परभणी,दि.06(प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार 6 डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्ते व हजारो नागरीकांनी पुष्पहार अर्पण करुन व पुष्पवृष्टी करीत अभिवादन केले.
भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. यावेळी सामुहीक बुध्द वंदना घेण्यात आली. पूजनीय भन्ते, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव बाबासाहेब धबाले, ज्येष्ठ नेते बी. एच. सहजराव, दशरथ गायकवाड, उपाध्यक्ष डी. आय. खेडकर, व्ही. व्ही. वाघमारे, प्रा. डॉ. प्रविण कनकुटे, विश्वनाथ झोडपे आदी मान्यवरांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
सभेचे अध्यक्ष डी. आय. खेडकर यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वज अर्ध्यावर फडकावण्यात आला. समता सैनिक दलाच्या डी. के. टोंपे, नागनाथ सोनुले आणि राहुल कोसे यांनी मानवंदना दिली. त्यानंतर भंते पी. धम्मानंद व भंते धम्मपाल यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलाचे ग्रहण करून दिले. बौद्धाचार्यांनी गाथा सादर करताच परिसर शांतता, करुणा आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या राणुबाई वायवळ, अविनाश सरवदे, भारत खाडे, बी. जी. शिंदे, राजकुमार, गोपीनाथ कांबळे, शंकर भारशंकर, भगवान काकडे, डॉ. अगस्ती इंगोले, किशनराव लझडे, सूर्यकांत साळवे, भारत देवरे, पंडित तुपसमुंद्रे, एम. एम. बरे, पी. एल. वानखेडे, मुकुंद खाडे, एस. एम. कांबळे, अतुल वैराट, राजकुमार साळवे, चुडाजी धबाले, बी. बी. भराडे, भगवान सांडवे, सुभाष मकरंद, नागोराव लहाडे, अरविंद पांडव, रमेश घनघाव, बापुराव मोरे, प्रसाद कनकुटे, संजय बगाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अभिवादनाकरीता दिवसभर उसळली गर्दी…
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादनाकरीता सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठाने, मित्रमंडळ, पक्ष किंवा अन्य वसाहतीतील संघटनांच्या पदाधिकार्यांनी, सामान्य नागरीकांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. शहरातील शैक्षणिक संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालये किंवा अन्य ठिकाणीही अभिवादनासह अन्य छोटे मोठे कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले.