पाथरी(प्रतिनिधी) दि. २ फेब्रुवारी: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रिंगणात हदगाव गट हा राजकीय युद्धभूमी ठरला आहे. येथे शिवसेना (उबाठा गट)चे सुरेशराव ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अजिंक्य नखाते आणि शिवसेना (शिंदे गट)च्या शकुंतला फासाटे या दिग्गज उमेदवारांमध्ये त्रिकोणी लढत रंगली आहे. मात्र,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनुमान मुंढे हे या लढाईचे किंगमेकर ठरत असल्याचे गटातील राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेत आहे.

या गटात ओबीसी मतदार ४० टक्के, बौद्ध मतदार १० टक्के आणि मुस्लिम मतदार १० टक्के असा एकूण ६० टक्के मतांचामोठा वाटा आहे. हे सर्व मतदार वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सांगत आहेत. यामुळे तीनही प्रमुख पक्षांच्या दिग्गजांना विजयाची खात्री नसून, हनुमान मुंढेंच्या मतांचा निर्णायक प्रभाव पडणार आहे. गटातील प्रचारकार्यात मोठ्या प्रमाणावर सभा, रॅली आणि घराघरापर्यंत पोहोच होत असून, दिग्गज उमेदवारांकडून वंचित मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

हादगाव गटाची राजकीय पार्श्वभूमी पाहता, हा गट परभणी जिल्हा परिषदेतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. येथील ओबीसी समाज हा पारंपरिकदृष्ट्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरतो, तर बौद्ध आणि मुस्लिम मतदार हे सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर एकजूट होतात. वंचित बहुजन आघाडीने या मतदारांना लक्ष्य करून हनुमान मुंढे यांना उभे केले असून, त्यांच्या स्थानिक लोकप्रियतेमुळे ते किंगमेकर म्हणून उदयास आले आहेत. गेल्या आठवड्यात वंचितचे पक्षप्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली तर आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी रेनाखळी येथे सुजात आंबेडकर यांची सभा होणार आहे.त्याचबरोबर मुंढे यांनी गेल्या काही दिवसांत गावोगावी सभा घेऊन आरक्षण, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर जागृती केली असून, मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.
दुसरीकडे,शिवसेना(उबाठा)चे सुरेशराव ढगे हे स्थानिक नेत्यांच्या पाठबळावर मजबूत आहेत,तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजिंक्य नखाते हे पक्षसंघटनेच्या बळावर पुढे आहेत.शिवसेना शिंदे गटाची शकुंतला फासाटे मात्र महिलांच्या मतांवर भर देत आहेत.तरीही, या तिघांपैकी कोणालाही एकट्याने विजय मिळवणे कठीण असून, वंचितचे मुंढे यांच्या मतांचा वाटा ठरविणारा ठरेल,असे मत विश्लेषक देत आहेत.गटातील कार्यकर्ते सांगतात की,”हे मतदान वंचितचे असल्याने हादगावचा निकाल मुंढेंच्या हातात आहे.”
हादगावसारख्या गटांमधील किंगमेकर भूमिका जिल्हा परिषदेच्या संख्याबळावर परिणाम करणारी ठरेल.हादगावकर मतदार आता हनुमान मुंढेंच्या किंगमेकर भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. विजयाचा निर्णय या ६० टक्के वंचित मतांचा असणार हे स्पष्ट असून, दिग्गजांना नव्या रणनीती आखाव्या लागतील.
