परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका हा नेहमीच अवैध वाळू उपसण्यासाठी ओळखला जाणारा तालुका आहे या तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठे असल्याने नाथरा ते मुद्गल पर्यंत ठिकठिकाणी तराफे व इतर अवजाराच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा करण्यात येतो. परंतु जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा लक्षात घेता जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी महसूल मधील सर्वच तहसीलदार यांना अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी आदेश दिले. या आदेशानंतर परभणी जिल्ह्यामध्ये चालू असलेला ठिकठिकाणी अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी दररोज कुठे ना कुठेतरी कारवाई महसूल प्रशासनाकडून करण्यात येऊ लागली.याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 14 डिसेंबर शनीवार रोजी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व पाथरी तहसीलचे तहसीलदार शंकर हंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश धोपे व तलाठी तायनाक यांनी दुचाकी वर गोदावरी पात्रात गेले.
असता त्यांना गोदावरी नदीपात्रामध्ये तीन तराफ्याच्या साह्याने वाळू उपसा चालू असल्याचे दिसून आले.परंतु नायब तहसीलदार रमेश धोपे व तलाठी यांना पाहताच दोन तराफे घेऊन वाळू उपसा करणारे गोदावरी नदीपात्राच्या पलीकडील बाजूस जाऊन बसले तर नायब तहसीलदार रमेश धोपे व तलाठी तायनाक यांच्या हाती एक तरफा लागला. सदर घटनेची माहिती धोपे यांनी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंदेश्वर यांना फोनवरून कळवली व आणखी कर्मचारी व पोलीस बंदोबस्त पाठवण्याची विनंती केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना सदर घटना सांगुन घटनास्थळी जाण्यासाठी कळवले व तहसीलदार शंकर हंडेश्वर यांनी दोन तलाठी तहसीलची गाडी घटनास्थळी पाठवली.पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदरील ठिकाणी आढळून आलेले साहित्य व तराफा नायब तहसीलदार रमेश धोपे,पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,तलाठी तायनाक,तलाठी गाडेकर,जोशी इत्यादींनी पेट्रोल टाकून नष्ट केले. सदर कारवाईने गौडगाव येथील वाळू माफियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.