रस्ता सुरक्षा अभियानाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
नियम पाळा…जीव वाचवा…! सुरक्षित परभणीचा संकल्प..!
परभणी, दि. 07 (प्रतिनिधी) :रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी व नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यभर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान-2026 चा उद्घाटन सोहळा आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
जिल्हाधिकारी यांनी रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी ठरण्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी होणे हेच खरे फलित असल्याचे सांगितले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, अनावश्यक हॉर्न न वाजवणे तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अवैध वाळू वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. “सुरक्षित परभणी निर्माण करूया” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविण्याची गरज व्यक्त केली. दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने हेल्मेटचा वापर अनिवार्य असून, हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले. जानेवारी महिन्यात संपूर्ण देशभर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असून, यामध्ये जनजागृती कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा तसेच अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरही करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अभियानांतर्गत परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी व सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटन सोहळ्यावेळी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका, स्कूल बस मार्गदर्शिका, जीवनदूत मार्गदर्शिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षेबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” अशी असून, रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते रडार यंत्रणा बसवलेले इंटरसेप्टर वाहनाचा हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शुभारंभ देखील करण्यात आला.