परभणी(प्रतिनिधी): पाथरी ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर आर.बी. घोडके इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने रोड दुपदरीकरण आणि चौपदरीकरणाच्या नावाखाली हजारो अनधिकृत झाडांची कत्तल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पर्यावरण ध्वंसकारी कृत्यामुळे स्थानिक पर्यावरणवाद्यांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र धर्मे यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला असून, कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक चार, बीड येथील अधिकाऱ्यांनी आर.बी.घोडके इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला पाथरी ते इंजेगावपर्यंत ४१ किलोमीटर लांबीच्या रोडचे दुपदरीकरण आणि चौपदरीकरणाचे टेंडर दिले होते. या कामाच्या कार्यक्षेत्रात मध्यभागापासून दोन्ही बाजूने आठ मीटरपर्यंत अडथळा ठरणारी केवळ २२९ झाडे (लिंब, पिंपळ, सिरस, बाभूळ, उंबर, सौंदड, वर्ड, बोर, पळस, गुलमोहर इत्यादी) तोडण्याची परवानगी वन विभागाने दिली होती. मात्र, कंपनीने या मर्यादेचे उल्लंघन करून रोडवरील सर्सकट हजारो झाडांची कत्तल केली असल्याचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे.

या प्रकरणाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासन दरवर्षी शतकोटी वृक्षलागवड मोहिमा राबवून कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या नावाखाली कंपन्यांकडून झाडांची अशा प्रकारे कत्तल होणे हे विरोधाभासी आहे. यातून वरकमाईसाठी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, की या कत्तलीमुळे रोड किनारी सावली आणि ऑक्सिजन पुरवठा कमी झाला असून, प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शिवसेनाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. ११ डिसेंबर रोजी त्यांनी परभणी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन आर.बी. घोडके इन्फ्रा कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. २३ डिसेंबरला पुन्हा निवेदन देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला, की दोन दिवसांत कंपनीवर कारवाई झाली नाही तर २९ डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले. धर्मे म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे. घोडके कन्स्ट्रक्शनने हजारो झाडांची अनधिकृत कत्तल करून निसर्गाचा लढवून टाकला आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करावी.”
या प्रकरणाची चाहूल लागताच स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनीही हालचाली सुरू केल्या आहेत.पाथरी -इंजेगाव राष्ट्रीय महामार्ग हे बीड आणि परभणी जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते आहे. येथील वृक्षकत्तलमुळे वाहनचालकांना उष्णतेचा त्रास होईल आणि जैवविविधता नष्ट होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. वन विभागाने अद्याप याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण शिवसेनेच्या अल्टिमेटममुळे प्रकरण तीव्र स्वरूप धारण करत आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५४८वर घडलेल्या या घटनेने अनधिकृत वृक्षकत्तल आणि रोड कन्स्ट्रक्शन नियमांचे पालन याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. संबंधित विभागांनी तात्काळ तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनांना वेग येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.