राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदा खासदार झाले तेव्हाचा माझा जन्म. राज्याच्या राजकारणात प्रचंड लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे अजित पवार. कोणत्याही पक्षातील नेते त्यांना आज आठवत असतील. राज्याच्या राजकारणात जेव्हा जेव्हा घडामोडी घडतात तेव्हा तेव्हा अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. राजकारण करताना अजित पवार कधी गंभीर दिसले नाहीत. एक हसत खेळत राजकारण कसं करायचं हे त्यांच्याकडून अनेक राजकारण्यांना शिकण्यासारखं आहे.राजकारणात अजित पवार यांच्या नावाची चर्चा नाही असं कधी झालं नाही. त्यांचे निर्णय स्पष्ट असतं आणि त्या निर्णयाची फलश्रुती सुध्दा राज्याला मिळत. एखादा निर्णय घ्यावा वाटला तर ते त्यावर लगेच विचारविनिमय करून तत्काळ लागू करीत असत. असा राजकारणी पुन्हा होणार नाही. निर्णय घेण्यात सरकार किती वेळ घालवते आणि त्याची अंमलबजावणी तर तो निर्णय विस्मरणात गेल्यावर होते हे अनेकदा आपण पाहीले आहे. पण त्याबाबत अजित पवार यांनी कधी निर्णय घेतला आणि तो लागू होण्यास विलंब झाला असे कधी घडले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या नावाची चर्चा एक कर्तबगार उपमुख्यमंत्री झाली होती. अगदी कामात कुठलाही वेळ न दवडता ते काम नेटाने करीत असत. राज्याच्या राजकारणात सततेत असताना अजित पवार यांनी अनेकदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. एक आर्थिक नियोजन आणि शिस्त त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना घालून दिली. त्यामुळे त्यांना राज्याच्या आर्थिक विकासाचा मापदंड माहिती होता. काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना त्यांनी राज्याची आर्थिक शिस्त कधी बिघडू दिली नाही. विरोधकांच्या टिकेला कधी त्यांनी मनावर घेतलं नाही अगदी हसत खेळत राज्याचा विकास करण्यासाठी ते धडपडत याची प्रचिती आपणांस विमान अपघात झाला त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेल्या कागदोपत्रावरून लक्षात येते. कामाने झपाटलेला माणूस म्हटलं तर योग्य. भारतीय जनता पक्षाच्या सोबत अलायन्स करून देखील त्यांनी फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचारांशी फारकत घेतली नाही. हे ही त्यांच वेगळेपण म्हणता येईल. कामाचा पक्का वादा म्हणजे अजित दादा हे अगदी तंतोतंत लागू पडते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून काकाला वेटीस धरणाऱ्या पुतण्याणे एकट्याच्या हिमतीने २०२४ च्या राष्ट्रवादी फूटी नंतरच्या पहिल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आणि नेतृत्व सिद्ध केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक झाली यात अपेक्षित यश आले नाही म्हणून अजित पवार यांच्यावर टीका झाली. मात्र, अजित पवार यांच्या सोबत जे खासदार आले होते ते पुन्हा निवडून आले. हे मात्र विश्लेषण करणारे विसरले. पण, विधानसभेतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला विजय अनेकांची तोंड बंद करणारा आणि शरद पवार यांच्या राजकीय खेळीला चाणक्य नीती मानणारा वर्ग गपगुमान झाला. काय कारण, जनतेने अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले होते. राजकारणाची सुरुवात काका म्हणजे शरद पवार यांचे बोट धरून झाली असली तरी काकापेक्षा सरस पाऊल आणि गनिमी कावा नव्हे तर उघडउघड राजकारण अजित पवार यांनी केले. त्यामुळे राजकारणात त्यांना परखड आणि स्पष्ट राजकारणी म्हणून ओळखले जात.अजित पवार राजकारणाच्या पटलावर दिसणार नाहीत पण त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनाच्या कप्प्यात आहेत. हे त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणामुळे. काकांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या अजित पवार यांनी छत्रछाया सोडली आणि स्वतः झाडं होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. हे वाटत तितकं नक्कीच सोपं नव्हतं कारण, शरद पवार यांच्यासारख्या वटवृक्षाखाली वाढलेले अजित पवार स्वतः ची वेगळी अजित अनंतराव पवार अशी ओळख निर्माण करतात. हे पवार कुटुंबियांसाठी सुखावह होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, राजकारणातली वैचारिक भुमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते. तशी वैचारिक भुमिका अजित पवारांनी सिध्द करून दाखविली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. अजित पवार हे नाव एक संघर्षचा झंझावात होता जो सतत धगधगता होता. राज्याच्या राजकारणात आणि विकासात कोणती भूमिका कधी घ्यायची याच अचूक गणित मला वाटतं त्याचं इतकं कुणाला असेल?
विकासासाठी आमदार निधी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी त्यांनी शक्य तितके प्रयत्न केले. सतत राजकारणातील चढता आलेख त्यांची उंची दाखवतो.१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून आले, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.हा केवळ राजकीय वारसा असू शकतो?तर राजकीय वारश्यावर अनेकदा निवडणूक येणं शक्य नाही असं मला तरी वाटत. अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.एवढेच नव्हे तर त्यांनी ज्या ज्या पदांवर काम केले त्या त्या पदाला वेगळी ओळख निर्माण करून करून दिली ती त्यांच्या झपाटलेल्या कामातून. असो, त्यांच्या या अचानक अपघाती जान्याने मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. एक महत्वकांक्षी नेता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र आणि देश विसरणार नाही. राज्याच्या विकासाची दूरदृष्टी शांत झाली. भावपूर्ण श्रद्धांजली!
– पदमाकर उखळीकर ,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो. ९९७५१८८९१२.
kalpadmakarukhlikar@gmail.com
