पाथरी: शहराच्या हृदयस्थानी असलेल्या सेंटर नाका व बस स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाचं होतोय. मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने, दुचाकींचा मेळा आणि बसांच्या गर्दीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या गंभीर रूप धारण करत असून,वाहतूक कोंडीमुळे अपघातांची वाढ होतेय. पाथरीकरांच्या प्रश्नांना कधी मार्ग मिळणार?

पाथरी शहरात वाहतूक कोंडीही नित्याची समस्या बनली आहे. विशेषत:बस स्थानक परिसर व सेंटर नाका चौक हे दोन ठिकाणे वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. शहरातून जाणारा मुख्य रस्ता, शिक्षक कॉलनी रोड आणि पोलीस स्टेशन रोड अशा चार मार्गांचा संगम असलेल्या सेंटर नाक्यावर पोलीस ठाण्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही वाहनांची गर्दी अनावर होते. सकाळी बाजार वेळेत, दुपारी शाळा-कॉलेजच्या वेळी आणि संध्याकाळी व्यावसायिक गर्दीमुळे या ठिकाणी तासभर कोंडी होते. यामुळे वाहनधारकांचा वेळ, इंधन खर्च होतो आणि चिडचिड वाढते.

सेंटर नाकाची समस्या फक्त गर्दीपुरती मर्यादित नाही. या चौकात चारही दिशांना येणारी वाहने एकाच वेळी धावल्याने छोटे-मोठे अपघात रोज होतात. दुचाकी चालकांची बेशिस्त वागणूक, चारचाकी वाहनांचे चुकीचे पार्किंग आणि रस्त्यांची खराब अवस्था यामुळे अपघातांची शयता नेहमीच कायम असते. एका वाहनधारकाने सांगितले, “पोलीस ठाणे जवळ असूनही वाहतूक पोलिस दिसत नाहीत. कधी तरी सिग्नल लावून नियंत्रण करावे लागते, पण तेही दुर्मीळ आहे.” परभणी जिल्ह्यातील इतर शहरांप्रमाणे पाथरीतही रस्ते अरुंद असल्याने ही कोंडी वाढते.
दुसरीकडे,बस स्थानक परिसरही तितकाच गंभीर. बसस्थानकातून निघणाऱ्या एसटी बसेसना मुख्य रस्त्यावरील हॉटेल शिमला व अंजली हॉटेलजवळ उभ्या राहिलेल्या दुचाकींमुळे मोठी अडचण येते. खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करतात, ज्यामुळे बसांना मुख्य रस्त्यावर येण्यास अडसर निर्माण होतो. यात बसस्थानकाबाहेरील व्यापारी दुकानांजवळील वाहनांची गर्दी जोडली तर परिसर पूर्णपणे बंद होतो. परिणामी, प्रवासी उशीर होतो आणि अपघात टाळण्यासाठी चालकांना जोखीम घ्यावी लागते.
नागरिकांमध्ये एकच प्रश्न ऐकायला मिळतो –शहरात कुठेही वाहतूक पोलिस दिसत नाहीत!बाजार वेळेत किंवा गर्दीच्या वेळी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांची गरज आहे, पण ती पूर्णपणे नगण्य आहे. परभणी, घनसावंगीप्रमाणे पाथरीतही रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे मुख्य मार्ग अडकतात. वाहनधारक मागणी करतात की,वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सिग्नल सिस्टम आणि पार्किंगसाठी वेगळे जागा उपलब्ध कराव्यात. अन्यथा,वाहतूक कोंडीमुळे प्रदूषण वाढेल आणि अपघातांची संख्याही वाढेल.

पाथरी सारख्या वाढत्या शहरात ही समस्या शाश्वती पर्यायाशिवाय सोडवता येणार नाही. बाह्यवळण रस्ता, सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे आणि पोलिसांना सक्रिय करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतल्यास पाथरीकरांना दिलासा मिळेल. अन्यथा,वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी लागणार मार्गी?