पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यात अवैध वाळू उपसाला रोख लगावून,गुंज येथे जप्त करण्यात आलेली वाळू घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ८ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत अंदाजे चाळीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली, आणि ९ डिसेंबरला घरकुलासाठी पाच ब्रास प्रती लाभार्थी वाटप करण्यात आले. 
तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हांदेश्वर यांनी कठोर कारवाई केली आहे. ८ डिसेंबर रोजी पाथरी तालुक्यातील गुंज या ठिकाणी सुमारे चाळीस ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली. नंतर, जप्त केलेला वाळू गटबद्ध पद्धतीने घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप झाला. प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू देण्यात आली. यामध्ये गुंज,तुरा, मसला खुर्द,सारोळा इत्यादी गावातील लाभारती होते. यावेळी तहसीलदार शंकर हांदेश्वर, नायब तहसीलदार धोपे, मंडळ अधिकारी बागुल, तलाठी नितीन गाडेकर, तलाठी सानप,तलाठी घाडगे यांच्या उपस्थितीत गुंज गावचे ग्रामसेवक देखील होते. 
हा उपक्रम घरकुल योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरबांधणीसाठी आवश्यक वाळू पुरवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. तसेच, अवैध वाळू उपसाच्या विरोधात प्रशासनाच्या दक्षतेचेही द्योतक ठरतो. जप्त वाळूची घरकुल लाभार्थ्यांना वाटप करणारी ही घटना शासनाच्या वाळू नियंत्रण धोरणाशी सुसंगत आहे आणि यामुळे घरकुल योजना सुरळीत अंमलात येण्यास मदत होईल.