Home राजकीय उबाठा-काँग्रेस मनपात निर्विवाद सत्ता स्थापणार संयुक्त पत्रकार परिषदेत नेतेमंडळींचा विश्‍वास:सरकारने दुजाभाव करु नये

उबाठा-काँग्रेस मनपात निर्विवाद सत्ता स्थापणार संयुक्त पत्रकार परिषदेत नेतेमंडळींचा विश्‍वास:सरकारने दुजाभाव करु नये

उबाठा-काँग्रेस मनपात निर्विवाद सत्ता स्थापणार     संयुक्त पत्रकार परिषदेत नेतेमंडळींचा विश्‍वास:सरकारने दुजाभाव करु नये

परभणी,दि.17(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या निवडणूकीत जनशक्तीने धनशक्तीवर मात करीत शिवसेना उबाठा व काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे. स्पष्ट बहुमत या आघाडीला मिळालेले असल्यामुळे आघाडीच महापालिकेत निर्विवाद सत्ता स्थापन करणार आहे, असा विश्‍वास या दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी अक्षदा मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मनपात सत्ता स्थापनेचा दावा केला.

खासदार संजय जाधव म्हणाले, या विजयाचे श्रेय परभणीकरांना असून त्यांनी महाविकास आघाडीला भरभरुन प्रतिसाद देत स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करुन लोकहीतासाठी ही आघाडी काम करणार आहे. मात्र राज्य सरकारने या पालिकेला सवतीची वागणूक देवू नये. जिल्हा नियोजन समितीत सूत्रानुसार वाटा देवून जास्तीचा वाटा मनपासाठी द्यावा, अशी मागणी करीत पालकमंत्र्यांनी कटकारस्थान न करता आपण परभणीकर म्हणून शहराच्या विकासासाठी निधी देण्याचे काम करावे, असेही खासदार जाधव म्हणाले.आमदार डॉ. राहुल पाटील यांनी धनशक्ती विरोधात जनशक्तीला दिलेला हा कौल असून त्यामुळेच क्रांतीची मशाल पेटली गेली आहे. खासदार जाधव हे पाच टर्मपासून तर आपण तीसर्‍या टर्ममध्ये आमदार म्हणून काम करीत असल्यामुळे निधी कसा खेचून आणायचा, हे आम्हाला माहित आहे. शासनाकडे जनतेचा पैसा असल्याने तो स्वतःची मालकी समजू नये. दुजाभाव न करता विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी करतांना भाजपने पराभव स्विकारावा असे आवाहनही केले.

काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी जनतेने काँग्रेस व उबाठा शिवसेनेला स्पष्ट बहुमत देतांना सत्ता स्थापनेचा आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे ही सत्ता निर्विवादपणे स्थापन करुन निश्‍चितच शहराच्या विकासासाठी आघाडी काम करेल, अशी ग्वाही दिली.  पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, शिवसेना महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे, काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी उपमहापौर माजुलाला, सय्यद कादर, मुजाहीद खान, रविराज देशमुख, नदीम इनामदार, सूर्यकांत हाके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, शहर प्रमुख ज्ञानेश्‍वर पवार, विशु डहाळे, बाळराजे तळेकर आदींची उपस्थिती होती.

सत्तेचे सूत्र ठरेल..

       काँग्रेस व उबाठा शिवसेना या आघाडीत शिवसेनेला सर्वाधिक 25 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 12 जागा आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करतांना महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती या बाबत दोन्ही पक्षाची नेतेमंडळी संयुक्तपणे निर्णय घेईल. यामध्ये खासदार संजय जाधव यांची भूमिका महत्वपूर्ण ठरेल, असेही आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

 

 

जिल्हा परिषद निवडणुकीची घेतली बैठक

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने तयारी जोरदार सुरू केली आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी परभणी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाजयांची आढावा बैठक घेतली. यावेळी गटनिहाय उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here