एका मराठी माणसाची राजकारणातील झेप ही किती असू शकते किंबहुना राजकारणात कोणतेही महत्त्वाकांक्षा न ठेवता केवळ पक्षाला समर्पित आणि पक्षाचा आदेश सर्वोच्च माणून अगदी स्वच्छ आणि आपल्या राजकीय कारकीर्दीत एकही डाग लागणार नाही असे वर्तन राजकीय नेत्यांचे सध्यातरी शक्य आहे काय? अगदी स्वच्छ राजकारणी आताच्या पिढीत दुरापास्त. पक्षाशी एकनिष्ठ राहून, पक्षाकडे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या कार्यकर्तृत्वाने मराठवाड्यातील नेता केंद्रीय गृहमंत्री पद भूषवतो हे मराठवाड्यासाठी आदर्श आणि अभिमानाची बाब आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकीय जीवनात अनेक महत्त्वाची पदं त्यांनी मिळवली. खरंतर कुठलाही राजकीय पुढारी हा राजकीय पक्षात काम करत असताना एक विशिष्ट महत्त्वकांक्षा घेऊनच पक्षाला झोकून देतो मात्र, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पिढीतील राजकीय पुढारी निस्वार्थ भावनेने पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करत असत. शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि अखेरचा श्वास सुद्धा काँग्रेस पक्षात घेतला. आपली राजकीय कारकीर्द ज्या पक्षाने इतिहासात नोंद होईल अशी घडवली त्याच पक्षाशी दोन हात करणारे नेते जागोजागी दिसतात. मात्र ज्या पक्षात राजकीय कारकीर्द घडली त्याच पक्षात अखेरचा श्वास शिवराज पाटील चाकूरकर यांनी घेतला. हा आदर्श महाराष्ट्रासाठी तर आहेच परंतु मराठवाड्यातील नेत्यांसाठी सुद्धा आदर्श राहिलं. अगदी राजकारणात सक्रिय नसताना सुद्धा त्यांनी कोणत्या पदाची अपेक्षा ठेवली नाही. किंबहुना कोणत्याही इतरत्र पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही ही त्यांची ओळख महाराष्ट्र विसरणार नाही. काँग्रेसमध्ये काम करीत असताना सुद्धा त्यांनी कधीच पदाची लालसा ठेवून काम केले नाही. असे आजकाल किती नेत्यांना जमेल हा प्रश्न.
भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी ,माजी प्रधानमंत्री राजीव गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी या तिन्ही गांधींसोबत त्यांनी काम केले. राजकारणात पदं ही कर्तुत्वाने आणि नेतृत्वाने मिळत असतात . पदांची अपेक्षा ही कधी शिवराज पाटील चाकूरकर यांना शिवली नाही. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काम केलेल्या पिढीतील नेता मराठवाड्यातील असणे हे मराठवाड्यासाठी अभिमानास्पद आहे. इतिहासात याची नोंद ंद घेतली जाईल यात शंका नाही. या मराठवाड्याच्या सुपुत्राची आणि मराठी माणसाची राजकीय कारकीर्द देदीप्यमान राहिली आहे. त्यांच्या राजकीय कार्यकाळात कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही हे त्यांची आणखी8 एक ओळख. त्यांच्यावर गृहमंत्री असताना अनेक आरोप झाले मात्र भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर आजवर कोणीही आरोप करू शकला नाही. हे ही तितकेच महत्त्वाचे. शिवराज पाटील चाकूरकर राजकारणापासून गेल्या दशक भारत दूर राहिले असले तरी त्यांनी इतर कुठल्याही पक्षाशी जवळीक केली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य वाखाण्याजोग आहे. महाराष्ट्रच नाही तर सबंध भारतभर शिवराज पाटील चाकूरकर या नावाने त्यांची ओळख होती आणि कायम राहील. त्यांची राजकीय कारकीर्द डोळे दिपवून टाकणारी आहे.
शिवराज विश्वनाथ पाटील चाकुरकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी तत्कालीन हैदराबाद , आता महाराष्ट्र , भारतातील संस्थानातील लातूर जिल्ह्यातील (मराठवाडा ) चाकुर गावात झाला. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी मिळवली आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले .
१९६७-६९ दरम्यान ते स्थानिक प्रशासनात (लातूर नगरपालिका) सहभागी होते. १९७२ ते १९८० पर्यंत, ते १९७२ ते १९७८ आणि १९७८ ते १९८० अशा दोन टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर शहराचे आमदार होते. या काळात त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, उपमंत्री (कायदा आणि न्यायव्यवस्था, सिंचन, प्रोटोकॉल), विधानसभेचे उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून ७ व्या लोकसभेवर निवडून आले .१९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर सलग सातवेळा लोकसभा निवडणूक जिंकली.१९९९ पर्यंत त्यांनी १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ अशा सलग सात लोकसभा निवडणुका जिंकल्या. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला . सलग सात वेळा लोकसभा निवडणूक जिंकणे ही वाटते तितकी साधी बाब नाही.
शिवराज पाटील चाकुरकर २००४ ते २००८ पर्यंत भारताचे गृहमंत्री आणि १९९१ ते १९९६ पर्यंत लोकसभेचे १० वे अध्यक्ष होते. २०१० ते २०१५ पर्यंत पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर पाटील यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हल्ल्यांना कारणीभूत ठरलेल्या सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारली. आज असे किती राजकारणी आहेत जे स्वतः जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा देतात? त्यांच्यासाठी सुद्धा शिवराज पाटील चाकूरकर यांनी वस्तूपाठ करून दिला आहे.
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये संरक्षण राज्यमंत्री (१९८०-८२) म्हणून प्रथम प्रवेश केल्यानंतर , त्यांना वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला (१९८२-८३), जिथून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि महासागर विकास (१९८३-८४) येथे हलवण्यात आले. १९८३-८६ दरम्यान, ते सीएसआयआर इंडियाचे उपाध्यक्ष होते . त्यांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वित्त, संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यासह विविध समित्यांवरही काम केले. राजीव गांधी सरकारमध्ये ते कार्मिक, संरक्षण उत्पादन मंत्री होते आणि नंतर नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन खात्याचा स्वतंत्र कार्यभार सांभाळला. सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली . १९९२ मध्ये भारतातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्यासाठी ते ओळखले जातात . १९९९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते.संसद ग्रंथालय इमारतीचे बांधकाम आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रश्नोत्तराच्या तासाचे थेट प्रक्षेपण यासह लोकसभेच्या कामकाजाचे प्रसारण यासारख्या उपक्रमांना सुरुवात केली किंवा त्यात योगदान दिले.१९९१ ते १९९५ दरम्यान, ते विविध आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांमध्ये भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. एका मराठी व मराठवाड्याच्या7 सुपुत्राची राजकीय उंची आणि राजकारणातील संयम , सुसंस्कृतपणा ,एकनिष्ठता आजच्या राजकारण्यांसाठी एक धडा आहे.१२ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. या मराठवाड्याच्या सुपुत्राला मराठवाडा , महाराष्ट्र नाही तर देश कायम स्मरणात ठेवील!
– पदमाकर उखळीकर ,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२ .
kalpadmakarukhlikar@gmail.com.