Home गुन्हेगारी पाथरी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या मूक संमतीचा प्रश्न अनुत्तरित

पाथरी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या मूक संमतीचा प्रश्न अनुत्तरित

पाथरी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या मूक संमतीचा प्रश्न अनुत्तरित

पाथरी (प्रतिनिधी) – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका सध्या अवैध धंद्यांच्या सुळसुळाटामुळे चर्चेत असून, मटका, अवैध दारू, गुटखा, अमली पदार्थ तसेच रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतूक या सर्व प्रकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी पोलिसांचे मौन, निष्क्रियता आणि कथित मूक संमती यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ आहे का?” असा सवाल जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.

 

मटका,अवैध दारू, गुटखा आणि अमली पदार्थांचे उघड धंदे,अवैध वाहतुक माहितीनुसार,पाथरी शहरासोबतच तालुक्यातील ग्रामीण भागातही मटका, अवैध दारू विक्री, गुटखा पुरवठा आणि अमली पदार्थ यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट आवळले जात आहे.काही भागात मटक्याच्या चिट्या खुलेपणाने फिरताना दिसत असून,लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत अनेक जण या व्यसनाधीन जुगारप्रकारात ओढले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.अवैध दारूच्या अड्ड्यांमुळे गावागावांत भांडणे,घरगुती कलह, अपघात आणि गुन्हेगारी वाढत असल्याचीही नोंद नागरिकांकडून करण्यात येत आहे. गुटखा आणि संबंधित पदार्थांवर बंदी असतानाही चोरट्या मार्गाने पुरवठा होऊन टपरी, किराणा दुकाने आणि चौकाचौकात हे पदार्थ सहज उपलब्ध असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.यासोबतच अमली पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याची गंभीर चर्चा पालकांमध्ये सुरू असून, युवकांच्या भवितव्यावर काळी छाया पडत असल्याची भीती व्यक्त होत आहे

 

पाथरी तालुक्यात मटका जुगाराचे उघड अड्डे

पाथरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात“कल्याण मुंबई” नावाचा मटका“बिंगो”नावाचा मटका मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. या मटका जुगारातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, यातून स्थानिक युवक आर्थिक गर्तेत ओढले जात आहेत,अशी भीती व्यक्त केली जात आहे. या मटका केंद्रांच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना असताना, ती पोलिसांना माहीत नसणे अशक्य असल्याची कुजबुज गावागावात सुरू आहे.

 

अवैध दारू, गुटखा आणि अमली पदार्थांचा उघड व्यापार

पाथरीत अवैध दारू विक्रीसह अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. गुटखा,सुगंधित पानमसाला, बनावट शिक्क्यांची दारू,तसेच तरुणांना शरीरसाठी घातक ठरणारे अमली पदार्थ खुलेआम विक्रीस उपलब्ध असून, शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातही त्याचा प्रभाव जाणवू लागल्याचे पालक सांगत आहेत.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय असूनही,आजवर कोणतीही गाजलेली मोहीम किंवा मोठ्या प्रमाणावर छापे न पडणे,हा प्रश्न अधिकच गडद करणारा ठरत आहे.

 

पोलिस कारवाईचा अभाव आणि हप्तेखोरीचा संशय

स्थानिकांच्या मते, पाथरी पोलिसांकडून या अवैध धंद्यांवर कोणतीही ठोस, सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने,“कर्तव्यापेक्षा आता हप्ता मोठा झाला का?असा उपरोधिक सवाल जनतेतून विचारला जात आहे.अनेक व्यापाऱ्यांच्या कुजबुजीनुसार, अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी, नियमित हप्त्यांच्या बदल्यात पोलिसांकडून जणू मूक संमती दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.यामुळे पाथरी शहराबरोबरच ग्रामीण भागातही अवैध धंदेवाले दिवसाढवळ्या आणि रात्री उघडपणे मिरवताना दिसत असून,“हप्तेखोरीमुळेच अवैध धंद्यांचा नंगानाच सुरू आहे का?”असा प्रश्न उपस्थित होतो.

 

रात्रभर सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक

गोदावरी व स्थानिक नद्या–नाल्यांजवळून रात्रभर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून दिली जात आहे. मोठ्या ट्रॅक्टर–ट्रॉली,भरधाव ट्रक,डंपर यांच्या साहाय्याने वाळूची चोरी होऊन ती बांधकाम व्यावसायिकांपर्यंत पोहोचते; या सर्व प्रक्रियेत मोठ्या रकमेचे व्यवहार होत असल्याचा संशय आहे.या वाहतुकीचा आवाज, धूळ आणि रस्त्यांची नासधूस यामुळे रात्री नागरिक त्रस्त असतानाही,रात्रीच्या गस्त पथकांचे अस्तित्व केवळ कागदावरच आहे का,असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

 

 “पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का?” – जनतेचा सवाल

पाथरीत चालणाऱ्या या सर्व अवैध धंद्यांच्या जाळ्याबाबत नागरिकांचा ठाम प्रश्न असा आहे “पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे अवैध धंदे इतक्या निर्भयपणे चालू शकतात का?”पोलिस ठाण्याच्या हद्दीत असंख्य अवैध अड्डे सुरू असताना, केवळ किरकोळ, दिखाऊ कारवाया करून खऱ्या सूत्रधारांना मोकळे सोडले जात असल्याचा आरोप होत आहे. यातूनच, वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत काहींचे आर्थिक साखळीतील हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.

 

 “पाथरी पोलिसांनी माफियांकडून हप्ते बांधले का?” – आरोपांची धार

बाजारपेठ, बसस्थानक परिसर, काही वसाहती आणि ग्रामीण भागातील चौक–गल्लींमध्ये मटका,अवैध दारू, गुटखा आणि अमली पदार्थांचे अड्डे कोणत्या वेळेस सुरू होतात आणि केव्हा बंद होतात, हे सर्वसामान्य नागरिकांना माहित असताना, पोलिस मात्र वारंवार “माहिती मिळाल्यास कारवाई करू” या पद्धतीची भूमिका घेत असल्याचे दिसते. यामुळेच स्थानिक स्तरावर “पाथरी पोलिसांनी माफियांकडून हप्ते बांधून घेतले आहेत असा थेट आरोप केला जात आहे.नागरिकांच्या मते, मुख्य सूत्रधारांना हात न लावता, केवळ किरकोळ बाळगणाऱ्यांवर कारवाई करून आकडेवारी वाढवली जात आहे.

आयजी साहेब अवैध धंद्यांच्या वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचा होतोय प्रयत्न?

पाथरी तालुक्यातील वाढत्या अवैध धंद्यांवर स्थानिक पत्रकारांनी सलगपणे बातम्या प्रकाशित करताच संबंधित पत्रकारांवर दबाव टाकण्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. या प्रकरणात आयजी स्तरापर्यंत तक्रारीचा धागा पोहोचत असल्याची चर्चा होत असून, पोलिस यंत्रणेची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

पाथरी तालुक्यात दारू, जुगार, मटका, वाळू तस्करीपासून इतर विविध अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लोकांसमोर आणली. या बातम्यांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली, तर दुसरीकडे या धंद्यांना आश्रय देणाऱ्या राजकीय व प्रशासकीय स्तरावरही अस्वस्थता वाढली, अशी स्थानिकांचे म्हणणे आहे.याच पार्श्वभूमीवर, पाथरी तालुक्याच्या हद्दीमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या बातम्या प्रकाशित केल्यानंतर काही पत्रकारांवर पाथरी पोलिसांकडून एकतर थेट दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय. संबंधित पत्रकारांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून बातम्यांचा पद्धतशीर लेखाजोखा विचारला जात असल्याचे सांगितले जाते. काहींना “अशी वृत्तांकन नको”, “वरून ऑर्डर आहे”, “बातम्या सौम्य करा” अशा इशाऱ्याच्या स्वरूपात सूचना दिल्या गेल्याचा आरोप पत्रकारांकडून व्यक्त केला जात आहे.याहून गंभीर बाब म्हणजे, अवैध धंद्यांवरील बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांचे मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक माहितीच अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या काही व्यक्तींना पुरवली जात असल्याची चर्चा रंगली आहे.या माध्यमातून संबंधित पत्रकारांवर अप्रत्यक्ष दबाव, धमकी, तसेच सामाजिक-राजकीय स्तरावर बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. “काय लिहितोस, कोणाच्या सांगण्यावर लिहितोस” अशा स्वरात थेट फोन कॉल,रात्री उशिरा येणारे अज्ञात कॉल, सोशल मीडियावरील ट्रोलिंग यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

अवैध धंद्यांवरील बातमी प्रकाशित करणाऱ्या काही पत्रकारांविरुद्ध खोट्या तक्रारी तयार करण्याची, वाहतूक व इतर किरकोळ प्रकरणांतून त्यांना अडकवण्याची भाषा काही दलालांकडून केली जात असल्याचेही समोर येत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे “अवैध धंद्यांवर बातमी केली तर पत्रकार होतो लक्ष्य” अशी भीती नव्या पत्रकारांमध्ये निर्माण होत आहे. अनुभवी पत्रकार मात्र हे सर्व हेरगिरी, दडपशाही आणि बदनामीचे डावपेच असल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत.

पत्रकार संघटनांचा आरोप आहे की,अवैध धंद्यांविरोधात पाथरी पोलिसांकडून ठोस, सातत्यपूर्ण कारवाई करण्याऐवजी उलट त्या धंद्यांचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांवरच चौकशीचा ससेमिरा लावला जातोय. अशा प्रकारची भूमिका हा लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर सरळ हल्ला असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. पत्रकारांवरील दबावामुळे निष्पक्ष वृत्तांकनाला गंड बसणार, भ्रष्टाचार व अवैध धंद्यांविरोधातील लोकमत कमकुवत होणार, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.कायदा तज्ज्ञांच्या मते, पत्रकारांवर अशाप्रकारे दबाव आणणे, त्यांची वैयक्तिक माहिती तृतीय व्यक्तीकडे देणे, धमकी देणाऱ्या परिस्थिती निर्माण करणे हे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नसून कायदेशीरदृष्ट्याही गुन्हेगारी कृत्याच्या कक्षेत येऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये मानवाधिकार आयोग, पत्रकार सुरक्षा कायदा (जिथे लागू आहे) तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कडक चौकशी होऊ शकते.या प्रकरणी आयजी स्तरावर सविस्तर चौकशी करून पाथरी तालुक्यातील अवैध धंदे आणि त्यावर पडदा टाकण्याच्या कारवायांचा संपूर्ण तपास व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनांतून होत आहे. तसेच, अवैध धंद्यांविरोधात बातमी करणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे, हेल्पलाइन आणि तात्काळ कारवाईची यंत्रणा निर्माण करण्याची गरजही या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी काय कारवाई करणार,याकडे पाथरी शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पाथरीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम सुरू असलेले विविध अवैध धंदे आणि त्यात काही पोलिसांच्या कथित हितसंबंधांबाबतचे आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची जनतेची मागणी जोर धरत आहे.परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी हे कठोर आणि परिणामकारक कारवाईसाठी ओळखले जातात. जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वाहतूक, गंभीर गुन्हे व संघटित गुन्हेगारीविरोधात अनेक मोहीमा राबवल्या असून कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पाथरीतील परिस्थितीकडे ते कोणत्या पद्धतीने पाहतात, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here