परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियानात 1 कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त
538 प्रकरणात 557 आरोपींवर गुन्हे; पोलिसांची प्रभावी कारवाई
परभणी (प्रतिनिधी) : नांदेड पोलिस परिक्षेत्रांतर्गत परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियानाच्या सातव्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात मोठी कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेत विविध प्रकरणांत 1 कोटी 1 लाख 53 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण 538 प्रकरणात 557 आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या अभियानात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमलीपदार्थ, वैश्या व्यवसाय, अवैध वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक यांसह विविध गैरव्यवहारांवर कारवाई करण्यात आली.
पूर्णा पोलिस ठाणे हद्दीत गांजा लागवड व गांजा बाळगणे या प्रकरणात दोन आरोपींवर कारवाई करून 6 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कार्यवाहीसाठी संबंधित पथकाचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
याशिवाय काही आरोपींना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करून त्यांची रवानगी छत्रपती संभाजीनगर कारागृहात करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातही हे अभियान अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असून हे वर्षातील शेवटचे अभियान असणार आहे. यात विशेषतः गुटखा, रेती, अंमलीपदार्थ, मटका व जुगार निर्मूलनावर भर दिला जाणार आहे.
परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध व्यवसाय निर्मूलनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहानिरीक्षक उमाप यांनी केले आहे. यासाठी पोलिस परिक्षेत्राने खबर हेल्पलाईन 9150100100 सुरू केली असून, या क्रमांकावर कॉल वा व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार नोंदविता येऊ शकते. तसेच जवळच्या पोलिस ठाण्यात अथवा अधिकृत संकेतस्थळावरही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी चालविलेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळत आहे.