Home Blog Page 10

समाजभान जागृत ठेवणे इतकेच गरजेचे !

 

 

महिलांवरील हिंसाचार घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये बलात्कारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. बलात्कार हा सध्या गंभीर विषय बनला आहे.लहान मुलींवरील अत्याचार वृत्तपत्रात दररोज वाचनात येतात. त्यातून खूनांच्या संख्येत वाढ झाली आहे, अत्याचार, विनयभंग,बलात्कार आणि बालहत्या,आणि घरगुती हिंसाचार हा पुढारलेल्या समाजात अधिक दिसतो.दरवर्षी भारतात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. २०१२ मध्ये भारतातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण ४ % होते,म्हणजे सरासरी तीन मिनिटांतच एक महिला हिंसाचाराला बळी पडते. भारतातील महिलांवरील गुन्हे अनेक रूप धारण करतात. मुख्यत या गुन्ह्यांमुळे आजीवन,आघात किंवा मृत्यू होतो.जग डिजिटल महाजालात वावरत असताना, महिलांवरील हिंसाचार मात्र, कमी होताना दिसत नाही.महिला सक्षमीकरणाच्या गप्पा अनेक सरकारी दरबारी मांडल्या जातात.मात्र,त्याच्या सुरक्षेचे सक्षमीकरण करण्यासाठी कोणत्याच सरकारी यंत्रणेने ठोस अशी पावले उचलली नाहीत. आज घरोघरी महिला हिंसाचार होतो आहे.एकही घर असे नाही ज्यात महिलांना पूर्ण अधिकार आहेत.तिला अधिकार नाही म्हणजे हा तिच्यावरील अन्याय आहे.हिंसाचार नाही असे घर अपवादानेच मिळेल.प्रत्येक घरात म्हटले तर वावगे ठरणार नाही.प्रत्येक घरात महिलांना शिवीगाळ होते .हा ही एक हिंसाचार आहे.महिलावरील हिंसाचाराची सुरुवात घरातूनच होते.तर घराबाहेर पडल्यावर तिच्याकडे पाहण्याच्या नजरेपासून हिंसाचार सुरू होतो म्हटले योग्य होईल?

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे . या दिवसाचे उद्दिष्ट जगभरात महिलांवर बलात्कार , घरगुती हिंसाचार आणि इतर प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडतात याची जाणीव समाजाला झाली पाहिजे. ऐतिहासिकदृष्ट्या, ही तारीख १९६० मध्ये डोमिनिकन रिपब्लिकमधील राजकीय कार्यकर्त्यां असलेल्या तीन मीराबल बहिणींच्या हत्येच्या तारखेवर आधारित आहे ; डोमिनिकन हुकूमशहा राफेल ट्रुजिलो (१९३०- १९६१) यांनी या हत्येचे आदेश दिले होते.१९८१ मध्ये, लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन फेमिनिस्ट एन्क्युएन्ट्रोसच्या कार्यकर्त्यांनी २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आणि त्याबद्दल अधिक व्यापकपणे जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला ; ७ फेब्रुवारी २००० रोजी, या तारखेला संयुक्त राष्ट्रांचा अधिकृत ठराव मिळाला.

महिलांवरील हिंसाचाराची हा जगभरात केला जातो. जगभरातील महिलांवरील सारखाच असून, याबाबत समाजाने विचार केला पाहिजे. केवळ कायद्यावर किंवा सरकारी धोरणावर विश्वास ठेवता कामा नये. महिला हिंसाचार विरोधी कायदे तर ढीगभर आहेत. विश्वासाचे नाते अधिक दृढ करावे लागेल. तर महिलांवरील हिंसाचार थाबण्यास मदत होईल. महिला हिंसाचार कुटुंबातूनच रोखण्यासाठी महिलांना कुटुंबात योग्य सन्मान मिळाला पाहिजे. तरच समाजातही महिलांचा सन्मान होईल. महिलांचा सन्मान करणाऱ्या व्यक्ती महिलांवर अत्याचार करण्यासाठी किंबहुना हिंसाचार करण्यासाठी धजावणार नाही. त्यासाठी तिचा सन्मान होणे आवश्यक आहे. आजकाल महिलांच्या लैंगिक छळाच्या घटनेत वाढ झाली आहे. याला काही सामाजिक भान हवे आहे. तरच महिलांवरील हिंसाचाराला आळा बसेल. त्यामुळे समाज असलेल्या व्यक्तींनी सामाजिक वैचारिकता जोपासली पाहिजे. माणूस कोणत्याही क्षेत्रात वावरत असला तरी त्याने एक विशिष्ट वैचारिक पातळी निर्माण केली पाहिजे. त्या वैचारिक पातळीवर तो प्रामाणिक असला तर कोणत्याही हिंसक घटनेबाबत तो असंवेदनशील असणार नाही. समाजात सध्या संवेदनशील व्यक्तींची कमी असून, संवेदनाहीन आणि असंवेदनशील व्यक्ती विचार बाळगत आहेत. त्यामुळे समाजमनावर विपरीत परिणाम होऊन अशा घटना समोर येत आहेत. यंत्रमानवाच्या जगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत आपण वावरत आहोत. त्यासारखेच आपण संवेदनाशून्य होत आहेत. हातातील गॅझेट,लॅपटॉप आणि मोबाईल यापुढे माणूस माणूसपण विसरून गेला आहे. त्यामुळे मानवाची संवेदना बोथट होत आहे. त्यासाठी एक सजग समाज निर्माण व्हायचा असेल तर आपण मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या स्क्रीनवर मेंदू न लावता कुटुंबाला आणि समाजाला वेळ दिला तर समाजातील आणि कुटुंबातील आपलेपणा निर्माण झाल्यामुळे आपसूकच आपुलकीची भावना निर्माण होईल आणि प्रत्येक जण महिलांना आई -बहिणी-पत्नी प्रमाणे सन्मान देईल. त्यातून महिलांवर रोखण्यात मोठी मदत होणार आहे. हे समाजभान प्रत्येकात येण्यासाठी आपसातील आपुलकी आपलेपणा निर्माण होणे आवश्यक आहे. डिजिटल दुनियेपूर्वी आपसातील आपुलकीपणा टिकून होता. त्यामुळे कुटुंब एकसंध होता. समाज एक होता आणि पर्यायाने आपुलकीभाव आपसुकच निर्माण झाल्याने बंधुभाव होता.तो आता कितपत आहे हा प्रश्न. केवळ सरकारी यंत्रणेवर आणि सुरक्षा यंत्रणांच्या भरवशावर राहून महिलांची सुरक्षा किंबहुना हिंसाचार रोखता येणार नाही. त्यासाठी कुटुंबात समाजात वेळ दिला पाहिजे .व्यक्ती- कुटुंब -समाज आणि देश एक कुटुंब असल्यासारखे आपुलकीने आणि बंधू भावाने वागतील. भारतीय संविधानाने तर महिलांना सक्षम आणि निर्भर केले आहे. तेव्हापासून महिला मुक्त संचार करू लागली. असेच हक्क अधिकार महिलांना जगातील देशांनी दिले मात्र त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. आजही हक्क अधिकार गाजवण्यासाठी महिलांना हिंसाचाराला तोंड द्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ कायदे करून किंवा सरकारवर आसूड उगवून चालणार नाही तर प्रत्येकाने आपले समाजभान जागृत ठेवणे इतकेच आवश्यक आहे.

 

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत)

मो.९९७५१८८९१२.

kalpadmakarukhlikar@gmail.com.

तरुणांना राजकारणात येण्यासाठी आदर्श!

 

 

बदलते राजकारण आणि राजकारणातील दिवसेंदिवस वाढती महत्त्वाकांक्षा यामुळे आजची तरुण पिढी राजकारणाकडे नकारात्मक दृष्टीने पाहत आहे . हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण, राजकारणात नैतिकता उरली नसल्यामुळे राजकारणाबाबत आजची पिढी उदासीन दिसून येते. आजच्या राजकीय पक्षांमध्ये नैतिकता असणारे नेते किती उरले आहेत हा प्रश्न. ज्यावेळी माणूस नैतिकता गमावून बसतो त्यावेळी तो किती संवेदनशील असेल याबाबत प्रश्नचिन्ह. त्यामुळे आजच्या पुढाऱ्यांनी नैतिकता वेशीला टांगली आहे.असे म्हटले तर यथोचित होईल. त्यामुळेच राजकारण हे वैचारिक आणि विकासाचे राहिले नसून, केवळ व्यवसाय म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळेच आजच्या पिढीचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र, जोपर्यंत सुशिक्षित आणि वैचारिक तरुण पिढी राजकारणात सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून उतरत नाही तोपर्यंत परिवर्तन अशक्य आहे. त्याची सुरुवात पक्षीय स्तरावर नसली तरी असे तरुण अनेक पक्षात असावेत . तरुणांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वतःची छबी निर्माण करून, देशभर प्रसिद्ध असलेल्या मैथिली ठाकूर देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून बिहार विधानसभेत निवडून आल्या आहेत . बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आजवर यशस्वी केलेल्या नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा बिहारच्या जनतेने सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी वेळोवेळी आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी केली आहे. मात्र, सोशल इंजीनिअरिंगचा पाया त्यांनी अधिक मजबूत केल्याने, पुन्हा त्यांना बिहारच्या जनतेने संधी दिली. त्यामुळे भाजपच्या सर्वाधिक जागा या नितीश कुमार यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे.हे भाजपला किती जमले असते?असो, देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून मैथिली ठाकूर या तरुणांना राजकारणात येण्यासाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत .मैथिली हे खरं नाव भाषेचं आहे.ही बिहार आणि झारखंड भागात बोलली जाणारी इंडो -आर्यन भाषा आहे. २२ प्रमुख भारतीय भाषांमधील एक भाषा म्हणून मैथिलीला मान्यता मिळालेली आहे. ही भाषा नेपाळच्या तराई प्रदेशातही बोलली जाते आणि नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाची प्रचलित भाषा म्हणून तिला मान्यता आहे. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली मैथिली ही भारताच्या २२ राजकीय भाषांपैकी एक आहे. मैथिली ठाकूर यांनी यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. मैथिली नांव योगायोग. आपल्या गायकीने प्रसिद्ध असलेल्या मैथीली ठाकूर या तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रेरणा देतील. घरात कुठलेही राजकारण नसताना, त्यांनी मिळवलेला हा विजय निश्चित तरुणांसाठी आदर्शवत आहे. भारत हा अधिक लोकसंख्या असलेला तरुणांचा देश आहे. मात्र राजकारणात उतरण्यासाठी तरुण पिढी उदासीन दिसते . मैथिली ठाकूर सारख्या तरुण आमदारामुळे नक्कीच तरुणांचा राजकारणात येण्याचा दृष्टीकोन बदलेल.

मैथिली ठाकूर यांचा जन्म बिहार मधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावी संगीतकार आणि संगीत शिक्षक पंडित रमेश ठाकूर आणि भारती ठाकूर यांच्या पोटी झाला. रमेश ठाकूर हे दिल्ली येथे कार्यरत आहेत. मैथिलीच्या संगीताची सुरुवात आणि संगीताचे धडे घरातूनच मिळाले. दोन भाऊ, यांच्यासह त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांकडून मैथिली लोकगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हार्मोनियम आणि तबला यांचे प्रशिक्षण मिळाले. मैथिली आणि तिचे भाऊ बालभवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले जिथे त्यांनी शाळेसाठी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या. वयाच्या १० व्या वर्षी तिने जागरण आणि इतर संगीत कार्यक्रमांमध्ये गाणे मैथिली ठाकूर. २०११ मध्ये, ठाकूर प्रथम झी टीव्हीच्या लिटिल चॅम्प्समध्ये मैथिली ठाकूर यांना संधी मिळाली.चार वर्षांनंतर, सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या इंडियन आयडॉल जुनियर स्पर्धेत भाग घेतला. २०१६ मध्ये “आय जिनियस यंग सिंगिंग स्टार” ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने तिचा अल्बम, या रब्बा (युनिव्हर्सल म्युझिक) लाँच केला.संगीताच्या आणि सुरांच्या राणीने तरुणांना राजकारणात येण्यासाठी हाक दिली म्हटलं तर वावगं ठरणार नाही.इ.स. २०१७ मध्ये, ठाकूरने कलर्स टीव्ही वरील ‘रायझिंग स्टार’ नावाच्या गायन स्पर्धेच्या ‘सीझन-१’ मध्ये भाग घेतला. मैथिली ही शोची पहिली फायनलिस्ट होती, तिने ‘ओम नमः शिवाय’ गाणे गायले आणि तिला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. पण शेवटी अवघ्या दोन मतांनी पराभूत होऊन मैथिली ठाकूर उपविजेती ठरली.या शो नंतर, तिच्या इंटरनेटवरील लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली. आज देशभर त्यांची ओळख गायनामुळे आहे. मात्र, यासह आता त्यांना देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून ओळख मिळाली.

फेसबुक आणि यूट्यूब वरील व्हिडिओंमधून मोठ्या यशानंतर मैथिली ठाकूर आणि त्यांचे तीन भावंडे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, लिटरेचर फेस्टमध्ये सहभागी होऊ लागले. मैथिलीला भारत सरकारने ‘अटल मिथिला’ सन्मान प्रदान केला आहे.इ.स. २०१९ मध्ये मैथिली आणि तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची यांना निवडणूक आयोगाचे मधुबनीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले होते. मैथिली ठाकूर तिच्या ‘मानसपथ’ नामक यूट्यूब चॅनेलवर आपली दोन धाकटी भावंडे ऋषव आणि अयाची यांच्यासह तुलसीदासांचे प्रसिद्ध रामचरितमानसचे क्रमशः गायन करत आहे. या चॅनेल वर आतापर्यंत तिने विविध भारतीय भाषेतील अनके जुनी चित्रपट गीते, लोकगीते तसेच स्वरचित गाणी गायली आहेत.मैथिली ठाकूर यांना ८ मार्च २०२४ रोजी उद्घाटन राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार प्रकारच्या उद्घाटन प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावर्षीचा सांस्कृतिक राजदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या मैथिली ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून देशातील सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांची नोंद घेतली जाईल तर कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या तरुणांसाठी राजकारणात उतरण्याचा विचार केला जाईल. एवढेच.

 

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२ .

kalpadmakarukhlikar@gmail.com.

केवळ सौंदर्य नाही तर स्त्रीच्या कलागुणांना वाव देणारं ग्लॅमर ब्युटी स्टुडिओ 

सौंदर्यस्पर्धाला इंग्रजी मध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट/पॅजन्ट असे म्हणतात. स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा. व्यक्तीचे सौंदर्य, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन इत्यादींना या स्पर्धेत महत्त्व असते.प्राचीन काळी अनेक राजांच्या राण्यांमध्येदेखील अशा सौंदर्यस्पर्धा होत असत. मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये आवडती राणी शोधण्यासाठी राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी व तत्संबंधीच्या नियमांविषयीची माहिती आढळते. ऑटोमन साम्राज्यामध्ये इस्लामिक नियम कितीही कडक असले, तरी त्याहीवेळेला सरदार व राज्यांमधील प्रतिष्ठित लोकांच्या घरी अशा सौंदर्यस्पर्धा घेतल्या जात. यूरोपमध्ये अतिप्राचीन काळी ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे शिल्पकार, कवी, बुद्धिवंत, नेते आणि सेनापती असत. सध्याच्या गिनी बिसाऊ या देशातील व्हीझगॉश बेटावर सौंदर्यस्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आयोजित होत असत.यूरोपमध्ये पहिली मोठी सौंदर्यस्पर्धा सप्टेंबर १८८८ मध्ये झाली. बेल्जियम रिसॉर्ट स्पामध्ये ती आयोजित केली होती. त्यामध्ये एकवीस स्पर्धकांना बंद घोड्याच्या गाडीतून ( बग्गीतून ) आणले गेले. बाहेरच्या कोणत्याही लोकांना आत येण्यास परवानगी नव्हती. स्पर्धकांचे फोटो निर्णायकांना पाठवले गेले. ह्यांमध्ये ग्वादलूप शहरातील अठरा वर्षांची स्पर्धक मार्थे सॉकरेत हिला पाच हजार फ्रँकचे बक्षीस दिले गेले. जर्मनीमधील पहिली सौंदर्यस्पर्धा १९०९ मध्ये झाली. या स्पर्धेची विजेती एकोणीस वर्षांची गर्ट्रड दॉपिएरलस्की ही पूर्व प्रशियामधील होती.

 

भारतातील सौंदयस्पर्धा

 

भारतामध्ये सौंदर्यस्पर्धा विसाव्या शतकाच्या अखेरच्या चतुर्थकात सुरू झाल्या कारण मध्ययुगीन भारतात व नंतर येथील समाज सनातनी संस्कृतीला चिकटून बसलेला होता. त्यामुळे स्त्रियांचे प्रदर्शन ही कल्पनाही समाजाला मान्य नव्हती. स्त्रियांच्या सौंदर्यस्पर्धा ह्या फक्त मुलींच्या शाळांमध्ये, महाविद्यालयांत किंवा क्लबपर्यंत मर्यादित होत्या. काही काळानंतर शहरांमध्ये सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या किंवा पोषाखांच्या कंपन्यांतर्फे तसेच फेमिनासारख्या नियतकालिकांद्वारे सौंदर्यस्पर्धा आयोजित होऊ लागल्या. त्यानंतर प्रत्येक शहर व प्रत्येक राज्ये यांच्या तर्फे सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. त्यांपैकी मिस् फेमिना लुक ऑफ द इयर, फेमिना मिस् इंडिया, ग्लॅडरॅग्लस मॅनहंट कॉन्टेस्ट, आय ॲम शी – मिस् युनिव्हर्स् इंडिया, मिस् चेन्नई, मिस् हिमालय पॅजन्ट, मिस् इंडिया साउथ, मिस् केरळा, मिस् तमिळनाडू , मिस् तिबेट इ. स्पर्धा उल्लेखनीय असून त्या भारतात आयोजित केल्या जातात.

मिस् फेमिना लुक ऑफ द इयर : १९९४ पासून फेमिना नियतकालिकाद्वारे ही स्पर्धा सुरू झाली. संपूर्ण भारतभर चालणारी ही स्पर्धा आहे. १९९४ — शीतल मल्हार, १९९५— कारमीन शॅक्लरान, १९९६—उज्ज्वला राऊत, १९९७—नेत्रा रघुरामन् , १९९८—कॅरॉल ग्रासीयस, १९९९—करिश्मा मोदी ह्यांनी ही स्पर्धा जिंकली. ईव्ह्ज विकली हे साप्ताहिक चालविणारी संस्थाही अशा सौंदर्यस्पर्धा आयोजित करते. फेमिना मिस इंडिया : ही भारतात सर्वत्र घेतली जाणारी स्पर्धा आहे.

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा : (१) जगत्सुंदरी ( मिस् वर्ल्ड — १९५१), (२) विश्वसुंदरी ( मिस् युनिव्हर्स — १९५२), (३) आंतरराष्ट्रीय सुंदरी ( मिस् इंटरनॅशनल — १९६०) व (४) वसुधा सुंदरी ( मिस् अर्थ — २००१) ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भरविल्या जाणाऱ्या मोठ्या स्पर्धा होत.

मिस् वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताच्या रिता फरीया (पहिली -१९६६), ऐश्वर्या रॉय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००), मानुषी छिल्लर (२०१७) यांनी मान मिळविला. २०१२ मध्ये चीनची वेनझिया यू आणि २०१३ मध्ये फिलिपीन्सची मेगन यंग या मिस् वर्ल्डच्या मानकरी ठरल्या.१९९४ च्या मिस् युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताची सुष्मिता सेन हिने मिस् युनिव्हर्सचा मान मिळविला. तसेच वसुधा सुंदरीचा मान भारताच्या नीकोल फरीया हिने प्राप्त केला (२००९). मिस् युनिव्हर्सचा किताब अमेरिकेच्या ओलिवा कुल्पो (२०१२) आणि व्हेनेझुएलाच्या गॅब्रिएला इस्लेर (२०१३) यांनी पटकावला. मिस् आशिया पॅसिफिक या स्पर्धेच्या भारतीय विजेत्या : १९७० — झीनत अमान १९७३ — तारा ॲन फोनसेका २००० — दिया मिर्झा २०१२ — हेमांगिनी सिंग यादु.

 

सर्व जागतिक सौंदर्यस्पर्धांचे स्वरूप केवळ शारीरिक सौंदर्य एवढ्या-पुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते. सांगण्याचा मतलब म्हणजे आमच्या ग्लॅमर मेकअप स्टुडिओमध्ये केवळ सौंदर्यच नव्हे तर त्या स्त्रीचे व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता कार्यक्षमता आणि तिच्यातील कलागुणांना वाव देऊन त्यात सातत्याने योग्य ते मार्गदर्शन दिल्यामुळे ब्युटी स्टुडिओ च्या माध्यमातून होणार आहे. हा स्टुडिओ केवळ सौंदर्य खुलवत नाही तर स्त्रीच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व गोष्टींचा समावेश करून, भविष्यातील त्या स्त्रीला सौंदर्यवती स्पर्धेत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय- राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशाच ठिकाणी स्थान मिळेल त्यासाठी अनेक कलागुणांना महत्व असते.त्यि कलागुणांना वाव आणि त्याची वृध्दी ग्लॅमर ब्युटी स्टूडिओच्या माध्यमातून करीत आहे.

 

– संकलन,

संध्या सरवदे,

(लेखिका सौंदर्य तज्ञ आहेत.)

अजब… ऐकावं ते नवलच; ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी ३ दिवसांची परवानगी तलाठी अहवालावरून ५० ब्रास मुरूम परवानगी विवादित;तहसील कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची गरज सदरील मुरम उत्खनन वाहतुकीमध्ये तहसील कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा

अजब… ऐकावं ते नवलच; ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी ३ दिवसांची परवानगी

 

तलाठी अहवालावरून ५० ब्रास मुरूम परवानगी विवादित;तहसील कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची गरज

 

सदरील मुरम उत्खनन वाहतुकीमध्ये तहसील कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा

 

पाथरी(प्रतीनीधी)पाथरी तालुक्यातील तुरा शिवारात दिनांक २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी दिलेली परवानगी वादग्रस्त ठरली आहे. येथे दिलेली परवानगी आणि तलाठी यांनी तयार केलेला अहवाल व पंचनामा चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

 

तलाठी यांच्या अहवालानुसार, या शिवारातील १०५ नंबर गट क्रमांकात एक विहीर असून त्या विहिरीवर मुरूम उपलब्ध असल्याचे नमूद आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतात विहीरच नाही, उलट बाजूला असलेल्या वेगवेगळ्या विहिरीवर मुरूमाची एक टोपली देखील मुरुम उपलब्ध नाही. यावरून तलाठी यांनी केलेला अहवाल चुकीचा असल्याचे स्पष्ट होते.

 

त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे तलाठी यांनी जाय मोक्यावर न जाऊन, तहसील कार्यालयात बसून अर्जदारांनी दाखवलेले फोटो पाहूनच पंचनामा तयार केला आहे. या पंचनाम्यावर पाथरी येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, जर जाय मोक्यावर जाऊन पंचनामा झाला असता तर त्या पंचनाम्यात गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात हे तीतकेच खरं आहे.

 

याशिवाय, त्या ठिकाणावर पाच ते सहा हायवा आणि दोन टिपरच्या साहाय्याने अंदाजे हायवा मध्ये पाच ब्रास आणी टीप्पर मध्ये अंदाजे अडीच-तीन ब्रास मुरूमाची वाहतूक होते.तर एक हायवा दीवसभरात कीमान पाच-सहा ट्रीपची वाहतूक करतो म्हणजे एक हायवा दीवस भरात २५ ब्रास मुरुमाची वाहतुक करतो. त्यामुळे ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी तीन दिवसांची परवानगी देणे का गरजेचे होते, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होईल की नाही, यासाठी नागरिक उत्सुक आहेत.

 

या साऱ्या प्रकारांमध्ये तहसील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची/भागिदारी असल्याची शंका समोर येत असून, सर्व संबंधितांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो कारवाई करणे आवश्यक आहे, असा दबाव नागरिकांमध्ये जाणवत आहे

 

उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी दिले चौकशीचे आदेश

तुरा शिवारामध्ये दिनांक २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान देण्यात आलेल्या मुरूम उत्खनन वाहतुकी संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता व सदरील प्रकरणात पत्रव्यवहार केला असता त्यांनी तहसीलदार एस.एन.हन्देश्वर यांना एका पत्राद्वारे सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश २१ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.

योगेश्वरी शुगर्सच्या ऊस वाहतुक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर; पोलीस अधिक्षक कार्यालय, योगेश्वरी शुगर्स चा उपक्रम.

योगेश्वरी शुगर्सच्या ऊस वाहतुक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर;

पोलीस अधिक्षक कार्यालय, योगेश्वरी शुगर्स चा उपक्रम.

 

पाथरी( प्रतिनिधी)-पाथरी ता.पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी व योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि. लिंबा यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अॅड रोहित भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.२०गुरुवार) रोजी कारखाना साइटवर रस्ते अपघात टाळण्या साठी सर्व ट्रक,ट्रॅक्टर या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले.

वाहन चालक यांच्या करिता पोलीस अधिक्षक कार्यालय आणि योगेश्वरी शुगर्स लक्ष्मी नगर लिंबा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात जनजागृती मोहीम कार्यक्रम हाती घेण्यात आला . त्यामध्ये अपघात होऊ नये म्हणून मार्गदर्शन करण्यात आले. ड्रायव्हर यांनी वाहन चालविताना नशा पाणी करू नये, वाहनांना रेडियम व रिफ्लेक्टर बसवावे तसेच रोडवर वाहने उभे करू नयेत, साईडला उभे करावीत अशा सूचना शहर वाहतूक शाखा परभणी व पोलीस स्टेशन पाथरी यांच्यामार्फत देण्यात आल्या.

पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, शहर वाहतूक शाखा परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामनराव बेले, शहर वाहतूक शाखा परभणीचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांनी रस्ते अपघाताबाबत मार्गदर्शन केले. या वेळी ट्रक ट्रॅक्टर ला रिफ्लेक्टर बसविले त्यावेळी कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजकुमार तौर, बुलढाणा अर्बन बँक परभणीचे विभागीय व्यवस्थापक निशांत कोचर, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम झाडे, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे, केनयार्ड सुपरवायझर गुलाब पवार, स्वराज इंटरप्राईजेस अँड रिफ्लेक्टर सप्लायर चे सुरेश गिराम ,ऊसतोड वाहतूक ठेकेदार तसेच सर्व ट्रॅक्टर व ट्रक चालक, मालक यांची उपस्थिती होती.

गंगाखेड, पूर्णा येथील सहा सराईत गुन्हेगार हद्दपार -स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

 

परभणी(प्रतिनिधी)जिल्हयातील गंगाखेड आणि पूर्णा पोलिस ठाणे हद्दीतील सहा सराईत गुन्हेगारांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी शुक्रवारी (दि.21) हद्दपारीचे आदेश जारी केले.

पोलिस ठाणे हद्दीत गुंड प्रवृत्ती, जीवीतास आणि मालमत्तेस धोका निर्माण करणार्‍या कृती करणे, धुखापत पोहचवणे, खूनाचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रांनीशी गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, मारहाण करणे तसेच जबर दुखापत करणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीतील राजीव दत्ता दराडे रा.कृष्णनगर, गंगाखेड, बालासाहेब दत्तराव लांडे रा.वझुर ता.पूर्णा, शिवाजी सर्जेराव गादेकर रा.अकोली ता.गंगाखेड, गोविंद दिलीप अंधळे रा.झोला ता.गंगाखेड, सचिन रमेशराव जोगदंड रा.देवठाणा ता.पूर्णा यांच्या विरूध्द पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच पूर्णा पोलिस ठाणे हद्दीतील प्रताप अच्यूराव कदम रा.कदम गल्ली पूर्णा याच्या विरूध्द पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या सर्व प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांनी अंतिम चौकशी करून सराईत गुन्हेगाराविरूध्द परभणी जिल्हयातून एक वर्ष कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश पारीत केले.

जिल्हयाच्या सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणार्‍या, सामान्य जनतेस वेठीस धरणार्‍या, अवैध धंदे करणार्‍या प्रशासनास वेठीस धरणार्‍या गंड प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन केले जाणार असून अशा प्रवृत्तींचे नाश करण्यासाठी कायदेशिर आणि सनदशिल मार्गाचा अवलंब करावा.
-रविंद्रसिंह परदेशी
पोलिस अधिक्षक, परभणी

__________

विविध पथकांच्या नोडल अधिकारी व झोनल अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी घेतली आढावा बैठक.

विविध पथकांच्या नोडल अधिकारी व झोनल अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी घेतली आढावा बैठक.
पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रम सुव्यवस्थेत होण्यासाठी गुरुवार रोजी नगरपरिषद कार्यालय सभागृहात सर्व पथकातील नोडल अधिकारी व झोनल अधिकारी यांची निवडणूक कामकाज विषयी बैठक घेण्यात आली. निवडणूक साठी आचारसंहिता पथक, भरारी पथक (fst) स्थिर नियंत्रण पथक (sst), स्थापन करण्यात आली आहेत प्रत्येक पथकात तीन टीम तयार करण्यात आले आहेत. सदर पथक 24 तास कार्यरत राहणार असून . निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आव्हान श्रीमती अरुणा संगेवार निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी केले आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रावरील सर्व भौतिक सुविधा, लाईटची व्यवस्था मतदारांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या गरजेनुसार प्रत्येक मतदान केंद्रास व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे सूचना केल्या. प्रत्येक केंद्रावर एक सहाय्यक मतदान केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी एक खोली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना त्रास होणार नाही तसेच दिव्यांग व जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी एक अतिरिक्त मतदान कर्मचारी नेमणूक करण्यात येणार आहे. निवडणुकीचे सर्व कामे कालबद्ध असल्याने त्याचवेळी पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली कामे बिनचूक व पारदर्शक करावे असे सूचना देखील यावेळी श्रीमती संगेवार निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद पाथरी यांनी केल्या.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री कृष्णा देशमुख सर्व झोनल अधिकारी,नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

मी तुमच्या कामाचा. रानबा गायकवाड यांनी सध्या चालु असलेल्या निवडणूक काळातील परिस्थितीवर लीहलेली एक अप्रतिम शब्दरचना

मीच तुमच्या कामाचा

 

लागताच निवडणूक

तो लागला कामाला

फिरकला न कधी गल्लीत

आता चकरा माराय लागला

 

मीच तुमच्या कामाचा

बाकी सारे बिनकामाचे

एकच सांगाय लागला

चहा पाणी पाजाय लागला

 

नव्हता बघत कधी कुणाकडे

कंबरेतुन वाकाय लागला

मागणी त्याची प्रत्येकापुढे

द्या आशिर्वाद या पामराला

 

निवडून जाऊ द्या एकदा

बघा कसा करतो काम

पैशाच्या जीवावर गर्दा

घोषणांनी परिसर जाम

 

माहित असतं त्यालाही

आपण केलेलं नसतं काम

विजयासाठी मग वाटत सुटतो

वारेमाप मतदारांना दाम

रानबा गायकवाड

7020766674

नगराध्यक्ष पदाचे ३ तर नगरसेवक पदाचे ६८ अर्ज अपात्र

नगराध्यक्ष पदाचे ३ तर नगरसेवक पदाचे ६८ अर्ज अपात्र

पाथरी, १९ नोव्हेंबर २०२५:
पाथरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली असून, नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी ६८ अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण २२ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी तर २०१ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपात्र ठरलेल्या उमेदवारांना आता निवडणूक लढविण्याची संधी रद्द झाली आहे.

नगरपरिषद निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांच्या अर्जांची छाननी व अपात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया दि. १८नोहेबंर २०२५ रोजी पूर्ण झाली. या छाननीत अनेक उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या २२ अर्जांपैकी ३ अर्ज अपात्र ठरले आहेत, तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या २०१ अर्जांपैकी ६८ अर्ज अपात्र ठरले आहेत.

अपात्रतेच्या कारणांमध्ये अनेक उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नसल्याचे, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याचे, तसेच अनेकांनी वयोमर्यादा पूर्ण केलेली नसल्याचे आढळून आले आहे. या निर्णयानंतर आता नगराध्यक्ष पदासाठी १९ आणि नगरसेवक पदासाठी १३३ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

नगरपरिषद निवडणूक आयोगाने या अपात्र उमेदवारांना अधिकृत नोटीस जारी केली असून, त्यांना आपल्या अपात्रतेचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध आहे. त्यासाठी निश्चित कालावधीत अपील करण्याची सूचना देण्यात आली आहे.

पाथरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्जांची छाननी ही निवडणूक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या छाननीमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार राबविण्यात येत आहे. नगरपरिषद निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत नवीन उमेदवारांचा वाटा वाढल्याने स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी आता निवडणूक लढविण्याची संधी गमावली आहे, तर उर्वरित उमेदवार आता निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करणारे बाळासाहेब!

 

 

आज १७ नोव्हेंबर, आजच्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांना पोरके करून कायमचे निघून गेले. आज त्यांची १३ वी पुण्यतिथी. बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. बाळासाहेबांना समाजकार्याचे बाळकडू आपल्या वडिलांकडून म्हणजे प्रबोधनकारांकडून लहानवयातच मिळाले. प्रबोधनकारांच्या प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार, एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० साली ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी व्यंगचित्रकार तसेच जाहिरात डिझाईनचे कामही करत. याच काळात त्यांची आर. के. लक्ष्मण या विख्यात व्यंगचित्रकाराशी ओळख झाली. लवकरच या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. ही मैत्री शेवट पर्यंत टिकून राहिली. आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनी व्यंगचित्रकलेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज व्यंगचित्रकार म्हटले की याच दोघांची नावे समोर येतात. फ्री प्रेस जर्नलमध्ये काही काळ काम केल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतःचे साप्ताहिक काढण्याचे ठरवले. बाळासाहेब स्वतः व्यंगचित्रकार होते त्यामुळे हे साप्ताहिक व्यंगचित्रात्मकच होते हे वेगळे सांगायला नको. ऑगस्ट १९६७ साली बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाला मार्मिक हे नाव प्रबोधनकारांनी सुचवले. ऑगस्ट १९६७ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी सुरू करण्यात आलेले मार्मिक आजही तितक्याच जोमात सुरू आहे. बाळासाहेबांनी ज्या उद्देशाने हे साप्ताहिक सुरू केले होते तो उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल. मराठी माणसांच्या मुंबईतच मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रातच मराठी माणसांची गळचेपी होऊ लागली. मराठीवर अन्याय होऊ लागला हा अन्याय केवळ व्यंगचित्रांच्या फटकाऱ्याने दूर होणार नाही त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांच्या मनात आला. बाळासाहेबांनी मराठी मणसांना एक करून मोठे संघटन उभारले. या संघटनेला कोणते नाव द्यायचे असे बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारले. प्रबोधनकारांनी क्षणाचाही विलंब न करता नाव घेतले ‘शिवसेना’ यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची अधिकृत स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेत तरुणांचा भरणा सुरू झाला. गाव तिथे शाखा असा प्रवास करत अल्पावधीतच शिवसेना महाराष्ट्राभर पसरली. गावागावात, खेड्यापाड्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यापासूम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील ( शिवाजीपार्क ) मराठी माणसांची प्रचंड गर्दी असे समिकरणच तयार झाले. शिवतीर्थावर बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून लोक येत. त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थित जनसमुदाय भारावून जात. वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखणी हे देखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे महत्वाचे वैशिष्ट्ये. बाळासाहेबांनी सामना सुरू केल्यावर या लेखणीची ताकद देशाला समजली. सामना मधील बाळासाहेबांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पाहत असे. १९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रभर झंझावती प्रचार केला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी होऊ लागली. आपल्या आक्रमक भाषणांनी सत्ताधारी पक्षाला त्यांनी सळो की पळो करून सोडले. बाळासाहेबांमुळेच शिवसेना भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले. या सरकारने एक रुपयात झुणका भाकर, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टी वासीयांना घरे, मुंबई – पुणे हायवे, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई नामांतर असे अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. या सर्व योजना प्रकल्पांची मूळ संकल्पना बाळासाहेबांचीच होती. आज मुंबई महाराष्ट्रात आहे याचे सर्व श्रेय बाळासाहेबांना जाते. बासाहेबांमुळेच मुंबई महाराष्ट्रात आणि मराठी माणूस मुंबईत दिमाखात राहू शकतो. बाळासाहेब नसते तर मुंबई परप्रांतीयांच्या घशात आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला असता. बाळासाहेबांनीच मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज ताठ मानेने जगत आहे. मराठी माणसांसाठी त्यांनी जे केले ते इतर कोणत्याही नेत्याला करता आले नाही म्हणूनच मराठी माणूस कायम त्यांचा ऋणी राहील. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस त्यांना अभिवादन करत आहे. मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणाऱ्या बाळासाहेबांना विनम्र अभिवादन!

 

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे-९९२२५४६२९५