महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र दौरे केले होते. मुंडे हे मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी नामांतर आंदोलनात तुरुंगवासही भोगला होता. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं प्रमोद महाजनांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषतः मतदारसंघावर असायचे. वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्त्व बहरू लागले. अशातच मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आज भाजपची रणनीती बदलली असून सरंजामी नेतृत्व पुढे आले आहे . या सरंजामशाही विरोधात एखाद्या बहुजन नेत्याने बहुजनांचे विचार कृतीत आणण्यास सुरुवात केली की भाजप त्यांचे बळ काढून घेते. कारण वसंतराव भागवतांसारख्ये बळ देणारे नेते सध्या भाजपमध्ये किती उरले आहेत हा प्रश्न. कारण, गोपीनाथ मुंडे यांच्या समकालीन नेत्यांची आज पक्षामध्ये वाताहत होतांना दिसते आहे.
१९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.१९८० मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९० आणि १९९५ मध्ये याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८० ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २००९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले.
वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये मुंडे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. इ.स. १९८५ मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा सचिव झाले. इ.स. १९८० साली बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना गेवराई मतदारसंघातच काँग्रेसचे पंडितराव दौंड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही.या अपयशानंतर त्यांनी आपले वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित केले आणि सातत्याने काम केले. सत्ता नसतानाही अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्ष आणि समाजाच्या सीमांपलीकडे तयार केला. म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत मुंडे यांची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच भाजपच्या वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. 
इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला. विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली. गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मण्डल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले. मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले होते.
विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडादरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणूक त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली. बीड लोकसभा मतदारसंघातून म्हणून निवडून येताना भाजपचे आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला व त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आणि २०१४ मध्ये त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तृत्त्व असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर आहेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य आहे, असेच म्हणावे लागेल.
– पदमाकर उखळीकर,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२ .
kalpadmakarukhlikar@gmail.com.