परभणी(प्रतिनिधी)तालुक्यातील पिंपळा येथे किर्तनसेवा आटोपून आपल्या गावाकडे निघालेल्या तिघा किर्तनकारांचा झरी परिसरात परभणी – जिंतूर राष्ट्रीय महामार्गावर कार व दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन मुत्यु झाल्याची घटना शनिवारी(दि. १०) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

माऊली दिगंबरराव कदम(वय ३०), प्रसादराव कदम(वय ४५) दोघे रा. बोर्डी ता. जिंतूर आणि दत्ता माणिकराव कऱ्हाळे(वय ३०) रा. मुडा ता. जिंतूर अशी मयत किर्तनकारांची नांंवे आहेत. परभणी तालुक्यातील पिंपळा येथे किर्तनसेवा आटोपून शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रं – एमएच – २२ एएक्स ९५७६ द्वारे गावाकडे परतत असताना जिंतूर – परभणी राष्ट्रीय महामार्गावर झरी परिसरातील निम्न दुधना कालवा परिसरात परभणीच्या दिशेने येत असलेली कार क्रं – एमएच २९ बीव्ही ७७९० ची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कार आणी दुचाकीचा चुराडा झाला. अपघात एवढा जोराचा होता की दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख, ग्रामीण पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिघाही किर्तनकारांना मयत घोषित केले.

या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. अपघाताच्या या भीषण घटनेमुळे बोर्डी आणि मुडा या गावांवर शोककळा पसरली आहे.
_