पाथरी (प्रतिनिधी): पाथरी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफिया यांचा धंदा नेहमीच चर्चेत असतो.परंतु मंगळवार रोजी भर दिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास गुंज-तुरा रोडवर महसूल पथकाने लाल-पांढऱ्या रंगाचा नंबरविरहित टिप्पर पकडला.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, स्थानिक प्रशासनाने अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध ठोस पावले उचलल्याचे दिसून आले.पाथरी तालुका हा गोदावरी नदीच्या पात्रामुळे अवैध वाळूचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला आहे. नाथरा, मरडसगाव, गुंज, गोडगाव, उमरा यासारख्या ठिकाणी दिवसभर वाळू माफियांकडून गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केला जातो. ही वाळू रात्रीच्या अंधारात बिनबोभाटपणे वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक केली जाते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, नदीकाठची पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे.अशा प्रकारची वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग सतत प्रयत्नशील आहे, तरीही वाळू माफियांचे जाळे व्यापक असल्याने आव्हाने कायम आहेत.
सविस्तर बातमी अशी की, दुपारी ४ वाजून ३० दुपारच्या सुमारास नायब तहसीलदार रमेश धोपे यांना गुंज-तुरा रोडने अवैध वाळूत वाहतूक करणारा टिपर येत असल्याची माहिती मिळाली.या गुप्त माहितीच्या आधारे नायब तहसीलदार धोपे यांनी गुंज-तुरा रोडवरील सदर टिप्पर अडवला.तपासणीत नायब तहसीलदार धोपे यांना टिप्परमध्ये अवैध वाळू आढळली. चालकाकडे पावती किंवा परवानगीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. चालकाने याबाबत स्पष्टीकरण देण्याऐवजी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती फोनवरून उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना देण्यात आली.त्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि महसुली दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. परिणामी, सदर टिप्पर पाथरी तहसील आवारात आणून जप्त करण्यात आला. चालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू असून, टिप्पर मालक आणि संबंधितांवरही छापा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई भर दिवसा झाल्याने वाळू माफियांमध्ये भीती पसरली आहे.
पाथरीसारख्या तालुक्यांत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग भरारी पथके तैनात करतो. मात्र, अलीकडील घटनांमधून असे दिसते की, वाळू माफियांचा प्रभाव इतका प्रबळ आहे की, काहीवेळा अधिकाऱ्यांनाही धमक्या मिळतात. उदाहरणार्थ, परभणी जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशा कारवायांमध्ये पोलिस आणि महसूल पथकांना अडथळे आणले गेले आहेत. तरीही, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास वाढला असून, गोदावरी नदी संरक्षणासाठी आणखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.अवैध वाळू उपसामुळे नदीची खोली वाढत असल्याने पूरप्रवणता वाढते आणि शेतजमिनींना धोका निर्माण होतो. शासनाने गौण खनिज धोरणांत कडक अंमलबजावणी केली तरच वाळू माफियांचा उद्धव नष्ट होईल.पाथरी तालुक्यातील ही कारवाई भविष्यातील छाप्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.सदरील कारवाई उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश धोपे, तलाठी विजय भदर्गे, सय्यद साजिद आणि श्रीनिवास तायनाक, सहाय्यक महसूल अधिकारी वसंत पिटले यांनी केली आहे.

———————हे ही वाचा —————–
रात्री चालु असलेल्या वाळुच्या अवैध वाळु वाहतुकीवर कधी होणार कारवाई
रात्रीच्या वेळी खुले-आम गोंडगाव,गुंज,मरडसगाव येथून वाळूची अवैध वाहतूक पाथरी-मानवत येथे वाहतूक रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत होत असताना पाथरी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सदरील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर का कारवाई केल्या जात नाही हे मात्र कळायला मार्ग नाही. सदरील वाहनांवर कधी कारवाई होणार हे देखील पाहणं औचित त्याचं राहील
काही क्षणातच माफीयांचा थवा तहसील आवारात दाखल
आज दुपारी पथकाने तुरा रोडवरील खदानजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पथकाने पकडला आणि तो टिप्पर पुढील कारवाईसाठी तहसीलमध्ये आणण्यात आला सदरील बाब अतिशय झपाट्याने वाऱ्यासारखी वाळू माफियात पोहोचली आणि काही क्षणातच तहसीलच्या आवारामध्ये वाळू माफियांचा एक मोठा थवा दाखल झालं.
चार चाकीत बसलेल्या खबऱ्यांवर पोलिसांकडून कधी होणार कारवाई
रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक गौडगाव,गुंज,मरडसगाव येथून रोज रात्री होते.परंतु सदरील अवैध वाढू वाहतुकीसाठी पाथरी शहराच्या आजूबाजूला वाळू माफी यांचे खबरी चार चाकी वाहनांमध्ये बसून महसूल प्रशासन असो की पोलीस प्रशासनावर नजर ठेवून असतात त्यामध्ये ज्या ठिकाणी महसूल अधिकारी किंवा तहसीलच्या अधिकारी,वरीष्ठ पोलीस अधिकारी वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या अवघ्या काही अंतरावरच चार चाकी वाहनात खबरी तैनात असतात. त्याच बरोबर पोखर्णी फाटा, आयटीआय कॉर्नर, तुरा फाटा, सोनपेठ फाटा, बाबळगाव फाटा इत्यादी ठिकठिकाणी वाळू माफियांचे खबरी हे चार चाकी वाहनांमध्ये बसून रस्त्यावर पाळत ठेवत असतात सदरील खबऱ्यांवर पोलिसांकडून कधी होणार कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.