराठी चित्रपटसृष्टीने दिलेले अमूल्य योगदान प्रेक्षकांसमोर उलगडले. यामुळे मराठी सिनेमा आणि त्याच्या कलाकारांचा इतिहास बालमनांमध्ये रुजवण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत या बालकलाकारांना जोरदार दाद दिली.
स्नेहसंमेलनाची सुरुवात पाथरी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आशेफ खान यांच्या हस्ते झाली. प्रमुख पाहुणे म्हणून सेलुचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,मुंजाजी भाले पाटील, डॉ.राजेंद्र वाकणकर प्रा. शिवराज नाईक, अशोक गिराम, ऍड. तळेकर, डॉ.गजानन उगले, डॉ.नामदेव मुळे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,मुकेश राठोड, डॉ.मानवतकर,ॲड.बि.जे गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाप्रदर्शनाचे कौतुक करत शिक्षण आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.नगराध्यक्ष आशेफ खान यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि स्थानिक विकासासाठी शाळेच्या योगदानाची प्रशंसा केली.
कार्यक्रमात सुंदरी-सुंदरी तुझं नाव काय गं, मनुजा तू जाग,आली माझ्या घरी ही दीवाळी,तिळ-गुळ घ्या गोड-गोड बोला,अंग कुणी रुसायच नाही कुनी पुसायच नाही तुझ्या साडीला सर्फ लावुन धुवुन टाक,ही गाणी तसेच लक्ष्मिकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांवर बालकलाकारांनी थिरकले. या गाण्यांवर प्रेक्षकांनी उद्ध्वस्त होऊन टाळ्या आणि शिट्या वाजवल्या. नृत्य, नाट्य, गायन यांमधून महाराष्ट्रातील संस्कृती आणि विविध जाती-धर्मांचा सलोखा दाखवण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. हे प्रदर्शन केवळ मनोरंजन नव्हते तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन शाळेचे प्रमुख डॉ. अतुल भाले पाटील, शिल्पा पेन्शनवार, खुर्शीद देशमुख, विशाल पेन्शनवार तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांच्या अथक परिश्रमाने शक्य झाले. दीग्दर्शन रुपेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे संचालन अतिशय उत्तम रीतीने केले. त्यांच्या विनोदी आणि ओघवत्या भाष्यामुळे वातावरण आणखी उत्साही झाले. शाळेच्या या उपक्रमाने पाथरीतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले आहे
लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल ने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्नेहसंमेलन हा उपक्रम यशस्वी करून पाथरी शाळा कार्यक्रम क्षेत्रात आघाडी घेतली. हे स्नेहसंमेलन केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन नव्हते तर मराठी बालकलाकार आणि मराठी संस्कृती यांचा उत्सव होता. अशा कार्यक्रमांमुळे पुढील पिढीला आपली ओळख जपण्यास प्रेरणा मिळते.
मानवाच्या प्रगतीच माध्यम शिक्षण आहे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.त्यामुळे शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. कसल्याही परिस्थितीत शिक्षण घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघीणीचे दूध म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर भारताचा पाया रचला. शिक्षणाचे महत्त्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केलेल्या डिगऱ्या पाहिल्यावर लक्षात येते. त्यांची विद्वत्ता यातून दिसून येते. जागतिक किर्तीचा तत्ववेत्ता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव होतो .हा भारताचा सन्मान म्हणावा.
जगातील उच्च शिक्षण संस्थेत त्यांचा आदर्श आणि त्यांचा अभ्यास विद्यार्थी करतात.त्यांची विकासाची दूरदृष्टी अनेक देशांत अभ्यासली जाते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय आहेत. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी. एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई .त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेस इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट- लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. आंबेडकर हे भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.
उस्मानिया विद्यापीठ हे भारतातील तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे.हैदराबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खान यांनी २९ ऑगस्ट १९१७ रोजी त्याच्या निर्मिती केली. हे दक्षिण भारतातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आणि पूर्वीच्या हैदराबाद राज्यात स्थापन झालेले पहिले विद्यापीठ आहे.२०२३ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार उस्मानिया विद्यापीठ जगात १२०१-१४०० आणि आशियातील विद्यापीठांमध्ये ४०१-४५० क्रमांकावर आहे. द टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने २०२३ च्या रँकिंगमध्ये जागतिक स्तरावर १२०१-१५०० स्थान दिले आहे . २०२२ मध्ये आशियामध्ये ३०१-३५० आणि इमर्जिंग इकॉनॉमीज युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये ३०१-३५० क्रमांक आहे.भारतात, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कने २०२४ मध्ये उस्मानिया विद्यापीठाला भारतीय विद्यापीठांमध्ये ४३ वे आणि एकूण ७० वे स्थान दिले आहे. या उस्मानिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी १९५३ रोजी डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) ही मानद पदवी प्रदान केली होती, ज्यात त्यांच्या महान कार्याचा, बुद्धिमत्तेचा आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला आहे . त्यांनी केलेल्या सामाजिक आणि तत्कालीन अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जीवनभर वर्षे संघर्ष केला . जगातील सर्वात मोठे भारतीय संविधान लिहिले. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना डि.लिट.पदवी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावर अनेक पदव्या मिळाल्या.डॉक्टर ऑफ लॉ ही सन्माननीय पदवी ५ जून १९५२ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने प्रदान केली. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक’ असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे. डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) ही सन्माननीय पदवी १२ जानेवारी १९५३ रोजी तेलंगाणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने प्रदान केली. भारतीय बौद्ध विशेषतः आंबेडकरी अनुयायी आंबेडकरांना ‘बोधिसत्त्व’ व ‘मैत्रेय’ मानतात. इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना ‘बोधिसत्व’ संबोधले होते. आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. विकसित भारताचा पाया संविधानात शिल्पित केला आहे. त्या संविधान निर्मात्याला उस्मानिया विद्यापीठातून १९५३ साली डिलीट पदवी देण्यात आली. आज त्याला ७३ वर्षे पूर्ण होतील.अशा मानद पदव्या आंबेडकरी अनुयायी संपादन करतील आणि विद्यापीठ स्तरावर सुध्दा अशाच विद्वानांचा पदवी देऊन सन्मान केला जाईल, या अपेक्षेसह केलेला शब्द प्रपंच.
भारतीय संस्कृतीत सणांना अतिशय महत्व आहे. प्रत्येक सण विशिष्ट असा संदेश देत असतो. या सणातून एक वेगळीच प्रेरणा मिळत असते. मकर संक्रात हा त्यापैकीच एक सण. मकर संक्रात हा वर्षातील पहिला सण त्यामुळे या सणाचा उत्साह काही निराळाच असतो. मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात तर या सणाला खूप महत्व दिले जाते. मकर संक्राती म्हणजे सूर्याने मकर राशीत प्रवेश करणे. सूर्य ज्या दिवशी दक्षीयणातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. ही तिथी कधी १४ जानेवारीला येते तर कधी १५ जानेवारीला येते. यावर्षी ही तिथी १४ जानेवारीला आली आहे. संक्रात ऐन थंडीत येते त्यामुळे हवेत गारवा असतो त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो. त्यामुळे या दिवसात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी उष्ण पदार्थ खाल्ले जातात. तीळ आणि गूळ यात उष्मांक अधिक प्रमाणात असतो. कदाचित त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटला जातो. संक्रातीच्या दिवशी तीळ आणि गूळ यांच्या वड्या किंवा लाडू एकमेकांना देण्याची पद्धत आहे. तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा संदेशही दिला जातो. एकमेकांविषयी स्निग्धता देणारे तीळ आणि गोडवा देणारा गूळ एकत्र आल्याने प्रेमाचे नाते टिकते असे प्रतिकात्मक रूपही या सणाला आहे. एकमेकांशी असलेली कटुता भांडण विसरून एकत्र येण्याचा संदेश देणारा हा सण आहे. मकर संक्रातील विवाहित स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावून सौभाग्याचे वान देतात. हे सर्व करण्यामागे कोणतीही रूढी परंपरा नसून नव्याने स्वागत आणि त्यातून आनंद घेणे हा आहे. पूर्वी स्त्रियांना एकत्र येण्याची संधी क्वचितच मिळत असे या सणानिमित्त महिला एकत्र येत असे. आजच्या धकाधकीच्या जीवनातही महिलांना एकत्र येण्याची संधी क्वचितच मिळते त्यामुळे संक्रातीनिमित्त मिळणारी ही आयती संधी महिलावर्ग सोडत नाहीत. मकर संक्रांत हा सण महिलांचा सण असे मानले जात असले तरी लहान मुलेही या सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. अनेक गावात पतंगोत्सव आयोजित केला जातो. या दिवशी आकाशात विविध रंगांची, आकाराची पतंगे उडताना दिसतात. पतंगाचे विविध आकार रंग पाहून मन प्रसन्न होते. एकमेकांशी असलेली कटुता विसरून प्रेमाने वागा असा संदेश देणारी मकर संक्रात म्हणजे आनंदाची पर्वणीच. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
परभणी(प्रतिनिधी)महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस ॲक्शन मूडमध्ये असून शनिवारी(दि. ११)रात्री बारा ते दोन या दरम्यान एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमधून शहरासह जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आणि न्यायालयीन वॉरंटमधील आरोपींची धरपकड करण्यात आली.
मोहिमेदरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्निशास्त्र परवानाधारकांची घरझडती घेण्यात आली. तसेच घातक शस्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरांची देखील झाडाझडी घेण्यात आली. या दरम्यान एक तलवार, खंबीर ताब्यात घेण्यात आली. गुन्हेगारी टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या हालचालींना आळा घालण्याच्या दृष्टीने हे कोम्हिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या ऑपरेशनमध्ये वॉरंट आणि गुन्ह्यांमध्ये फरार असलेले एकूण ६२ आरोपी अटक करण्यात आले असून अवैधशास्त्र बाळगणाऱ्या ५८ आरोपींची घरझडती घेण्यात आली. मोहिमे दरम्यान परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील झरी येथील ज्ञानेश्वर उद्धव पवार(वय ३०) याच्या घरातून एक तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्याच्यावर परभणी ग्रामीण पोलीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरात वींद्र सिंग नानकसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर याच्या ताब्यातून एक खंजीर घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणी शहरात नाकाबंदी दरम्यान एका मोटरसायकल स्कुटी धारकाकडून पाच लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. वसंत शंकरराव जटाळ(वय ४७) रा. ज्ञानेश्वर नगर साखला प्लॉट हे वाटीका हॉटेल वसमत रस्ता येथे मॅनेजर असल्याचे सांगितल्यावर एफएसटी पथकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
Oplus_131072
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि आपण पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी, २५ पोलीस अधिकारी, अमलदारानी, १९ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि १९० पोलीस अंमलदार यांच्या सहभागातून पार पडली.
पाथरी(प्रतिनिधी)लिंबा येथील योगेश्वरी शुगर कारखान्याकडून शेतकऱ्यांची आडवणूक केली जात असल्याचा आरोप करत कारखान्यासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने साखर आयुक्तालय यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लिंबा येथील योगेश्वरी शुगर हा कारखाना येथील कर्मचारी तोडणीदार आणि वाहतूकदार यांनी मिलीभगत करून शेतकऱ्यांच्या नोंदीप्रमाणे ऊस तोडणी करून गाळपास घेऊन न जाता त्यांची पैशांसाठी आडवणुक करत असून जे शेतकरी एकरी पाच ते दहा हजार रुपये देतील त्यांच्याच उसाची तोड करून गळफास घेऊन जात आहेत असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निवेदनात केला आहे.
त्यामुळे लहान क्षेत्र असलेले आणि गरीब शेतकरी यांच्या ऊसाची तोडणी तारीख उलटून दोन ते तीन महिने होऊ नये ऊस तोडणी अभावी जागेवर उभा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तीन दिवसात कारखान्याने आमचा ऊस तोडणी करून गाळपास घेऊन गेले नाही तर 15 जानेवारीला कारखान्यासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाचा देण्यात आला आहेया निवेदनावर सुदाम कोल्हे, डिगंबर कोल्हे, बालासाहेब शेळके, मुकुंद कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, ऋषिकेश कोल्हे, नारायण कोल्हे, निवास कोल्हे, गोविंद कोल्हे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन पाथरी उपयोगी अधिकारी कार्यालय यांनाही देण्यात आले आहे.
पत्रकारितेत‘पॉझिटिव्ह-निगेटिव्ह’ असा काही प्रकार नाही; ती केवळ सत्याच्या शोधाची आणि समाजाचा आरसा दाखवण्याची प्रक्रिया आहे. सार्वजनिक आयुष्यात वाढत्या भ्रष्टाचाराच्या आणि गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ही जाणीव अधिक ठळकपणे पुढे येते.
समाजाच्या आरशातले खरे प्रतिबिंब
आजच्या काळात अनेकदा पॉझिटिव्ह पत्रकारिता आणि निगेटिव्ह पत्रकारिता असे लेबल्स सहज लावले जातात. एखादी बातमी सामाजिक दृष्ट्या प्रेरणादायी, विकासकामांवर आधारित किंवा एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कार्यावर प्रकाश टाकणारी असेल, तर तिला लगेच पॉझिटिव्ह बातमी म्हटले जाते. उलट, भ्रष्टाचार, अन्याय, गैरव्यवहार, शासकीय निष्काळजीपणा किंवा लोकप्रतिनिधींचे गैरकृत्य उघड करणाऱ्या बातम्यांना अनेकजण निगेटिव्ह पत्रकारिता असे नाव देतात. परंतु पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांकडे पाहिले, तर पत्रकारितेतच ‘पॉझिटिव्ह’ वा ‘निगेटिव्ह’ असे वर्गीकरणच अप्रामाणिक आहे. पत्रकारितेचे कार्य म्हणजे घडणाऱ्या घटना, निर्णय आणि परिणाम यांचे सत्यसमोर मांडणे – ते समाजाला रुचेल की नारूचेल, हा दुय्यम प्रश्न आहे.
भ्रष्टाचाराचा सर्वव्यापी फैलाव
आपल्या सभोवतालचे वास्तव पाहिले, तर भ्रष्टाचार हा सार्वजनिक जीवनातील मोठा विषाणू बनून बसलेला दिसतो.
– शासनव्यवस्थेतील विविध स्तरांवर
– स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
– शासकीय कंत्राटे, खरेदी प्रक्रिया
– परवानग्या, मंजूर्या, प्रमाणपत्रे
या सर्व क्षेत्रांत “अनियमितता, दलाली, कमिशनखोरी आणि नियमबाह्य निर्णय”मोठ्या प्रमाणावर आढळतात. नागरिकांना रोजच्या आयुष्यात पडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या कामासाठीही मध्यस्थ, शिफारस किंवा आर्थिक व्यवहारांची गरज भासते, हीच सर्वत्र पसरलेल्या भ्रष्ट व्यवस्थेची लक्षणे आहेत.
महसूल व प्रशासनातील अवैध धंदे
विशेषतः”महसूल प्रशासन” हे सामान्य नागरिकाच्या आयुष्यात थेट परिणाम करणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. जमीन नोंदणी, सातबारा उतारे, जमिनीचे प्रकार बदलणे, मालकी हस्तांतरण, मापे, नकाशे, परवानग्या – या सर्व प्रक्रियांमध्ये
– बनावट कागदपत्रे,
– बेकायदेशीर व्यवहार,
– स्थानिक गुन्हेगारी गटांचा हस्तक्षेप,
– राजकीय दबाव
यांचा संगनमताने वापर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येतात. येथे चालणारे “अवैध धंदे”केवळ आर्थिक अपहारपुरते मर्यादित नसून, त्यांनी अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर घाला घातलेला असतो. पत्रकाराने या व्यवहारांतील सत्य शोधून ते समाजासमोर आणले, तर ही बातमी *निगेटिव्ह* कशी ठरू शकते? उलट, ही तर भ्रष्ट व्यवस्थेला आरसा दाखवण्याची आणि नागरिकांना सावध करण्याची सकारात्मक लोकशाही कृती आहे.
शासनाच्या योजनांमधील भ्रष्टाचार
शासन विविध योजनांद्वारे सामान्य नागरिकांसाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देते – पायाभूत सुविधा, घरकुल, रोजगार हमी, शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला-बालकल्याण अशा अनेक क्षेत्रांत योजना राबवल्या जातात. पण वास्तवात काय घडते?
– योजना कागदोपत्रीच राहणे
– पात्र लाभार्थ्यांऐवजी ठराविक गटांपर्यंतच लाभ पोहोचणे
या सर्व प्रक्रियांना‘शासनाच्या विविध योजनांतील भ्रष्टाचार’ असे थोडक्यात नाव दिले जाते. अशा भ्रष्टाचारामुळे समाजातील सर्वांत दुर्बल घटकांची हक्काची मदत त्यांच्या हातात न पोहोचता मधल्या स्तरांमध्येच गायब होते. या गोष्टींचे आकडे, पुरावे, नागरिकांच्या साक्षी, तज्ज्ञांचे मत यांसह सखोल वृत्तांकन केले तर काहीजण त्याला *निगेटिव्ह* म्हणतात. पण प्रत्यक्षात अशा बातम्या लोकशाहीतील जबाबदेहतेचा पाया मजबूत करतात.
राजकीय नेतृत्व आणि नीधीचा गैरवापर
लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते हे संविधान आणि कायद्याचे रक्षणकर्ते असावेत, अशी लोकशाहीची अपेक्षा असते. पण अनेकदा आपल्याला उलट चित्र दिसते.
– कायद्याचा वापर राजकीय सूड साधण्यासाठी
– आपल्या समर्थकांच्या गैरव्यवहारांवर पांढरे कुंपण
– कंत्राटे, निविदा, पदे, संस्थांमध्ये नियुक्त्या यांत पक्षपाती निर्णय
– तपास यंत्रणांवर दबाव
अशा प्रकारे शासनाचा नीधी आणि रचना यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे अनेक उदाहरणे वेळोवेळी उघडकीस येतात. पत्रकाराने अशा प्रकरणांचा शोध घेतला, कागदपत्रे उघडकीस आणली, साक्षीदारांशी बोलून वस्तुस्थिती समोर ठेवली, तर ते काम नक्कीच सोपे नसते. समाजातील काही गट, राजकीय समर्थक किंवा लाभार्थी वर्ग अशा पत्रकारांना लगेच निगेटिव्ह, विकृत,पक्षपाती अशा नावांनी हिणवू लागतात. परंतु वस्तुस्थिती अशी की, राजकीय शक्तीसमोर न झुकता प्रश्न विचारणे हेच खरे पत्रकाराचे काम आहे. अधिकारांच्या गैरवापरावर प्रकाश टाकणे हा लोकशाहीतील सर्वांत महत्त्वाचा पहारा आहे.
निगेटिव्ह’ हे लेबल की दबावाचे साधन?
आज घडामोडींच्या रिपोर्टिंगमध्ये दिसणारा एक धोकादायक कल म्हणजे अनुकूल नसलेल्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांना जाणीवपूर्वक ‘निगेटिव्ह’ असे नकारात्मक लेबल लावणे
– भ्रष्टाचार उघड करणारा रिपोर्ट आला, की संबंधित गट म्हणतो – “हे सगळं निगेटिव्ह आहे.”
– शासकीय निष्काळजीपणा दाखवणारी बातमी आली, की म्हणतात – “देशाची/राज्याची बदनामी होते.”
– नागरिकांच्या संतापाचे, आंदोलनांचे वृत्तांकन झाले की – “फक्त वाईटच दाखवता.”
ही भाषा केवळ भावनिक नाही, तर पत्रकारांवर मानसिक दबाव आणण्याचे, त्यांची विश्वासार्हता डागाळण्याचे आणि त्यांना गप्प करण्याचे साधन म्हणून वापरली जाते. अशा दबावाला बळी पडून माध्यमे जर ‘फक्त गोड बातम्या’ शोधू लागली, तर समाजाला वास्तवापासून दूर नेणारे एक बनावट आरसेच उभे राहतील.
पत्रकाराचे मूळ कर्तव्य
याच ठिकाणी प्रश्न येतो पत्रकाराचे खरे काम काय?
पत्रकाराचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे:
– सत्य शोधणे
– तथ्य पडताळणे
– दोन्ही बाजू मांडणे
– परिणाम समजावून सांगणे
– आणि समाजासमोर संपूर्ण चित्र ठेवणे
हे करताना पत्रकाराने लोकप्रियतेचा किंवा प्रतिमेचा विचार न करता,नागरिकांच्या हिताचा विचार केला पाहिजे. जेव्हा तो अवैध धंदे, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अन्याय यांबद्दल लिहितो, तेव्हा तो नकारात्मकता पसरवत नाही; उलट सुधारणेची शक्यता निर्माण करतो. चुकीचे जेथे आहे तेथेच बोट ठेवणे, ही पत्र करायचं काम आहे – आणि ते टाळणे हेच खरेतर समाजद्रोह ठरू शकते.
पत्रकारिता – केवळ पत्रकारिता, समाजाचा आरसा
यामुळेच पत्रकारितेला ‘पॉझिटिव्ह’ वा ‘निगेटिव्ह’ असे विभागणे हे मूळ संकल्पनेलाच हरताळ फासणारे आहे. पत्रकारिता म्हणजे
– नोंद
– प्रश्न विचारणे
– विश्लेषण
– आणि समाजाचे प्रतिबिंब दाखवणे
समाजात जे घडते, ते वास्तव जसंच्या तसं दाखवणं – कधी प्रेरणादायी, कधी कठोर, कधी अस्वस्थ करणारे – हेच तिचे कार्य. आरशात कसा चेहरा दिसेल, हे आरशावर अवलंबून नसते; ते त्यासमोर उभ्या असलेल्या प्रतिमेवर अवलंबून असते. तसेच पत्रकारितेतही आहे. म्हणूनच“पॉझिटिव्ह पत्रकारिता” आणि “निगेटिव्ह पत्रकारिता” असा भेद नाही; आहे ती फक्त जबाबदार, निष्पक्ष आणि तथ्याधारित पत्रकारिता.समाजाचा खरा आरसा म्हणून उभे राहणे, हेच तिचे सर्वोच्च कार्य आहे – आणि ते पार पाडणाऱ्या प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी समाजाने प्रामाणिकपणे उभे राहण्याची वेळ आता आली आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच ५ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी दू:खद निधन झाले.सुरेश कलमाडी आणि पुणे हे नाव जवळजवळ देशभरात पण त्याहूनही ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या फळीतील महाराष्ट्रातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. सुरेश कलमाडी २०१४ पर्यंत पुण्यातून संसद सदस्य होते . भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष असताना २०१० साली भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.२०१० साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचे विरोधकांनी आरोप केले आणि त्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्यावर कट रचणे, बनावटगिरी, गैरवर्तनाचा आरोप ठेवण्यात आला होता आणि नंतर एप्रिल २०१४ मध्ये त्यांना अटक करण्यात आली , परंतु अद्याप त्यांच्यावर खटला चालवण्यात आला नव्हता.नंतर त्यांची दोषमुक्त सुटका झाली. यावरून राजकारण केले गेले की काय?हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना अनेक राजकीय पदं दिली. खरं तर काँग्रेस कार्यकर्त्याचा नेता बनवते.१९७७ मध्ये, कलमाडी पुणे भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि पुढे त्यांनी महाराष्ट्रातील युवा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले, हे पद त्यांनी १९७८ ते १९८० पर्यंत भूषवले. म्हणजे १९७७ ला पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते पुढच्या वर्षी म्हणजे १९७८ ला महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष.हा त्यांच्यातील नेतृत्वगुण म्हणता येईल.१९८० मध्ये, महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून, कलमाडी यांनी मॉस्को ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मॅरेथॉन संघाच्या निवड चाचण्या घेतल्या. यामुळे लवकरच पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची स्थापना झाली.पुण्याला राजकीय आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात सुरेश कलमाडी यांचा मोठा वाटा आहे.कलमाडी यांची राजकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. १९८१-१९८६ पर्यंत भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले .ते १९८२ ते १९९६ आणि पुन्हा १९९८ मध्ये तीन वेळा राज्यसभेचे सदस्य होते . कलमाडी यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि १९८९ मध्ये पुणे महोत्सव सुरू केला. १९९६ मध्ये ते ११ व्या लोकसभेवर आणि २००४ मध्ये १४ व्या लोकसभेवर निवडून आले. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात , सुरेश कलमाडी यांनी १९९५ ते १९९६ पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्याच वर्षी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचा विश्वासू चेहरा म्हणून सुरेश कलमाडी महाराष्ट्र आणि भारतभर ओळखले जात होते.क्रिडा क्षेत्रातही त्यांनी खूप काम केले आहे.१९९६ ते २०१२ पर्यंत भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी २००० ते २०१३ पर्यंत आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि २०१५ मध्ये त्यांना त्याचे आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. अशा अनेक महत्त्वाच्या घटनात्मक पदावर त्यांनी काम केले.त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताला क्रीडा क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली होती. कलमाडी यांनी २००७ मध्ये भारतीय ऑलिंपिक असोसिएशन म्हणून फॉर्म्युला वन ग्रांप्री भारतात आणण्यासाठी करार केला. त्याच वर्षी नंतर, यूके-स्थित आयोजक फॉर्म्युला वन अॅडमिनिस्ट्रेशन लिमिटेडने भारत-स्थित जेपीएसके स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत या संदर्भात १६ अब्ज डॉलर्सचा (२०२३ मध्ये ४८ अब्ज डॉलर्स किंवा ५७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या समतुल्य ) करार केला. त्यांच क्रिडा क्षेत्रात भारताला वेगळ्या उंचीवर नेले हे कोणीही मान्य करेल.
सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती आणि त्यांनी सुमारे १० महिने तुरुंगवास भोगला, परंतु नंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत; त्यामुळे त्यांना कोणतीही मोठी शिक्षा झाली नाही, उलट २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना क्लोजर रिपोर्ट देऊन दोषमुक्त केले. मात्र त्यांना झालेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेची जबाबदारी आता कोण घेईल. काँग्रेसला यांचा परिणाम झाला पक्षाच्या प्रतिमा नाहक मलिन करणाऱ्यांना आता कोणती शिक्षा द्यावी? ज्याचा परिणाम केवळ काँग्रेस नाही तर अख्खा देश भोगतो आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि शेवटी त्याचे काय झाले हे उघडउघड आहे पण, ज्यांना भ्रष्टाचाराची नाहक राळ उठवून सत्तांतर घडवून आणावयाचे होते ते मात्र घडले पण, सुरेश कलमाडी यांच्यासारख्या ज्यांची महाराष्ट्रभर काँग्रेसी म्हणून ख्याती होती. ती त्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याने काँग्रेस हतबल होत गेली. तीच हतबलता काँग्रेसच्या विद्यमान नेत्यांवर आल्यामुळे काँग्रेसने उभे केलेले नेतृत्व आजघडीला सत्ताधारी पक्षात जातांना आपण बघतो आहोत. असो, पण माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पक्षाशी एकनिष्ठता सोडली नाही आणि अखेरचा श्वास काँग्रेस पक्षातच घेतला!
पाथरी (प्रतिनिधी) – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका सध्या अवैध धंद्यांच्या सुळसुळाटामुळे चर्चेत असून, मटका, अवैध दारू, गुटखा, अमली पदार्थ तसेच रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतूक या सर्व प्रकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी पोलिसांचे मौन, निष्क्रियता आणि कथित मूक संमती यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ आहे का?” असा सवाल जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.
मटका,अवैध दारू, गुटखा आणि अमली पदार्थांचे उघड धंदे,अवैध वाहतुक माहितीनुसार,पाथरी शहरासोबतच तालुक्यातील ग्रामीण भागातही मटका, अवैध दारू विक्री, गुटखा पुरवठा आणि अमली पदार्थ यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट आवळले जात आहे.काही भागात मटक्याच्या चिट्या खुलेपणाने फिरताना दिसत असून,लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत अनेक जण या व्यसनाधीन जुगारप्रकारात ओढले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.अवैध दारूच्या अड्ड्यांमुळे गावागावांत भांडणे,घरगुती कलह, अपघात आणि गुन्हेगारी वाढत असल्याचीही नोंद नागरिकांकडून करण्यात येत आहे. गुटखा आणि संबंधित पदार्थांवर बंदी असतानाही चोरट्या मार्गाने पुरवठा होऊन टपरी, किराणा दुकाने आणि चौकाचौकात हे पदार्थ सहज उपलब्ध असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.यासोबतच अमली पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याची गंभीर चर्चा पालकांमध्ये सुरू असून, युवकांच्या भवितव्यावर काळी छाया पडत असल्याची भीती व्यक्त होत आहे
पाथरी तालुक्यात मटका जुगाराचे उघड अड्डे
पाथरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात“कल्याण मुंबई” नावाचा मटका“बिंगो”नावाचा मटका मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. या मटका जुगारातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, यातून स्थानिक युवक आर्थिक गर्तेत ओढले जात आहेत,अशी भीती व्यक्त केली जात आहे. या मटका केंद्रांच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना असताना, ती पोलिसांना माहीत नसणे अशक्य असल्याची कुजबुज गावागावात सुरू आहे.
अवैध दारू, गुटखा आणि अमली पदार्थांचा उघड व्यापार
पाथरीत अवैध दारू विक्रीसह अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. गुटखा,सुगंधित पानमसाला, बनावट शिक्क्यांची दारू,तसेच तरुणांना शरीरसाठी घातक ठरणारे अमली पदार्थ खुलेआम विक्रीस उपलब्ध असून, शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातही त्याचा प्रभाव जाणवू लागल्याचे पालक सांगत आहेत.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय असूनही,आजवर कोणतीही गाजलेली मोहीम किंवा मोठ्या प्रमाणावर छापे न पडणे,हा प्रश्न अधिकच गडद करणारा ठरत आहे.
पोलिस कारवाईचा अभाव आणि हप्तेखोरीचा संशय
स्थानिकांच्या मते, पाथरी पोलिसांकडून या अवैध धंद्यांवर कोणतीही ठोस, सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने,“कर्तव्यापेक्षा आता हप्ता मोठा झाला का?असा उपरोधिक सवाल जनतेतून विचारला जात आहे.अनेक व्यापाऱ्यांच्या कुजबुजीनुसार, अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी, नियमित हप्त्यांच्या बदल्यात पोलिसांकडून जणू मूक संमती दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.यामुळे पाथरी शहराबरोबरच ग्रामीण भागातही अवैध धंदेवाले दिवसाढवळ्या आणि रात्री उघडपणे मिरवताना दिसत असून,“हप्तेखोरीमुळेच अवैध धंद्यांचा नंगानाच सुरू आहे का?”असा प्रश्न उपस्थित होतो.
रात्रभर सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक
गोदावरी व स्थानिक नद्या–नाल्यांजवळून रात्रभर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून दिली जात आहे. मोठ्या ट्रॅक्टर–ट्रॉली,भरधाव ट्रक,डंपर यांच्या साहाय्याने वाळूची चोरी होऊन ती बांधकाम व्यावसायिकांपर्यंत पोहोचते; या सर्व प्रक्रियेत मोठ्या रकमेचे व्यवहार होत असल्याचा संशय आहे.या वाहतुकीचा आवाज, धूळ आणि रस्त्यांची नासधूस यामुळे रात्री नागरिक त्रस्त असतानाही,रात्रीच्या गस्त पथकांचे अस्तित्व केवळ कागदावरच आहे का,असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.
“पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का?” – जनतेचा सवाल
पाथरीत चालणाऱ्या या सर्व अवैध धंद्यांच्या जाळ्याबाबत नागरिकांचा ठाम प्रश्न असा आहे “पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे अवैध धंदे इतक्या निर्भयपणे चालू शकतात का?”पोलिस ठाण्याच्या हद्दीत असंख्य अवैध अड्डे सुरू असताना, केवळ किरकोळ, दिखाऊ कारवाया करून खऱ्या सूत्रधारांना मोकळे सोडले जात असल्याचा आरोप होत आहे. यातूनच, वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत काहींचे आर्थिक साखळीतील हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.
बाजारपेठ, बसस्थानक परिसर, काही वसाहती आणि ग्रामीण भागातील चौक–गल्लींमध्ये मटका,अवैध दारू, गुटखा आणि अमली पदार्थांचे अड्डे कोणत्या वेळेस सुरू होतात आणि केव्हा बंद होतात, हे सर्वसामान्य नागरिकांना माहित असताना, पोलिस मात्र वारंवार “माहिती मिळाल्यास कारवाई करू” या पद्धतीची भूमिका घेत असल्याचे दिसते. यामुळेच स्थानिक स्तरावर “पाथरी पोलिसांनी माफियांकडून हप्ते बांधून घेतले आहेत असा थेट आरोप केला जात आहे.नागरिकांच्या मते, मुख्य सूत्रधारांना हात न लावता, केवळ किरकोळ बाळगणाऱ्यांवर कारवाई करून आकडेवारी वाढवली जात आहे.
पाथरी तालुक्यातील वाढत्या अवैध धंद्यांवर स्थानिक पत्रकारांनी सलगपणे बातम्या प्रकाशित करताच संबंधित पत्रकारांवर दबाव टाकण्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. या प्रकरणात आयजी स्तरापर्यंत तक्रारीचा धागा पोहोचत असल्याची चर्चा होत असून, पोलिस यंत्रणेची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
पाथरी तालुक्यात दारू, जुगार, मटका, वाळू तस्करीपासून इतर विविध अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लोकांसमोर आणली. या बातम्यांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली, तर दुसरीकडे या धंद्यांना आश्रय देणाऱ्या राजकीय व प्रशासकीय स्तरावरही अस्वस्थता वाढली, अशी स्थानिकांचे म्हणणे आहे.याच पार्श्वभूमीवर, पाथरी तालुक्याच्या हद्दीमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या बातम्या प्रकाशित केल्यानंतर काही पत्रकारांवर पाथरी पोलिसांकडून एकतर थेट दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय. संबंधित पत्रकारांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून बातम्यांचा पद्धतशीर लेखाजोखा विचारला जात असल्याचे सांगितले जाते. काहींना “अशी वृत्तांकन नको”, “वरून ऑर्डर आहे”, “बातम्या सौम्य करा” अशा इशाऱ्याच्या स्वरूपात सूचना दिल्या गेल्याचा आरोप पत्रकारांकडून व्यक्त केला जात आहे.याहून गंभीर बाब म्हणजे, अवैध धंद्यांवरील बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांचे मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक माहितीच अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या काही व्यक्तींना पुरवली जात असल्याची चर्चा रंगली आहे.या माध्यमातून संबंधित पत्रकारांवर अप्रत्यक्ष दबाव, धमकी, तसेच सामाजिक-राजकीय स्तरावर बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. “काय लिहितोस, कोणाच्या सांगण्यावर लिहितोस” अशा स्वरात थेट फोन कॉल,रात्री उशिरा येणारे अज्ञात कॉल, सोशल मीडियावरील ट्रोलिंग यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
अवैध धंद्यांवरील बातमी प्रकाशित करणाऱ्या काही पत्रकारांविरुद्ध खोट्या तक्रारी तयार करण्याची, वाहतूक व इतर किरकोळ प्रकरणांतून त्यांना अडकवण्याची भाषा काही दलालांकडून केली जात असल्याचेही समोर येत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे “अवैध धंद्यांवर बातमी केली तर पत्रकार होतो लक्ष्य” अशी भीती नव्या पत्रकारांमध्ये निर्माण होत आहे. अनुभवी पत्रकार मात्र हे सर्व हेरगिरी, दडपशाही आणि बदनामीचे डावपेच असल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत.
पत्रकार संघटनांचा आरोप आहे की,अवैध धंद्यांविरोधात पाथरी पोलिसांकडून ठोस, सातत्यपूर्ण कारवाई करण्याऐवजी उलट त्या धंद्यांचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांवरच चौकशीचा ससेमिरा लावला जातोय. अशा प्रकारची भूमिका हा लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर सरळ हल्ला असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. पत्रकारांवरील दबावामुळे निष्पक्ष वृत्तांकनाला गंड बसणार, भ्रष्टाचार व अवैध धंद्यांविरोधातील लोकमत कमकुवत होणार, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.कायदा तज्ज्ञांच्या मते, पत्रकारांवर अशाप्रकारे दबाव आणणे, त्यांची वैयक्तिक माहिती तृतीय व्यक्तीकडे देणे, धमकी देणाऱ्या परिस्थिती निर्माण करणे हे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नसून कायदेशीरदृष्ट्याही गुन्हेगारी कृत्याच्या कक्षेत येऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये मानवाधिकार आयोग, पत्रकार सुरक्षा कायदा (जिथे लागू आहे) तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कडक चौकशी होऊ शकते.या प्रकरणी आयजी स्तरावर सविस्तर चौकशी करून पाथरी तालुक्यातील अवैध धंदे आणि त्यावर पडदा टाकण्याच्या कारवायांचा संपूर्ण तपास व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनांतून होत आहे. तसेच, अवैध धंद्यांविरोधात बातमी करणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे, हेल्पलाइन आणि तात्काळ कारवाईची यंत्रणा निर्माण करण्याची गरजही या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी काय कारवाई करणार,याकडे पाथरी शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पाथरीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम सुरू असलेले विविध अवैध धंदे आणि त्यात काही पोलिसांच्या कथित हितसंबंधांबाबतचे आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची जनतेची मागणी जोर धरत आहे.परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी हे कठोर आणि परिणामकारक कारवाईसाठी ओळखले जातात. जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वाहतूक, गंभीर गुन्हे व संघटित गुन्हेगारीविरोधात अनेक मोहीमा राबवल्या असून कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पाथरीतील परिस्थितीकडे ते कोणत्या पद्धतीने पाहतात, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे
मानवत(प्रतिनिधी)येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर स्विकृत सदस्य म्हणून प्रकाश पोरवाल आणि ॲड. अनिरुद्ध पांडे यांच्या नावांना अधिकृत मान्यता देण्यात आली. दुपारी १.३० वाजता नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी राणी अंकुश लाड यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात झाली. यावेळी मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी त्यांना सहकार्य केले.
उपनगराध्यक्षपदासाठी डॉ. अंकुश लाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. स्विकृत सदस्यपदासाठी प्रकाश पोरवाल, ॲड. अनिरुद्ध पांडे आणि चिंचोड अन्सारी मतीन तखी असे तीन अर्ज दाखल झाले. मात्र नगरपालिकेतील राजकीय संख्याबळ लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश पोरवाल व ॲड. अनिरुद्ध पांडे यांच्या निवडीवर नगराध्यक्ष राणी अंकुश लाड यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, नगरपालिकेचे अभियंता शेख अन्वर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राजकुमार खरात, नियमत खान पठाण, संजय बागड, किशोर लाड, अनुराधा राजेश वासुंबे, ज्योती विष्णू आळसपुरे, नंदिनी गणेश मोरे, द्वारका दत्ता चौधरी, वृषाली विनोद रहाटे, मीरा मोहन लाड, रेखा बाजीराव हलनोर, भाग्यश्री स्वप्निल शिंदे, सुशीला बालाजी लाड, रूपाली गणेश उगले, डॉ. देवयानी राजेश दहे तसेच उबाठा गटनेते दीपक बारहाते यांचा समावेश होता. याशिवाय ॲड. विक्रमसिंह दहे, शैलेंद्र कत्रुवार, मो. बिलाल मो. युनूस बागवान, शेख जावेरिया बेगम, विभा भदर्गे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यापारी, ज्येष्ठ नागरिक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सोनपेठ प्रतिनिधी:-(सुभाष सावंत) सोनपेठ तालुक्यातील कोठाळा ता सोनपेठ. जि.परभणी गावचा तरुण युवक धनंजय शिवाजी बोचरे ( भोसले) वय वर्ष ३८ यांनी यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतजमीन नापीक झाल्यामुळे पीक कर्ज फेडणे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण. स्वतःचे व्यसन या सर्वांची सांगड बसत नव्हती. तो सतत आर्थिक विवंचनेत असल्यामुळे जास्तीचे व्यसन करू लागला होता. नैराशी पोटी तो कुटुंबीयां सोबत बोलून दाखवायचा.दि ८ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे स्वतःच्या शेतात गेला. शेत सर्वे नंबर ४६/२ डिगोळ शिवारात असलेल्या जांभळीच्या झाडाला स्वतःने गळफास लावून घेऊन स्वतःचे जीवन संपवले. धनंजय बोचरे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले वृद्ध आई-वडील यांचे संगोपन करणारा करता पुरुष गेला आहे. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनंजय च्या अकाली आत्महत्येची कोठाळा गगावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोनपेठ पोलीस स्टेशन येथे. धनंजय चे नातेवाईक रावसाहेब बोचरे यांच्या फिर्यादीनुसार अकाली मृत्यू २/२६ नुसार नोंद घेऊन पो नी अशोक गीते यांच्या आदेशाने पो हे १२७ जाधव व त्यांचे सहकारी पुढील कार्यवाही करत आहेत.