Home गुन्हेगारी पावणे दहा कोटींचे कोकेन आणि एमडी ड्रग्ज जप्त; दोन विदेशी महिलांना अटक ● अंबाजोगाईचे रहिवासी असलेल्या एपीआय गोविंद बास्टे यांची सहकाऱ्यांसह मुंबईत धडक कारवाई

पावणे दहा कोटींचे कोकेन आणि एमडी ड्रग्ज जप्त; दोन विदेशी महिलांना अटक ● अंबाजोगाईचे रहिवासी असलेल्या एपीआय गोविंद बास्टे यांची सहकाऱ्यांसह मुंबईत धडक कारवाई

पावणे दहा कोटींचे कोकेन आणि एमडी ड्रग्ज जप्त; दोन विदेशी महिलांना अटक  ● अंबाजोगाईचे रहिवासी असलेल्या एपीआय गोविंद बास्टे यांची सहकाऱ्यांसह मुंबईत धडक कारवाई

वसई: नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरात तुळींज पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीत छापा टाकून पोलिसांनी सुमारे ९ कोटी ७० लाख २६ हजार रुपये किमतीचे १० किलो ३२७ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी युगांडातील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत मूळचे अंबाजोगाई येथील असलेले आणि सध्या तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहा. पोलीस निरीक्षक गोविंद बास्टे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मिळालेली माहिती अशी की, तुळींज पोलीस ठाण्याचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची पडताळणी करण्यासाठी ‘जम्बो ऑपरेशन’ राबवीत होते. यावेळी मोरेगाव तलाव जवळील प्रियांका अपार्टमेंटमधील रूम क्रमांक २०६ मध्ये पथकाने छापा टाकला. या रूममध्ये युगांडा देशाच्या नागरिक असलेल्या बाबिर्ये ग्रेस, वय ३३ आणि नाकायिझ आयशा, वय २७ या दोन महिला राहत होत्या. पोलिसांना त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांची आणि घराची झडती घेण्यात आली.

या झडतीदरम्यान किचनमध्ये फ्रिजच्या मागे लपवून ठेवलेले १ किलो ४०५ ग्रॅम कोकेन आणि हॉलमध्ये ठेवलेले ८ किलो ९२२ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) असा एकूण १० किलोहून अधिक साठा आढळून आला. बाजारात या अमली पदार्थांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. यासोबतच पोलिसांनी दोन मोबाईल फोन आणि वजनकाटा जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलांकडे भारतात वास्तव्यासाठी वैध पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचेही समोर आले आहे. या दोन्ही महिलांवर एपीआय गोविंद बास्टे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा आणि विदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक घाडीगावकर, एपीआय गोविंद बास्टे, सपोनि सुनिल पवार, पोउपनि राहुल फड, सपोनि बाबर, सफौ गाणेकर, पोह मुळे, पोह दिगंबर परजणे, पो.अं. आजिनाथ गिते, पोशि पाटील, पोअं सागर पाटील, पोअं सोनवणे, पोअं झंजे, पोअं प्रसाद पालवे, मपोशि गीरी यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय बास्टे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here