Home Blog Page 3

अवैध चाकू वापरणारा पोलिसांच्या ताब्यात  -परभणी शहरातील ग्रँड कॉर्नर परिसरातील घटना

 

परभणी(प्रतिनिधी)शहरातील एपना कॉर्नर ते ग्रँड कॉर्नर दरम्यान एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना सोमवारी(दि. १२)रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

संतोष विठ्ठल घोडके(वय २४) रा. सिरसम बुद्रुक ता. जि. हिंगोली असे आरोपी युवकाचे नाव आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानलपेठ पोलिसांचे पोलिस उपनिरीक्षक बिक्कड, पोलिस हवालदार बिक्कड, पोलिस अंमलदार शेख अल्ताफ, असिफ शेख असे शहरात गस्त घालत असताना अपना कॉर्नर ते ग्रँड कॉर्नर दरम्यान एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असताना मिळून आला. त्यास तातडीने ताब्यात घेऊन पंचासमक्ष घडती घेतली असता त्याच्याकडे धारदार चाकू मिळून आला.

या प्रकरणी पोलिस अंमलदार निलेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी युवकाविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याच्या विविध कलमान्वये नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी पोलिसांच्या बीट अंमलदारावर अवैध धंद्याचा संशय:खात्यातील भागीदार शोधण्याचे आवाहन पाथरीतील अवैध वाळु उपसा व वाहतूक मध्ये बीट अंमलदाराची भागीदारी

पाथरी, विशेष प्रतिनिधी:पाथरी तालुका हा अवैध धंदा साठी नेहमीच चर्चेत असलेला भाग आहे. मटका,बिंगो नावाचा मटका,पत्याचे क्लब, अवैध दारू विक्री आणि गुटख्याच्या व्यवसायाने येथील रस्ते भरून गेले आहेत. आता या प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे – चक्क बीट अंमलदारच त्यांच्या बीटमधील अवैध धंद्याचे भागीदार झाल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. पाथरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील काळात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून,बीट अंमलदारांच्या व्हीआयपी गाड्यांनी खळंबळ उडवली आहे.

पाथरी शहर हे आता अवैध धंदे चालकांचे माहेरघर बनले आहे. पान टपऱ्या, चौकात सर्रास मटका, डिंगो नावाचा मटका, चिट्टी देऊन चालवला जातोय, तर ग्रामीण भागात त्याचे क्लब क्लब आणि अवैध दारूची, गुटखा व अमली पदार्थ विक्री जोर धरून आहे. प्रतिबंधित गुटखा तर किराणा दुकानांपर्यंत पोहोचला असून, लहान शाळकरी मुलांनाही त्याच्या व्यसनाने विळख्यात घेतले आहे. पोलीस प्रशासनाची वाचक राहिलेली नाही, ही बाब सर्वसामान्यांमध्ये संताप निर्माण करतेय.या पार्श्वभूमीवर बीट अंमलदारांच्या हालचालींनी खळंबळ उडाली आहे. अवघ्या काही महिन्यांत त्यांच्या बीटमधून मिळालेल्या कमाईने मोठमोठ्या व्हीआयपी गाड्या, नागड्या कंपनीची मोबाईल, खरेदी केल्याचे दिसतंय.याचा स्पष्ट अर्थ असा होतो की,अवैध मटका जुगार आणि इतर धंद्यांमधून त्यांनी मोठी संपत्ती जमवली आहे.पाथरीत अवैध धंद्यांचे वादळ नवीन नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या काळात या धंद्यांचे मोठे पेव फुटले होते. त्यांच्या बदलीनंतर महेश लांडगे हे रुजू झाले आणि त्यांनी रुजू होताच हे सर्व बंद केले होते. मात्र, लांडगे यांची बदली होताच लक्ष्मण केंद्रे हे निरीक्षक म्हणून रुजू झाले आणि पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले. पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळु उपसा वाहतुक, मटका,बिंगो नावाचा मटका, बुकी, पत्याचे क्लब,आणि दारू विक्रीचा जोर वाढला. शहरासह ग्रामीण भागात हे चित्र स्पष्ट दिसतंय.या प्रकरणातील मजेशीर बाब म्हणजे, बीट अंमलदारच अवैध धंद्याचे भागीदार झाल्याची चर्चा. तालुक्यातील सामान्य लोकांमध्ये ही बातमी झंझावाती वेगाने पसरली आहे.बीट अंमलदारांकडे आलेल्या व्ही- व्हीआयपी गाड्या, नागड्या कंपनीचे दोन-दोन मोबाईल यावरून त्यांचे अवैध धंद्यावाल्यांशी जवळचे संबंध असल्याचे कयास बांधले जातायत. आता प्रश्न उपस्थित होतोय – वरिष्ठ स्तरावरून या बीट अंमलदारांचा सीडीआर काढून त्यांचे संबंध उघड होतील का? पाथरी पोलीस ठाण्यात अवैध धंद्यांना अभय देणाऱ्यांचा वावर काय आहे? आणि संबंधित अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई होईल का? ही चर्चा शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भागातही जोर धरून आहे.

पाथरी तालुक्यातील हे चित्र केवळ स्थानिक समस्या नाही. महाराष्ट्राच्या इतर भागातही अशा अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद मिळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.नागपूर परिक्षेत्रात पोलीस निरीक्षकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून, अशा प्रकरणांमध्ये सापळा कारवाया झाल्या आहेत. पाथरीतही असाच कठोर तपास व्हावा,अशी मागणी तालुक्यातील नागरिक करतायत.पोलीस प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा पाथरी पोलीस यांचा धाक उरणार नाही, असा सवाल उपस्थित होतोय.या प्रकरणाचा पाठपुरावा करत प्रतिनिधीने पाथरी शहरात पायरी टाकली असता, चौकांमध्ये मटका चिट्टी,बिंगो नावाचा मटका,अवैध वाळु उपसा व वाहतुक खुलेआम असल्याचे चित्र दिसले. ग्रामीण भागात पत्याचे क्लब, चालू असल्याची खात्री पटली.अवैध धंद्यांना कोणाचे अभय आहे, हा प्रश्न तालुक्यातील प्रत्येक तोंडावर आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ तपास सुरू करावा, ही अपेक्षा आहे. पाथरी तालुका पुन्हा गुन्हेगारीचा अड्डा होऊ देणार नाही, याची खात्री देण्याची वेळ आली आहे.

पाथरी पोलीस प्रशासनात खळबळ: बीट अंमलदारांच्या ‘मोबाईल’मध्ये दडलंय वाळूमाफियांचे गुपित;सीडीआर काढण्याची मागणी पोलिसांवर अवैध धंद्यांना पाठिंबा दिल्याची चर्चा;खात्यातील संबंधांच्या चौकशीची मागणी

पाथरी (बातमीदार): परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून, यामागे पोलिसांमधील काही बिट अंमलदारांचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. “कर्तव्यासाठी एक आणि अवैध धंदेवाल्यांशी बोलण्यासाठी दुसरा” अशा दोन मोबाईल क्रमांकांचा वापर काही अंमलदार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच अवैध धंद्यांवर कारवाई होण्याआधीच त्यांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचते,असा आरोप केला जात आहे.

दोन मोबाईल आणि संशयाचे जाळे

 

 तालुक्यातील गोदावरी नदीतून होणारा वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक रोखण्याची जबाबदारी असलेल्या बिट अंमलदारांवरच आता संशयाची सुई वळली आहे. हे अंमलदार शासकीय कामांसाठी एका मोबाईलचा वापर करतात, तर अवैध वाळू माफियांशी संपर्क साधण्यासाठी वेगळ्या नंबरचा वापर करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

खात्यातील संबंधांच्या चौकशीची मागणी

केवळ वाळूच नव्हे, तर इतरही अवैध धंद्यांमध्ये काही पोलिसांची थेट भागीदारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाळूचे ट्रक आणि ट्रॅक्टर सहजपणे पास करून देण्यासाठी अंमलदारांना आर्थिक फायदा होत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सीडीआर तपासल्यास सत्य बाहेर येणार?

संबंधित बिट अंमलदारांचे सीडीआर (Call Detail Record) तपासल्यास, ते कोणत्या वाळू माफियांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचे हितसंबंध काय आहेत, हे स्पष्ट होईल, अशी मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी त्यांचे लोकेशन कुठे होते आणि ते कोणाशी बोलत होते, याची चौकशी केल्यास मोठे गौप्यस्फोट होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

जनतेत संताप, वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष

पाथरी तालुक्यात अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असून, नागरिक त्रस्त आहेत. काही पोलिसांच्या कथित सहभागामुळे संपूर्ण पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाथरी पोलीस दलात खळबळ: ‘खाकी’ डागाळली? अवैध धंद्यांच्या भागीदारीतून जमवली लाखो रुपयांची माया!

 

गुन्हेगारांवर वचक बसवून सर्वसामान्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी असलेल्या पाथरी पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कारनामे सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या काही काळापासून पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात झालेला अमुलाग्र बदल आणि अवैध धंदेवाल्यांशी वाढलेली जवळीक पाहता, ‘रक्षकच भक्षक’ बनले आहेत की काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती? नागरिकांच्या भुवया उंचावल्या

 

पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा पगार मर्यादित असतानाही, त्यांच्याकडे आलेली लाखो रुपयांची मालमत्ता आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात किंवा शहरात वावरताना हे कर्मचारी महागड्या व्हीआयपी गाड्यांमधून फिरताना दिसतात. इतकेच नाही तर, त्यांच्या हातात असलेले किमती आयफोन,महागडे फोन आणि अन्य महागडे गॅजेट्स पाहून सामान्य जनता अवाक झाली आहे. “एवढ्या कमी पगारात इतकी आलिशान जीवनशैली येते कुठून?” असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

अवैध धंदेवाल्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी पोलीस ठाण्यात सध्या सर्वसामान्य तक्रारदारांपेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांचा वावर अधिक वाढला आहे. मटका, जुगार, अवैध वाळू उपसा आणि छुप्या पद्धतीने चालणाऱ्या इतर व्यवसायांच्या मालकांशी काही पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याची चर्चा आहे. काही पोलीस कर्मचारी तर या अवैध धंद्यांमध्ये थेट भागीदार असल्याचेही बोलले जात आहे. या भागीदारीतूनच ही ‘माया’ जमवली गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सामान्य जनता वाऱ्यावर, गुन्हेगारांचे फावतेय

पोलीस आणि अवैध धंदेवाल्यांच्या या साठ्यालोठ्यामुळे पाथरी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य माणूस जेव्हा तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जातो, तेव्हा त्याला ताटकळत ठेवले जाते. मात्र, अवैध धंदेवाले तिथे आल्यावर त्यांचे विशेष आदरातिथ्य होताना दिसते. यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

 

पाथरी पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा ‘काळ्या मेंढ्या’ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि पाथरी पोलीस ठाण्याचा कारभार पारदर्शक करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.या गंभीर आरोपांमुळे पाथरी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, आता वरिष्ठ प्रशासन यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गंगाखेड न्यायालयात गोंधळ; न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण पोलिसांच्या ताब्यात

 

परभणी (प्रतिनिधी): जिल्ह्यातील गंगाखेड येथील सह दिवाणी न्यायालयात सुनावणीदरम्यान गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयाचे कामकाज जाणीवपूर्वक बंद पाडण्याचा तसेच न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ लिपीक श्रीमती राही अश्रोबा फपाळ (वय 46, रा. प्राध्यापक कॉलनी, गंगाखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता न्यायालयात नियमित फौजदारी खटला क्र. 230/2012 शासन विरुद्ध बाबुराव सावंत व इतर या प्रकरणात साक्षीदाराची सरतपासणी सुरू असताना एक इसम अचानक कोर्ट हॉलमध्ये आला. त्याने “माझ्या केसचा निकाल माझ्या विरोधात का दिला” असे म्हणत जोरजोरात आरडाओरड सुरू केली.

सदर इसमाने न्यायालयाचे कामकाज बंद पाडण्याच्या उद्देशाने गोंधळ घातला. त्यानंतर उपस्थित विधीज्ञ, सरकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी यांनी त्यास पकडून कोर्ट हॉलच्या बाहेर काढले. मात्र बाहेरही तो इसम धमकी देत आरडाओरड करत होता. काही वेळातच तो पुन्हा कोर्ट हॉलमध्ये येऊन न्यायाधीशांकडे धाव घेत, मारहाण करण्याच्या उद्देशाने डायसच्या पायऱ्या चढू लागला. त्यावेळी उपस्थित विधीज्ञांनी तात्काळ त्यास रोखून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर घटना दुपारी 1.30 ते 2.00 वाजेदरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाचे नाव राम महादेव फड (वय 25, रा. हळंब, ता. परळी, जि. बीड) असे आहे.

smrutigandh.com
smrutigandh.com

या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी तपास हाती घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे.

पाथरीत भामट्याचा डाव: पोलिस बनून वृद्धाच्या ६० हजारांची सोन्याची अंगठी लंपास

पाथरी, दि. १८: परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बांदरवाडा-पाथरी रोडवर भामट्याने पोलिस बनून एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त कॅनल इन्स्पेक्टराची सोन्याची अंगठी लंपासली. सुमारे ६० हजार रुपये किंमतीची ही अंगठी गमावून संभाजी गव्हाणे यांना मोठा धक्का बसला असून, पाथरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. ही घटना वृद्ध फसवणूक आणि सोन्याची चोरीच्या वाढत्या प्रकरणांना नवे वळण देते.

घटनेची हकीकत सविस्तर: तक्रारदार संभाजी गव्हाणे(वय ७४, रा. ज्ञानेश्वर नगर, पाथरी) हे जयकवाडी प्रकल्पातील माजी कॅनल इन्स्पेक्टर आहेत. १६ वर्षांच्या नोकरीनंतर सेवानिवृत्त झालेल्या गव्हाणे यांच्याकडे दोन मुले, सुना आणि नातवंडे असून, ते कुटुंबासह शांततेने पाथरी येथे वास्तव्य करतात. दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजता एमएसईबी (महाराष्ट्र राज्य विद्युत खंड महामंडळ) कार्यालयात विद्युत बिल भरण्यासाठी पायी-पायी बांदरवाडा-पाथरी रोडने निघाले होते.

Oplus_131072

रस्त्याच्या डाव्या बाजूला जडीबुटी स्टॉलच्या ठिकाणी एका ५०-५५ वर्षांच्या माणसाने मोटारसायकल थांबवली होती. त्याच्यावर लहान चोकडा शर्ट आणि काळसर पॅन्ट होती. गव्हाणे यांच्या उजव्या हाताच्या करगळीजवळील बोटात ७ ग्रॅम वजनाची बदामी आकाराची सोन्याची अंगठी चमकत होती. भामट्याने आधी “काका, इकडे एकटे फिरू नका, लोक चाकू मारून जखमी करतात”अशी भीती दाखवली.गव्हाणे यांनी “ठीक आहे, संभाळून जातो”म्हणून पुढे सरकले.

काही अंतरावर पुन्हा बोलावून भामट्याने दुसऱ्या २५-३० वर्षांच्या तरुणाला बोलावले. स्वतःची पिवळ्या धातूची अंगठी काढून दाखवत तो म्हणाला,”इकडे लूटमार होतेय, तुमची अंगठी काढून खिशात ठेवा”. गव्हाणे यांचा उजवा हात धरून त्याने सोन्याची अंगठी काढली आणि वहीच्या पांढऱ्या कागदात गुंडाळली. अर्धा मिनिट बोलताना चालाखीने रेतीचा मध्यम खडा कागदात टाकून तो पुन्हा गुंडाळला आणि गव्हाणे यांच्या हातात दिला, “खिशात ठेवा” असे सांगितले

गव्हाणे हे एमएसईबी कार्यालयगाठले, पण ते बंद असल्याने सेलू कार्नर येथे शंकर मोबाइल शॉपीत दुपारी १.३० वाजता बिल भरले. खिशात हात घालून कागद तपासला तेव्हा रेतीचा खडा आढळला! ६० हजार रुपये किंमतीची (पाच वर्षांपूर्वी बनवलेली)सोन्याची अंगठी गमावल्याचे समजले. लगेच पाथरी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमीनाथ नरके हे करत आहेत.

महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा अव्वल नंबर तर पालकमंत्र्याच्या परभणीत भाजपाचा पराभव: शिवसेना/काँग्रेस परभणी महापालिकेत बहुमताने विजय

परभणी: महाराष्ट्रातील परभणी महानगरपालिका निवडणूक २०२६चे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण ढाणढोर झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उबाठा गट आणि काँग्रेस यांच्या आघाडीने एकूण ६५ जागांपैकी ३६ जागा जिंकून बहुमत मिळवले असून, सत्ताधारी भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मात्र एकही जागा मिळालेली नाही, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला ११ जागा, अपक्ष ३, एमआयएम ०, यशवंत सेना १ जागा लाभल्या आहेत.या निकालांनी परभणी महापालिका निवडणूक निकाल मध्ये विरोधकांचा भगवा गड कोसळल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या गृहराज्यात त्यांना अपेक्षित विजय मिळाला नाही, तर शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव,आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या प्रभावाने बाजी मारली. निवडणुकीपूर्वीचे राजकीय समीकरण आणि रणनीती २०१७ च्या परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३१, राष्ट्रवादीने १९, भाजपने ८, शिवसेनेने ५ आणि अपक्षाला १ जागा मिळवली होती. त्या वेळी सत्ता सांभाळण्यासाठी अनेक राजकीय घोटाळे घडले होते.यंदाच्या २०२६ परभणी महापालिका निवडणुकीत मात्र चित्र पूर्णपणे बदलले. सत्तेसाठी सुरुवातीपासून राष्ट्रवादी (अजित पवार गट)एका बाजूला तर भाजपआणि शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या बाजूला उभे होते. महायुतीतील घटक पक्षांमधील ओढाताण पाहता महाविकास आघाडी चे सर्व पक्ष स्वतंत्र लढतील असे वाटत होते. मात्र,काँग्रेस आणि उद्धवसेना (उबाठा)यांनी युती करून मतविभाजन टाळले. काँग्रेसने बॅकफूट घेऊन उबाठा सेनेला जास्त उमेदवार लढवण्याची संधी दिली.दुसरीकडे,महायुती च्या सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.शरद पवार आणि अजित पवार गटांच्या राष्ट्रवादी ने एकत्र येऊन लढाई दिली, पण भाजप आणि शिंदेसेना एकत्र आली नाही. परिणामी, परभणी महानगरपालिका मध्ये १६ प्रभागांतून ६५ नगरसेवक निवडले गेले, ज्यात २ लाख ६१ हजार मतदारांचा सहभाग होता.

 

निकालांचे तपशीलवार विश्लेषण

निकालानुसार:

-शिवसेना (उबाठा): २५ जागा

-काँग्रेस: १२ जागा

-भाजप: १२ जागा

-राष्ट्रवादी (अजित पवार): ११ जागा

-जनसुराज्य: ३ जागा

-एमआयएम: ० जागा

यशवंत सेना-१ जागा

-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट): ० जागा

हे निकाल महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल च्या व्यापक चित्रात मराठवाड्यातील विरोधकांच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहेत, जरी भाजपने राज्यभर १३ महापालिकांमध्ये विजय मिळवला असला तरी. नेत्यांचे प्रभाव आणि भविष्यातील चित्र पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना परभणीमध्ये पाहिजे तसा विजय मिळाला नाही, ज्यामुळे सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला. उलट,बंडू जाधव, राहुल पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिका बजावली. परभणीकरांनी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांकडे कल दाखवल्याची चर्चा आहे. आता महापौर निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असून,शिवसेना-काँग्रेस आघाडी सत्तेत येण्याची शक्यता आहे. हे निकाल महाराष्ट्रातील स्थानिक राजकारण मध्ये नव्या समीकरणांची सुरुवात करणारे ठरतील.

पाथरीत जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी; निर्णय अधिकाऱ्याची विभागप्रमुखांसोबत बैठक जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक: नामनिर्देशनाला पहिल्या दिवशी शांतता, ११४ फॉर्म विक्री

पाथरीत जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी; निर्णय अधिकाऱ्याची विभागप्रमुखांसोबत बैठक

 

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक: नामनिर्देशनाला पहिल्या दिवशी शांतता, ११४ फॉर्म विक्री

 

पाथरी, १६ जानेवारी:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील तयारीला वेग येत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांनी आज तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या असून, कर्मचाऱ्यांना कर्तव्यनिष्ठेने काम करण्याचे आदेश दिले गेले.

 

श्रीमती चव्हाण म्हणाल्या की, प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नेमलेल्या कामकाजाची दैनंदिन तपासणी करावी.निवडणूक तयारीच्या प्रत्येक बाबीवर लक्ष केंद्रित करून उपस्थित राहणे आवश्यक आहे. अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली जाईल आणि कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. ही बैठक पाथरी निवडणूक प्रक्रियेला अधिक गती देणारी ठरली असून, स्थानिक पातळीवर निवडणूक यंत्रणेला सज्ज करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पाथरी श्री. शंकर एन. हंदेश्वर, नायब तहसीलदार श्री. रमेश धोपे, श्री. वसंत महाजन, श्रीमती सुरेखा पटवे, पुरवठा निरीक्षक श्रीमती आसमा शेख, सहाय्यक महसूल अधिकारी श्री. रघुनाथ केसकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण साठीच्या नामनिर्देशन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. हे अधिकारी पाथरी तहसीलच्या निवडणूक यंत्रणेचे कंबरडे घट्ट करत असल्याचे दिसून आले.

नामनिर्देशन प्रक्रियेचा पहिला दिवस शांत : आज नामनिर्देशन फॉर्म दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नाही. मात्र, एकूण ११४ नामनिर्देशन फॉर्मची विक्री झाली आहे. उमेदवारांची रसिकता वाढत असली तरी पहिल्या दिवशी कोणताही अर्ज दाखल न होणे ही बाब चर्चेत आली आहे. निवडणूक कार्यालयातून उमेदवारांना मार्गदर्शन दिले जात असून, येत्या दिवसांत अर्जांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे.

अनामत रक्कम आणि खर्च मर्यादा:जिल्हा परिषद गट साठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १००० रुपये आणि मागासवर्गीयांसाठी ५०० रुपये आहे. तर पंचायत समिती गण साठी सर्वसाधारण ७०० रुपये आणि मागासवर्गीयांसाठी ३५० रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. खर्च मर्यादेसंदर्भात जिल्हा परिषद गट साठी ६ लाख रुपये आणि पंचायत समिती गण साठी ४.५ लाख रुपयांची मर्यादा आहे. हे नियम निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू असून, उमेदवारांना त्याचे काटेकोर पालन करावे लागेल.

मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती: पाथरी तालुक्यात एकूण ८६८३२ मतदार आहेत. यापैकी स्त्री मतदार ४१८५६ आणि पुरुष मतदार ४४९७६ आहेत. मतदानासाठी १०५ केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही आकडेवारी पाथरी निवडणूकच्या व्याप्तीचे प्रमाणिक दर्शन घडवते. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यात आली असून, मतदान प्रक्रिया पारदर्शक राहील याची काळजी घेतली जात आहे.

पाथरी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळेल. निर्णय अधिकाऱ्यांच्या या बैठकीमुळे कर्मचारी यंत्रणा सतर्क झाली असून, उमेदवार आणि मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे. पुढील काळात नामनिर्देशन प्रक्रिया वेग घेईल आणि निवडणूक शांततेत पार पडेल, अशी अपेक्षा आहे.

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणा सज्ज– जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026

निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणा सज्ज– जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी

परभणी, दि. 14 (प्रतिनिधी) – मा. राज्य निवडणुक आयोगाने दि. 13 जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचसासंहिता लागू करण्यात आली आहे. परभणी जिल्हयात 54 तर पंचायत समितीच्या 108 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, निवडणुकीसाठी प्रशासन, जिल्हा परिषद व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदारांनी निर्भयपणे दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिता भालेराव, तहसिलदार (सामन्य प्रशासन) रामदास कोलगणे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांतंर्गत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी- 16 जानेवारी 2026, नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026, नामनिर्देशनपत्रांची छाननी- 22 जानेवारी, उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 27 जानेवारी, निवडणूक चिन्ह वाटप- 27 जानेवारी, अंतिम उमेदवारांची यादी- 27 जानेवारी आहे. मतदानाचा दिनांक- 5 फेब्रुवारी 2026 तर मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. दि. 1 जुलै 2025 हा मतदार यादी ग्राह धरण्याचा दिनांक आहे.
जिल्हयात एकूण ग्रापंचायती 705 असून गटांची संख्या 54 तर गणांची संख्या 108 आहे. मतदान केंद्रांची संख्या 1278 आहे. एकूण मतदारांची संख्या 10 लाख 42 हजार 957 आहे. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 39 हजार 998, स्त्री मतदार 5 लाख 2 हजार 954 तर तृत्तीयपंथीय मतदारांची संख्या 5 आहे. तहसिलदारस्तरावर बीएलओ मार्फत दुबार मतदारांची पडताळणी करण्यात आली असून दुबार मतदारांबाबत आयोगाने विहित केल्या प्रमाणे हे मतदार कुठे मतदान करणार आहेत, याबाबत आवाहन करुन त्यांच्याकडून लेखी माहिती घेतली जाईल. मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्र उपलब्ध होणार आहेत. निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील. दिव्यांग व जेष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी रॅम्पची व्यवस्था असेल. स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदानासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जाईल. मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा -जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा पुढील प्रमाणे असेल, 50 ते 60 निवडणूक विभाग (गट) असलेल्या जिल्हा परिषदेसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी (गण) 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा आहे.

मुख्यालयीन वरिष्ठांच्या नावाने कनिष्ठ कर्मचाऱ्यांची मोठी हप्तेवसुली:पाथरीतील अवैध धंद्यांना पाठबळ ;पाथरी महसूल-पोलिस यंत्रणेत हप्तेखोर कनिष्ठांचा काळोख; वरिष्ठांना आव्हान

पाथरी(विशेष प्रतिनिधी) – पाथरी शहरासह ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे पुन्हा एकदा जोर धरू लागली आहेत.अवैध वाळू उपसा,मटका भिंगो, अवैध दारू विक्री आणि अमली पदार्थांची सर्रास विक्री यामुळे स्थानिक प्रशासनाची छबी धास्तावली आहे.या सर्व धंद्यांमागे महसूल आणि पोलिसयं त्रणेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हप्ते वसुलीचा मोठा हात असल्याचे उघड उघड बोलले जात आहे. पाथरी तालुक्यातील अनेक घाटांमधून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे समोर आले असून, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील २२ घाटांपैकी फक्त काहीच घाटांचे लिलाव झाले आहेत. उर्वरित घाटांमधून प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. गाव पातळीवरील पुढाऱ्यांनी लिलाव रोखण्यासाठी ग्रामसभेत ठराव नामंजूर केले,तरीही वाळूमाफिया लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. तलाठ्यांनी महसूल यंत्रणेला अहवाल दिले, पण तात्पुरती कारवाईनंतर प्रकरण थंड होते.मडसगाव, ढालेगाव,डाकू, उमरा,गुंज,गौडगाव यासारख्या ठिकाणी रात्रीच अवैध उपसा सर्रास सुरू असल्याचे व्हिडिओद्वारे समोर आले आहे.ग्रामदक्षता पथके नावालाच असून,महसूल पथकांकडूनही ठोस कारवाई होत नाही.

या अवैध वाळू उपसाला प्रोत्साहन देणाऱ्या महसूल विभागातील हप्तेखोरीमुळे पाथरी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण आणि तहसीलदार ए.एन. हंदेश्वर यांच्या प्रतिमेला गालबोट लागले आहे.कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठांच्या नावाखाली हप्ते गोळा करीत असल्याचे आरोप आहेत. हे हप्ते खोरी कशी रोखणार याकडे तालुक्यातील प्रत्येकाचे लक्ष लागले आहे.पूर्वी तहसीलदार वासुदेव शिंदे यांच्यावर दिरंगाईप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली होती,पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

त्याचबरोबर पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहर आणि ग्रामीण भागात कल्याण मुंबई नावाचा मटका भिंगो,अवैध दारू विक्रीआणि अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना पाथरी पोलीस ठाण्यातील कनिष्ठ कर्मचारीच्या मार्फत चाललेली हप्तेवसुली रोखता येईल का, असा प्रश्न उपस्थित होतो.वरिष्ठांच्या नावाने कनिष्ठ हप्ते गोळा करीत असल्याने पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तालुक्यातील नागरिक तात्काळ कारवाईची मागणी करीत आहेत.

या तीनही कार्यालयांचे –महसूल उपविभाग कार्यालय,तहसील कार्यालय आणि पाथरी पोलीस ठाणे – प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील हप्तेखोर कनिष्ठ कर्मचारीच्या शोध घेतील का?अवैध धंद्यांशी संबंध बाळगणाऱ्यांची सखोल चौकशी करून काय कारवाई करतील, याकडे तालुक्याचे डोळे लागले आहेत. वाळूमाफिया मोकाट असल्याने पर्यावरणाला धोका वाढत आहे, तर अवैध दारू-अमली पदार्थमुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात आहे.

नागरिकांकडून वाळू माफियांवर तत्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे. पूर्वी पाथरीत वाळू माफियांची दादागिरी गावकऱ्यांनी हायव्यासह दुचाक्या फोडून उतरवली होती.आता प्रशासनाने हप्तेखोरांना शोधून कठोर कारवाई करावी, अन्यथा स्थानिक पातळीवर आंदोलने हाती घेणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.पाथरी तालुक्यातील अवैध धंदे आणि हप्तेवसुलीचा काळोख कधी दूर होईल, हाच प्रश्न कायम आहे.

अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सापडला मुहूर्त! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या जाहीर

अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सापडला मुहूर्त! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या जाहीर

 

मुंबई: अनेक वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत या बहुप्रतिक्षित निवडणुकांची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेली नसलेल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार असून, यात सुमारे ५.२५ लाख मतदार सहभागी होणार आहेत.

 

अनेक वर्षांची प्रक्रिया अखेर पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या होत्या. आरक्षण सूत्रावलीबाबत विविध खटल्यांमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नसलेल्या जिल्ह्यांमध्येच पहिल्या टप्प्यात निवडणुका घ्या. त्यानुसार राज्यातील केवळ १२ जिल्हा परिषद आणि त्यांच्याशी संबंधित १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीतून ७३१ जिल्हा परिषद सदस्य आणि १४६२पंचायत समिती सदस्य निवडून येतील, ज्यात मागास प्रवर्गासाठी १९१ जागा राखीव आहेत.

 

पहिल्या टप्प्यातील जिल्हे आणि भूगोल

पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या एकूण १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. १३ जानेवारीपासून प्रक्रिया सुरू होत असून, यात ग्रामीण भागातील विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संस्थांचे नियोजन होईल.

 

निवडणूक वेळापत्रक: सविस्तर मार्गदर्शन

राज्य निवडणूक आयोगाने झेडपी पंचायत समिती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार:

:-१ जुलै २०२५ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.

:-अर्ज दाखल करणे:१६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ (ऑफलाइन प्रक्रिया).

:-अर्ज छाननी:२२ जानेवारी २०२६.

:-अर्ज माघार:२७ जानेवारी २०२६ दुपारी ३ वाजेपर्यंत.

:-अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप:२७ जानेवारी दुपारी ३ नंतर.

:-मतदान ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०).

:-मतमोजणी आणि निकाल:७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजता सुरुवात)

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार आहे – एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे पंचायत समितीसाठी.ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिलांना आणि लहान मुलांसह असलेल्या महिलांना मतदान केंद्रावर प्राधान्य मिळेल.

 

राजकीय वातावरण आणि अपेक्षा 

या घोषणेमुळे ग्रामीण राजकारणात ढवळून निघालेला धुरळा पुन्हा उडण्यास तयार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नेते आता उमेदवारीसाठी धावपळ सुरू करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका होणार आहेत.निवडणूक खर्च मर्यादाही आयोगाने निश्चित केल्या असून, जिल्हा परिषदेसाठी ९ लाखांपर्यंत आणि पंचायत समितीसाठी ६ लाखांपर्यंत मर्यादा आहे.ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांनी आता तयारीला वेग द्यावा आणि मतदारांनी जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन आयुक्त वाघमारे यांनी केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : तहसीलदार एस एन हंदेश्वर ; पाथरी तहसील कार्यालयात निवडणूक तयारीसाठी सर्व पथकांची एकत्र बैठक

पाथरी(प्रतिनिधी) १४ जानेवारी : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत १२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्यातील १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यात आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तहसील कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक झाली. या बैठकीत तहसीलदार शंकर एन हंदेश्वर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या

बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजता पाथरी तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीस तहसीलदार श्री. शंकर एन हंदेश्वर यांची अध्यक्षता होती. यावेळी गट विकास अधिकारी श्री. शैलेश वाव्हळे, नायब तहसीलदार श्री. रमेश धोपे, महसूल सहाय्यक श्री. केसकर, विस्तार अधिकारी श्री. संदीपान घुंबरे, श्री. आर टी राठोड,श्री. सुमित वाघमारे आणि श्री. मनेरेउपस्थित होते. विशेषतः पाथरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील पोलीस प्रशासन,पत्रकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि आचारसंहिता पथकाचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने हजेरी लागली होती

तहसीलदार हंदेश्वर म्हणाले, “राज्य निवडणूक आयोगाच्या प्रेस नोटनुसार महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता सक्रिय झाली आहे. या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येकजण जबाबदारीने काम करावा. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सतर्क राहावे.” त्यांनी निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांना निवडणूक कामकाज अचूक आणि व्यवस्थित पाडण्याचे निर्देश दिले.

 

बैठकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासनाला गैरप्रकार टाळण्यासाठी सतत सजग राहण्याचे सांगितले. राजकीय पक्ष प्रतिनिधींना प्रचार नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकारांना निवडणूक प्रक्रियेचे प्रामाणिकपणे प्रसारण करण्याचे आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन मिळाले. आचारसंहिता पथक यांना तक्रार निवारण आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.

 

या निवडणुकीचा विस्तृत संदर्भ देता, राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान ५ फेब्रुवारीला होईल, तर मतमोजणी ७ फेब्रुवारीला अपेक्षित आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १६ ते २१ जानेवारी असून, नामनिर्देशनपत्रे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जातील. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांसह असलेल्या महिलांना मतदानात प्राधान्य दिले जाईल. एकूण ७३१ जिल्हा परिषद सदस्य आणि १४६२ पंचायत समिती सदस्य निवडून येतील.

smrutigandh.com
smrutigandh.com

तहसीलदार हंदेश्वर यांनी अधोरेखित केले, की सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम केल्यास निवडणूक प्रक्रिया यशस्वी होईल.या बैठकीमुळे पाथरी तालुक्यात निवडणूक तयारीला गती मिळाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील विकासकामांसाठी महत्त्वाच्या या निवडणुकीत पारदर्शकता टिकवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे